कामविषयक स्वातंत्र्याच्या मर्यादा- र.धों. कर्वे
सध्याच्या आधुनिक मानल्या जाणाऱ्या काळातदेखील लैंगिक संबंध, लैंगिकता याविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. मात्र र. धों. कर्वे हे १९४० च्या आसपास या सगळ्याविषयी मोकळेपणाने बोलले. स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या नैसर्गिक सहज आकर्षण, स्त्री-पुरुष देह, संततीनियमन याबद्दल त्यांनी खूप खुलेपणाने लिखाण देखील केले आहे. अर्थात त्यांना याविषयी काम करत असताना, बोलत असताना, लिहित असताना त्याकाळात तीव्र विरोध झाला हे काही वेगळे सांगायला नको. संततिनियमन व लैंगिकता शिक्षण यांचा प्रचार व प्रसारासाठी उमेदीची वर्षे खर्च करणा-या र. धों. ना आयुष्यात मिळाले ते म्हणजे उपेक्षा, उपहास, अवहेलना व टीका. रघुनाथ कर्वे यांच्या (१८८२ ते १९५३) या कालावधीतील कार्यावर आधारित ‘ध्यासपर्व’ हा मराठी चित्रपट काही वाचकांनी पहिला असेल. त्या काळातही लैंगिकतेसारख्या विषयाबद्दल धाडसाने बोलणाऱ्या रघुनाथ कर्वे यांच्या कामाबद्दल इंटरनेट माहिती पाहताना जुलै १९४२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लिखाणातीन दोन परिच्छेद सापडले, ते वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे. आजच्या काळातही ते अगदी समर्पक आहेत.
प्रत्येकाला कामशांतीचा हक्क आहे हे एकदा कबूल केले, की प्रत्येकाला आपल्या शक्तीप्रमाणे ती करण्याचे स्वातंत्र्य पाहिजे, हे ओघानेच आले. मात्र कामशांती ही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असल्यामुळे त्याकरता त्या व्यक्तीची संमती असली पाहिजे, कारण इतरांना त्रास होता नये हा नीतीचा नियम समाजात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मान्य केलाच पाहिजे. मात्र दोन व्यक्तींची संमती असेल, तर मग दुसऱ्या कोणालाही मधे पडण्याचा हक्क नाही; कारण मग तो त्या दोन व्यक्तींचा खाजगी प्रश्न झाला, आणि तो वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मर्यादेत येतो. दुसऱ्याला त्रास होऊ नये इतकी काळजी घेतली म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर निष्कारण निर्बंध घालता नये, हे मूलभूत तत्त्व समंजस लोकांना मान्य होईल, असे मी धरून चालतो.
आता यात कोणी असा प्रश्न काढील, की विवाहित स्त्रीपुरुषांवर परस्परांव्यतिरिक्त कोणाशीही संबंध न ठेवण्याचा निर्बंध असतो. या निर्बंधाचा अर्थ काय, याचा विचार केल्यास असे दिसते, की विवाहाने त्यांचा परस्परांवर किंवा निदान परस्परांच्या शरीराच्या काही विशिष्ट भागांवर, मालकी हक्क उत्पन्न होतो, पुष्कळ समाजांत हा मालकी हक्क फक्त स्त्रियांवरच उत्पन्न होतो, आणि पुरुषांना हा निर्बंध लागू असतो तेथेदेखील सत्ता पुरुषांच्या हाती असल्यामुळे ते तो धाब्यावर बसवतात. म्हणजे वस्तुतः यात नैतिक तत्त्व नसून ही केवळ अरेरावी आहे. कित्येक समाजांत तर पुरुषांना राजरोज अनेक बायका करण्याची परवानगीच असते; पण ती जेथे नसते तेथेदेखील पुरुषांचे एकपत्नीत्व केवळ नावालाच असते, हे सर्वांना माहीत आहे. एका माणसाचा दुसऱ्यावर मालकी हक्क असणे हा गुलामगिरीचा अवशेष आहे, रानटीपणाचा अवशेष आहे आणि समंजस लोकांनी तो कबूल करता नये. समान हक्कांसाठी भांडणाऱ्या काही स्त्रिया हा निर्बंध स्त्रियांप्रमाणे पुरुषांनाही कडकपणे लागू करावा, अशी मागणी करतात. पण हा अडाणीपणा आहे, समंजसपणा नव्हे. पण कामविषयक बाबतीत स्वातंत्र्य असावे असे म्हणण्याची पुरुषांचीदेखील छाती होत नाही; तेव्हा आजपर्यंत गुलामगिरीत वाढलेल्या बायकांना तो धीर कसा व्हावा? पारंपरिक स्त्रियांच्या या बावळटपणाला समंजस लोकांनी उत्तेजन देता नये. पण पुरुषांची या बाबतीत वृत्ती अशी असते, की त्यांना स्वतःला स्वातंत्र्य असावे असे वाटते, दुसऱ्याची बायको शक्य तर आपणांस मिळावी यात त्यांना वावगे दिसत नाही; पण आपली बायको मात्र प्रतिव्रता राहिली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. असे पुरुष या अडाणी स्त्रियांना नेहमी पाठिंबा देतात, कारण एकपत्नीव्रताचा निर्बंध आपल्यावर खरोखर लादणे अशक्य आहे, आणि कायद्याने तो लादला तरी आपल्याला आपली सोय लावता येईल, अशी त्यांची खात्री असते. अशी खात्री असण्याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रियांचा व्यभिचार जसा कित्येक प्रसंगी समजण्याचा संभव असतो, तसा पुरुषांचे बाबतीत नसतो. शिवाय स्त्रिया अजून पुरुषांप्रमाणेच स्वतःच्या पायांवर उभ्या राहू लागल्या नाहीत, हे दुसरे एक कारण आहे. हल्लीचे सामाजिक निर्बंध समंजसपणावर आधारलेले नसून केवळ अरेरावीने अमलात आणलेले आहेत.