मुलगी म्हणजे? मुलगा म्हणजे?

3,457

मुलीने असंच वागायचं आणि मुलाने तसंच वागायचं किंवा मुलगी म्हणजे गोरी, सुंदर, लाजाळू, प्रेमळ तर मुलं म्हणजे उंच, शक्तीवान, कमावते, धाडसी… असंच का बरं मानलं जातं? मुलीच घर चांगलं सांभाळू शकतात आणि तांत्रिक कामं पुरुषांनीच करावीत असं तरी का? साध्या साध्या गोष्टीत मुलांच्या आणि मुलींच्या किंवा स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या प्रतिमा समाजाने ठरवून टाकल्या आहेत. या प्रतिमांनाच साचेबद्ध प्रतिमा म्हणतात. मुलं रडत नाहीत, भावना दाखवत नाहीत किंवा मुली डोक्याने काम करू शकत नाहीत, त्या घर उत्तम सांभाळू शकतात वगैरे वगैरे… अशा प्रतिमांचा परिणाम आपल्या निवडींवरही होत असतो.

साचेबद्ध प्रतिमा आपल्याला अडकवतात, पुढे जाऊ देत नाहीत, मोकळं होऊ देत नाहीत. लैंगिकतेबद्दलच्या अशाच प्रतिमा आपल्याला अनेक अनुभवांपासून दूर ठेवतात. काय चांगलं आणि काय वाईट याचेही आपल्या समाजाने साचे बनवले आहेत. पण आपण त्या साच्यांमध्ये अडकलो तर आपली वाढ मात्र खुंटते. डोळ्यावर झापडं येतात आणि चाकोरी सोडून वाट दिसत नाही.

आपल्या मनातल्या या प्रतिमा काढून टाका. विजेची, दुरुस्तीची, प्लंबिंगची कामं करायला एखादी मुलगी आली, मोठ्या कंपनीच्या सीईओपदी एखादी बाई असली किंवा एखाद्या मुलीच्या हातात सिगरेट किंवा दारू दिसली तर दचकू नका. तुमचा एखादा मित्र घळाघळा रडत असेल, अंधाराला घाबरत असेल, घरकाम आवडीने करत असेल, नटत असेल तर त्यालाही वेड्यात काढू नका.

चष्मे काढा. थेट पहा. अनुभव घ्या आणि मगच ठरवा….आपण कसं जगायचं, साच्यांमध्ये का मुक्त…

Comments are closed.