लिंगभावाची व्यवस्था
घडवलेले स्त्री पुरुष
– स्त्रिया नाजूक तर पुरुष ताकदवान
– स्त्री गृहिणी तर पुरुष कुटुंबप्रमुख
– स्त्रिया हळव्या असतात तर पुरुष डोक्याने काम करतात
असे अनेक समज, नियम, अपेक्षा आपण ऐकतो, अनुभवतो. पुरुष किंवा स्त्री म्हणून आपण काय करायचं, कसं रहायचं हे आपण शिकतो आणि त्यासोबतच काय करायचं नाही, कसं वागायचं नाही हेही आपण शिकू लागतो. काही गोष्टी मुलग्यांसाठी योग्य किंवा चागल्या समजल्या जातात तर काही गोष्टी फक्त मुलींसाठी योग्य मानल्या जातात. या सर्व भावना, अपेक्षा आणि भूमिकांमुळे आपली विभागणी स्त्री, पुरुष आणि इतर अशी होते. स्त्रियांना आणि पुरुषांना काही विशेष अधिकार देण्याच आले आहेत तसंच त्यांच्यावर काही बंधनंही घालण्यात आली आहेत. या सर्व नियम आणि व्यवस्थेतून स्त्री आणि पुरुष घडवले जातात.
पण ही विभागणी समान नाही. यातल्या स्त्री पुरुषांच्या भूमिका सारख्या किंवा समान नाहीत. तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात किंवा ट्रान्सजेण्डर आहात यावर तुम्हाला मिळणारे अधिकार अवलंबून असतात. तुम्हाला किती स्वातंत्र्य आहे, तुम्ही तुमचे निर्णय स्वतःचे स्वतः घेऊ शकता का, तुम्हाला विकासाच्या संधींचा पुरेपूर लाभ मिळतो का या गोष्टी तुम्ही कोण आहात यावर अवलंबून असतात. स्त्रियांचं क्षेत्र म्हणजे घर या धारणेमुळे स्त्रियांवर मर्यादा आल्या तसंच पुरुष म्हणजे कर्ता कमवता, धाडसी, भवनिक नसणारा अशा अपेक्षांमुळे पुरुषावरही काही प्रमाणात मर्यादा आल्या. अर्थात त्यातून येणारे अधिकार स्त्रीपेक्षा पुरुषाकडे जास्त आहेत.
आपल्यावर लिंगभावाच्या या व्यवस्थेचा कसा परिणाम होतो, आपल्यावर कोणत्या मर्यादा येतात आणि कोणते अधिकार आपल्याला मिळतात ते तपासून पाहू या. मुलगी किंवा मुलगा या पलिकडे जाऊन आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्या जास्तीत जास्त कशा वापरू शकू यासाठी प्रयत्न करू या.
स्त्रीला जर प्रेम आणि आदर दिला तर स्त्री
नपुंसक पुरुषांसोबत हसत आयुष्य काढेल का?
हा फेसबुकवरुन आलेला प्रश्न दिसतोय… असो…
असं असणं वा होणं हे फार व्यक्तिनिहाय आहे. प्रत्येक व्यक्तिच्या गरजा निरनिराळ्या असतात. त्यामुळे हे प्रत्येक स्त्रिला लागू पडेलच असं नाही.
(यातुन एक गोष्ट स्पष्ट होते की समाजात बाईला व नपुंंसक व्यक्तिला आदर दिला जात नाही. तसेच एक प्रश्नही पडतो की, आपल्या समाजात पुरुष स्त्रीला प्रेम व आदर देण्यासाठी कमी पडत आहेत का?).