हिंदोळ्यावर…

1,013

समाजाच्या चौकटीत बसणारे, मुख्य प्रवाहाला मान्य नसलेले प्रेम केले तर असे प्रेम करणाऱ्या लोकांना लोक निंदेला, टिकेला, विरोधाला सामोरं जावं लागतं. आंतरजातीय प्रेम, आंतरधर्मीय प्रेम, समलिंगी प्रेम, गरीब आणि श्रीमंत व्यक्तींमधील, शैक्षणिक दरी असणाऱ्या व्यक्तींमधील प्रेम यांसारखी अनेक उदाहरणं देता येतील.

अशीच एक आगळी वेगळी प्रेमकहाणी आणि त्याबद्दलची लोकांची मतं, समाजाची प्रतिक्रिया विभावरी शिरुरकर यांनी त्यांच्या ‘हिंदोळ्यावर’ या कांदबरीमध्ये मांडली आहे. त्यातील काही भाग वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.

विराग आणि अचला! आयुष्याचा खडतर मार्ग चालून आलेले, थकले-भागलेले दोन जीव, प्रेमळ जीवनाच्या पाणपोईशी श्रमपरिहार करू लागले. साऱ्या सचेतन सृष्टीला काही तरी ‘ओढ’ लागलेली आहे. त्या ओढीलाच कोणी ‘प्रेम’ म्हणतील. पण कोणत्याही अर्थाचे, पण कोणत्याही स्वरूपाचे प्रेम जगातून काढून टाका, मनुष्याची कर्तृत्वशक्ती अर्धांगवायुने पछाडल्यासारखी लुळी होऊन पडेल. प्रेमच नाही, तेथे करण्याजोगे तरी काय ? आणि करावयाचे तरी कोणासाठी? अबालवृद्धांना एकमेकांजवळ आणून हात घालायला लावणारी, अखिल सृष्टीतील विलग असणाऱ्या चलाचलांना एकत्र गुंफू पाहणारी ही प्रेमरज्जू काढून घ्या, सारे वस्तूजात विस्कटलेल्या एकसराप्रमाणे विशोभित, निरभ्र होऊन पडेल. प्रेम ही अशीच भावना आहे, की ती कोमल खरी; पण मनुष्याच्या साऱ्या शक्तींची शक्ती आहे. ती भावना दडपू पहाल, तर इतर साऱ्या शक्ती दबून नाहीशा होतील. ती भावना जसजशी अंकुरित होऊन बहरेल, तशा साऱ्या शक्ती खडबडून जाग्या होतील.

तरुण-तरुणींचे प्रेम ! तो तारुण्यातील एक उन्माद आहे असे कोणी म्हणेल ! पण त्यात केवढी अद्भुत शक्ती भरलेली आहे. अखिल मानवजातीचे अनंत चक्र अव्याहत चालविण्याचे सामर्थ्य त्या प्रेमात आहे ! समाजाची धारणा याच अव्यक्त, दिव्य, नाजूक व बळकट पाशामध्ये आहे. पुष्पकेसराहून कोवळ्या अशा प्रेमरज्जूने बद्ध झालेले जीव एकमेकांकडे ओढले जात असताना सारे क्षणमात्र विसरतात.

जेथे प्रेमाने हळुवार झालेले एक अंत:कारण दुसऱ्या हळुवार अंत:करणाचा आसरा घेत असते, तेथे कोण वृक्ष आणि कोण लता? प्रेमाने भारलेल्या दोन व्यक्ती त्यात कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ? प्रेम दोघांना भारतं, दोघे एकमेकांचे धनी; दोघे एकमेकांचे दास. अहंकाराच्या कोशात गुरफटलेला जीवसुद्धा अंगाभोवती कोश फोडून स्वतःचा दुसऱ्यात लय करू पाहतो. जिवाभावाच्या व्यक्तीच्या सानिध्यात सूर्योदय अथवा सूर्यास्त ज्यांनी पाहिला असेल, डोंगरमाथा नाही तर गिरीकंदरात ज्यांनी घटका घालवल्या असतील, पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहून सागराला भरते ज्यांनी पाहिले असेल, नितांत मधुर गाणे ऐकले असेल, त्यांना अंत:करणाची पाकळी न् पाकळी उमलवणाऱ्या या प्रेमाची जादू कळेल.

विराग आणि अचला याच त्यागाला उत्सुक होती.

मधमाश्याचे पोवळेच त्यांनी उठविले होते. त्या मधमाश्या ज्या तेथून उठल्या त्या दोघांच्याच नव्हे, तर जे जे कोणी त्यांना वाटेत भेटेल त्यांना कडकडून डसू लागल्या. स्त्रिया, स्त्री-शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य, इंग्रजी शिक्षण, पाश्चिमात्य संस्कृती, साऱ्यांना त्यांनी डास घेतले. सभा भरल्या. जाहीर निषेध झाले. वर्तमानपत्रांचे रकाने भरले. कित्येक कॉपीराईटर्स, कित्येक प्रुफे तपासणारे, कित्येक संपादक, कित्येक धर्मपालक, संस्कृतीरक्षक या सर्वांना काही दिवसांचे काम मिळाले.

परकीयांच्या सत्तेपुढे निस्तेजपणे नमताना ज्यांची अंत:करणे थरारली नाहीत, चमकली नाहीत, ते अन्यायाविरुद्ध बंड करणाऱ्या अचला- विरागपुढे तेजाचे लोळ पसरवू लागले.

पण सारा समाज नेहमी असाच असतो थोडाच? उदयोन्मुख नवी पिढी थोड्याफार प्रमाणात बंडखोर असते. कित्येक तरुण, तारुण्याच्या उन्मादात सहजासहजी चेष्टेने अचला-विरागबद्दल वाटेल ते बोलले, तरी त्या बोलण्यात जीव नव्हता. कित्येक तर त्या दोघांच्या वागणुकीचे समर्थन करू लागले; पण केव्हा? सारा आश्चर्याचा भार ओसरल्यावर. क्रिया प्रतिक्रिया ही लढत नेहमीचीच चाललेली असते. एकमुखाने साऱ्यांनी अचल-विरागची निंदा केली. आणि प्रतिक्रियेला सुरुवात होऊन कित्येक मोकळ्या मनाची माणसे त्या दोघांच्या धैर्याची तारीफही करू लागली. पण अशी माणसे फार थोडी; नाही तर शंकाकृती समाजाच्या निमुळत्या शिरांवर बसून, समाजाचे निरीक्षण करणारी माणसे नेहमीच थोडी असतात. आणि ते निमुळते शिरच कधी कधी त्यांचा शूळ होते. त्यांना कराव्या लागणाऱ्या आत्म त्यागानंतरच पायाखालचा मोठा समाज जागा होऊ पाहतो.

अचलेने विरागबरोबर राहण्यापूर्वीच शाळेचा राजीनामा दिला. ती घराच्या सावलीत होती. विराग मात्र दृष्टींचे भले आणि जिव्हांच्या परजलेल्या तलवारी, उघड्या मैदानात अंगावर घेत होता. तो साऱ्या निंदेबाबत उदासीन होता.

भुंकणारी कुत्री तुम्ही भित्रेपणाने पळाला, की अधिक पाठीस लागतील. तुम्ही धीम्मेपणाने निर्भयपणाने जा, ती जागच्या जागी थबकतील. सामाजेचेही काहीसे असेच आहे. तुम्ही त्याची फिकीर करता असे वाटले, की तुम्ही भक्ष्य होऊन बसता. तो उंदरामांजराचा खेळ ! पण तुम्ही बेफिकीर व्हा, समाजातील कोणी तुम्हाला ‘निर्लज्ज’ म्हणेल, कोणी ‘धीराचे’ म्हणेल आणि गप्प बसेल. अचला-विरागची बेफिकिरी अशाच निरनिराळ्या दृष्टींनी लोकांनी पाहिली.

कुठल्याही ‘जिवंत’ व्यक्तिमत्वाच्या माणसाचे जीवन आपल्या समाजात पोखरून टाकणाऱ्या आंतरिक संघर्षाखेरीज का जात नाही? गतीमानतेतच ‘हिंदोळ्याचे’ जिवंतपण; पण गतिमानतेशी आपले एवढे वैर कशासाठी?

नोट: काही ठराविक लोकांमधील प्रेम म्हणजे पवित्र आणि इतरांचे प्रेम अपवित्र; असं असतं का? मग काही लोकांच्या प्रेमाला विरोध का होतो? तुम्हाला काय वाटतं?

तुमची जर अशी आगळी वेगळी प्रेमकहाणी असेल तर आम्हाला नक्की सांगा. तुमच्या प्रेमाला मिळालेली समाजाची प्रतिक्रिया, पाठींबा, विरोध याविषयी आम्हाला नक्की कळवा. आम्ही ते अनुभव तुमची ओळख कुठेही उघड न करता वेबसाईटवर प्रकाशित करू. इतरांच्या दृष्टीने आगळ्या वेगळ्या प्रेमालाही मान्यता आणि प्रतिष्ठा मिळावी यासाठी तुमचे शेअरिंग महत्वाचे ठरेल.   

 

साभार:- पॉप्लूलर प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या विभावरी शिरुरकर यांनी त्यांच्या ‘हिंदोळ्यावर’ या कांदबरीमधील (पृष्ठ क्रमांक १६ ते ११९) मजुकर वर दिलेल्या लिखाणात वापरला आहे.

चित्र साभार : https://www.flickr.com/photos/41836833@N06/4130968509/

 

 

Comments are closed.