जाहिरातींमधले स्त्री आणि पुरुष

0 2,655

आपण सतत जाहिराती पाहत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. ज्या प्रॉडक्टची किंंवा वस्तूची जाहिरात आहे त्याची माहिती देण्यासोबतच जाहिराती आपल्याला इतरही अनेक गोष्टी दाखवत, सांगत असतात. बाई आणि पुरुषाच्या ठराविक प्रतिमांमधून काही गोष्टी आपल्याही नकळत आपल्यापर्यंत पोचत असतात. जाहिरातीतली बाई कशी असते?

एक तर ती गृहिणी असते जी स्वयंपाक बनवत असते, मुलांची आणि मोठ्यांची काळजी घेत असते, घर, संडास साफ ठेवत असते. ती काम करणारी असेल तरी ती अखेर घरी येऊनही तिची गृहिणीची भूमिका तितकीच सफाईदारपणे निभावत असते.

जाहिरातीतली तरूण मुलगी मात्र अधिकाधिक सेक्सी बनवण्यात आली आहे. तिचं शरीरच पाहायचं असल्यामुळे त्यामागे एक जिवंत व्यक्ती आहे याचा विसर पडावा अशा पद्धतीने बाईचं शरीर जाहिरांतींमध्ये वापरलं जातं.बाईच्या शरीराच्या वस्तुकरणाचं जाहिराती हे फार मोठं उदाहरण आहेत.

जाहिरातीतले पुरुष किंवा युवक काय करत असतात? किंवा कोणत्या जाहिरातींमध्ये पुरुष असतात? बहुतेक सगळ्या बाइक्स, कार, कर्जं, बिझनेस आणि परफ्यूम व अातल्या कपड्यांच्या जाहिरातींमध्ये पुरुष असतात. आणि त्यांची इमेजही – मॅचो- अशीच असते. पुरुषत्व दाखवणाऱ्या आणि पुरुष, नवरा, भाऊ, बाप अशा संरक्षणकर्त्या भूमिकेत पुरुष दिसतात. फार क्वचित घरकाम करणारा, मुलांची काळजी घेणारा पुरुष जाहिरातीत दिसतो.

एका अभ्यासानुसार प्रत्येक अमेरिकन माणूस दिवसातून किमान 3000 जाहिराती पाहत असतो. त्यामुळे त्यातून दाखवल्या, ऐकवल्या जाणाऱ्या प्रतिमा मनावर ठसल्या नाहीत तरच नवल. पण या प्रतिमा आपल्याला नक्की काय सांगतात ते तपासून पाहू या. या प्रतिमा आपल्याला बाई-पुरुष, सुंदर-कुरुप, चांगलं-वाईट अशाच प्रतिमांमध्ये अडकवत आहेत. लिंगभावाच्या किंवा जेंडरच्या व्यवस्थेचा हाही एक मोठा पैलू. हॅवेल कंपनीच्या काही जाहिराती मात्र या साच्यांना तोडायचा प्रयत्न करतात. त्या पहा आणि तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला कळवा.

आपण रोज ज्या जाहिराती पाहतो त्याची यादी बनवा. जाहिरातीतल्या स्त्रिया किंवा मुली कोणत्या भूमिकेमध्ये दाखवल्या आहेत किंवा त्या कोणकोणती कामं करताना दाखवल्या आहेत त्याची यादी करा. याचप्रमाणे मुलं किंवा पुरुष काय करताना दाखवले आहेत त्याचीही यादी करा. त्यातून स्त्री पुरुषांच्या प्रतिमांमध्ये काय फरक आहे ते दिसतंय का ते पहा. तुमची निरीक्षणं समजून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. नक्की लिहा. तुमचं मत खाली कमेंट पोस्ट करूनही देता येईल.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.