‘बच्चू मांगे मोअर’ च्या काळात ‘आयुष’चे सल्ले? -शर्मिला कलगुटकर

2,323

हा फोटो आहे आठव्या महिन्यातला. माझ्या मुलाच्या, आत्मजच्या जन्मापूर्वीचा. मी गोवेकर. अट्टल मासेखाऊ. दिवस राहिले तेव्हापासून कालव, पापलेट, हलवा, बांगडा ,खेकडे खावेसे वाटायचे. मध्येच आबा-फणसाचीही हुक्की यायची. एरवी कधीच न आवडलेली काळी द्राक्षं आणि कलिंगडही पावसाळी दिवसातही नवरोबा शोधशोधून आणून खाऊ घालायचा.

ओळखीचे, मैत्रीतले, विस्तारित कुटुंबातले अनेकजण प्रेमाने, आग्रहाने खाऊ घालायचे. आईने माझ्या या उष्णधर्मीय फमाईशी ”तुकड्यातुकड्या”ने पूर्ण केल्या. तरीही जीवाची चाह खूप होती. बच्चू मांगे मोअर… या सगळ्या दिवसांत या मित्रपरिवाराने हौस पुरवली, फाजील काळजी करायची नाही, असं सांगून आमच्या कडक शिक्षिका वैशाली रोडेबाईंनी तंबीच दिली होती.  ‘बाई कळांनी जीव जातो’, सांगून बायकी धास्ती घातली नाही. ‘मासिक पाळीत पोटात दुखत त्याहून थोड अधिक दुखतं. डॅाक्टर असतात, घाबरुन बीपी वाढवायचा नाही. नेमका श्वास घ्यायचं तंत्र आधीच समजून घेतलं, पॅनिक कमी झालीस तर सहज सुटशील’ असं म्हणत ब्रेनवॅाशिगही केलं होतं.

आधी ज्या डॉक्टर बाई निवडल्या होत्या त्यांच्याकडे रात्री दिडदिड पर्यंत नंबर यायचा नाही. त्यात रिपोर्टिगवाली नोकरी. जमेगा कैसे. सिंघानिया रुग्णालयातील सिनिअर डॉक्टरांचं घर कम नर्सिग होम जवळच होतं. डॅा. चंदावरकरांचं वरच्या मजल्यावर. नर्सिग होम एकदम घरासारखं. असायन्मेंटचा नेम नसायचा. मग ठरवलं त्यांच्याकडेच, अपेक्षामध्ये डिलव्हरी करायची.

माझ्या तीन मैत्रीणींचाही याच सुमारास ड्यु होत्या. त्या बापुड्या त्या लेडी डॅाक्टरकडे जागरण करत नंबर लावायच्या, सकाळची नऊ तेरा गाठायच्या..त्यातल्या एकीने चौथ्या महिन्यातच ट्रेनच्या प्रवासाला घाबरून नोकरी सोडली.

डॉ. चंदावरकरांची माझी पहिली भेट झाली तेव्हा सर म्हणाले, “लुक यंग लेडी, प्रेग्नेसी इज नॉट डिसिज. आजार नाहीय हा. जितकं जमतंय, झेपतंय,गंमत वाटतेय तितके दिवस काम करं, खूप स्ट्रेस करु नकोस. मस्त फिर..एन्जॅाय..तु जशी तसं लेकरु…” अरे हे काय सांगतायत. फार टेस्ट नाहीत, गोळ्यांचा रतीब नाही, महागड्या गर्भसंस्कार वर्गांचा सल्ला नाही.. पुढचा आगावू प्रश्न विचारलाच, “सर सगळं खाल्लं तरीही चालेल?”. “ खा की, पचतय तितकं बिनधास्त खा.. प्रमाणात खा..” डॉक्टरांचं उत्तर.

सगळ्या असायन्मेंट सांभाळून भल्या दुपारी दत्तबोर्डिंगमध्ये वैशाली, पूनम, श्रद्धा, सुनिता, अनिष, योगेश, प्रशांत या सगळ्यांनी भरपेट खायला घालून मासळी खाण्याची ही हौस पुरवली. सिझन नसताना आणलेले आंबेही चापले. या नऊ महिन्यात क्वचितच प्रेग्नंसीच्या कारणासाठी सुट्टी घेतली असेन. पुणे,  नाशिक, दिल्लीपर्यंत भरपूर भटकले. दणकून काम केलं. खाल्लं, खिलवलं अन् पोट ओट्याला टेकेस्तोवर रांधलंही..

आज गर्भवती बाईनी काय खावं, काय खाऊ नये यासाठी आयुषचा फुकटचा सल्ला वाचला अन् हे सगळं आठवलं..डॅाक्टरांचे ते शब्दही..

काहींना गरोदरपण खरच खूप अवघडलेलं असतं हे कबुल. पण वर्षोनुवर्ष बाळंतपणाच्या ऐकत आलेल्या गोष्टी, सिनेमांतून दाखवलं जाणार किंकाळ बाळंतपण नव्याने आई होणाऱ्या तिच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण करतं. तिला ते कुणाला सांगताही येत नाहीत अन् त्याचं दडपणही सहन होत नाही. उत्तर गुगलकरून शोधली जातात. भितीत अधिक भर पडते. मासिक पाळीविषयी जसं खुलेआम बोललं जात नाही तसंच गरोदरपणाविषयी, बाळंतपणाविषयी सकारात्मक बोलण्याची, आईला गुढ गुपितसदृश्य भितीमध्ये न ढकलता मोकळेपणाने दिलासा देण्याची गरज आहे. प्रत्येक मुल जसं वेगळं तसा प्रत्येकीचा आई होतानाच अनुभव वेगळा. वेदनांची टेन्डन्सी आणि मुल झाल्यानंतरचं फिलिंगही वेगळचं..

मुल होऊ देण्याच्या निर्णयापासून ते बाळाचा जन्म होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. ते थोडं विचारपूर्वक समजून घेण्याची गरज आहे.

अनेकजणी चांगल्या तज्ज्ञ पुरुष डॅाक्टरने शरिराला स्पर्श केलेला चालणार नाही म्हणून पुरुष डॅाक्टरकडे डिलीव्हरी नाकारतात. हवं ते प्रमाणात खाल्लं तर शरिर स्विकारतं हे वैद्यकीय वास्तव न स्विकारता कुणाकुणाच्या गर्भ पडल्याच्या हकिगतीचं भूत डोक्यावर घेऊन नऊ महिने ढकलतात. वेदना सुरु होण्यापूर्वीच घाबरून सगळ्या बाळंतपणाच्या कळ्या सोसत राहतात. बीपी असेल तरीही वेळच्यावेळी गोळ्या न घेता नस्ती दुखणी ओढावून घेतात. कसं होणार, या काळजीने उसासत राहतात. चंद्रग्रहण, सुर्यग्रहणाच्या सावल्यांपासून दचकून राहतात.

नोकरी करणाऱ्या, करिअर करणाऱ्या आई होणाऱ्या मुलींचे प्रश्न अधिक बिकट असतात. तीन महिने अन् आता सहा महिने झाले की पुन्हा जॅाईन व्हावं लागतं. मुल अंगावर पिणारं असेल तर पान्हा दाटून येतो. वेदनांनी जीव जातो. संसर्ग वाढून ताप येतो. बॅास पुरुष असेल तर हे सगळं सांगणार कुणाला? प्रसंगी सुपरवुमन असण्याचा ‘इगो’ स्ट्रॅाग असतो, सवलत घेतली म्हणून हसतील म्हणत हा ताप अंगावर काढून दुधाच्या गाठींचे ऑपरेशन करण्याची वेळ येते.

बाळंतपणासाठी सज्ज झालेलं घर आणि त्या घरातल्या बाळांना सांभाळलेल्या आया, आज्या, परिवारातल्या साठीला टेकलेल्या सगळ्या सख्या, त्यांची वाढती वयं, गुडघ्याची दुखणी, बाळाची जागरण, छोटयाछोट्या मुद्द्यांवरून असलेले मतभेद आणि बाळंतणीच्या शरिरात होत असलेले झालेले हार्मोनल बदल. मध्येच येणारा संताप, रडू हे सगळं एकदम आदळतं. मुड बदलला की तिची नजर काढली जाते, बाहेरच्यांपासून लपवलं जातं. माहेर सासरचे सगळे आपापल्या पद्धतीचे सल्ले गोंधळलेल्या आईला सांगत राहतात.यातलं नेमकं काय करायचं..तिला उमजत नाही..

रात्रभर दुपटी बदलायची की डायपर लावायचे ? बाळाला धुरी द्यायची की नाही ?  नाभीत तेल घालायचं की नाही? पाणी किती गरम हवं?  उन्हाळ्यातपण घट्ट बांधून ठेवायचं का?  मानेखाली उशी द्यायची का?  टाळू तेलाने भरायचा का नाही ?  काजळ नीट लावायचं की नाही? नजर काढायची की नाही?  तुरटीवर म्हातारी हसते की नाही हे पाहायचं की नाही? असे हज्जारो प्रश्न मागच्या आणि आमच्या पिढीतल्या आयांच्यामध्ये ‘ठिणगी’ टाकतात…

बाळाला कसं वाढवायचं, कुणाकडे वाढवायचं, काय स्विकारायचं काय टाकायचं, सगळ्यांना मदतीसाठी सोबत कसं न्यायचं..याचा विचार आईबाबांनी बाळ होऊ देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी केला तर पुढची लढाई तुलनेने थोडी सोपी होते. गरोदरपणाचा बाऊ करायचा, की प्रत्येक दिवस फुल-ऑन जगायचा हे एकदा ठरवलं की छोट्यामोठ्या शारिरिक कुरबुरीही दूर पळतात…

ते एकदा ठरलं की टग्या बाळासाठी नेमकं काय करायचं, असले ‘आयुषी’ सल्ले घेण्याची गरज राहत नाही !
(थॅक्स सुर्वणा दुसाने तुझ्यामुळे आज ही आठवण मी लिहली  …)

 साभार: शर्मिला कलगुटकर यांच्या फेसबुकपेजवरून साभार.

Comments are closed.