लिंगभाव आणि लैंगिकता

0 2,449

लैंगिक नात्यांमध्ये आणि संबंधांमध्ये मुलीने काय करायचं आणि मुलाने काय करायचं याच्या काही अपेक्षा असतात. तुम्ही कसं राहता, तुमच्या आवडी निवडी, कपडे, वागणं या सगळ्यावरच या भूमिकांचा आणि अपेक्षांचा परिणाम होतो. प्रेमामध्ये आणि सेक्समध्येही, लैंगिक संबंधांमध्ये युवकाने किंवा पुरुषाने पुढाकार घ्यावा अशी साधारणपणे अपेक्षा असते. हा पुढाकार घेण्यासाठी त्याला प्रोत्साहनही मिळत असतं. त्याच्या मित्रांकडून तो मुलींचं लक्ष वेधून घ्यायला शिकत असतो. कमेंट पास करणं, शिट्ट्या मारणं, गाणी म्हणणं, प्रपोज करणं अशा सगळ्यातून तो मुलींना स्वतःकडे आकर्षित करत असतो. मुलासाठी किंवा पुरुषासाठी असं वागणं समाजमान्य आहे. पण हेच मुलीनी केलं तर? प्रेमाच्या किंवा शरीरसंबंधांच्या बाबत मुलींनी पुढाकार घेणं तर लांबच पण उघडपणे बोलणंही मान्य केलं जात नाही.

लैंगिक संबंधांमध्ये पुरुषाला सर्व गोष्टी जमायलाच पाहिजेत अशी सर्वांची अपेक्षा असते. तसं नाही झालं तर त्याच्या पुरुषत्वावरच शंका घेतली जाते. त्याला सगळं माहित असायला पाहिजे. आणि त्याला तसा आधीचा अनुभवही असला तरी हरकत नसते. मुलींच्या बाबतीत मात्र लग्नाआधी त्यांनी असं काहीही करणं समाजाला मान्य नाही. तिचं कौमार्य महत्त्वाचं मानलं जातं. तसंच लैंगिक संबंध किंवा लैंगिकतेविषयी तिने बोलणं, माहिती मिळवणं फारसं चांगलं मानलं जात नाही. त्यामुळे मुलींना काहीही माहिती नसलं तरी चालतं. अशा अपेक्षांमुळे मुला-मुलींवर वेगवेगळे ताण येऊ शकतात. लैंगिकतेबद्दलच्या चुकीच्या कल्पना आणि मतंही तयार होऊ शकतात.

तुम्हांला असे इतर काही विरोधाभास जाणवले आहेत का? आम्हांला नक्की कळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.