या भावांचं काय करायचं?

764

स्वतःच्या मर्जीने जातीबाहेर लग्न केलं म्हणून आपल्या सख्ख्या बहिणीला ठार मारणाऱ्या या अगदी तरुण वयातल्या भावांचं काय करायचं? अजून किती बहिणींचे जीव जाणार? कधी फॅशनेबल राहते म्हणून, कधी दुसऱ्या जातीतल्या मुलावर प्रेम केलं म्हणून तर कधी सज्ञान असताना स्वतःच्या मर्जीने लग्न केलं म्हणून किती मुलींचे जीव जात राहणार आहेत? आपली बहीण किंवा आपली मुलगी ही आपल्या मर्जीविरोधात काही करू शकत नाही आणि तिने स्वतःचं आयुष्य आपल्या मताप्रमाणेच घालवलं पाहिजे ही भावांची आणि बापांची मानसिकता कोणत्या थराला जाणार आहे हे समजेनासं झालं आहे.

जातीची, धर्माची बंधनं झुगारून ज्या मुलींनी आपल्या मर्जीने प्रेम आणि पुढे जाऊन लग्न केलं आहे त्यांना घराची बेअब्रू होते किंवा लोक आमच्या तोंडात शेण घालतील या नावाखाली  त्यांच्याच सख्ख्या भावाकडून, वडलांकडून, नातेवाईकांकडून प्रचंड छळ सहन करावा लागतो आहे. कित्येकींना आपलं प्रेम विसरून त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांनी शोधलेल्या मुलाबरोबर संसार थाटावा लागतो. त्यातही मुलगा दलित, आदिवासी किंवा मुलीपेक्षा खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतला असेल तर मुलांचेही खून पडले आहेत, त्यांच्या घरच्यांना मारहाण, अपमान आणि हिंसा सहन करावी लागली आहे. जात, इज्जत, घराण्याची अब्रू, मान या बेगडी कल्पना अजून किती जणांचे जीव घेणार आहेत? स्वतंत्र भारतात स्वतःच्या मर्जीने लग्न करण्याचा हा अधिकार आपण किती जणांपासून हिरावून घेणार आहोत? मुलींना आपण स्वतंत्र व्यक्ती मानणार आहोत का नाही? प्रेम, लग्न करताना माणूस महत्त्वाचा, जात नाही हे आपण सगळ्यांना कसं शिकवणार आहोत?

काल कोल्हापूरच्या इंद्रजीत आणि मेघा कुलकर्णी या नवविवाहित जोडप्याचा खून मेघाच्याच १९-२० वर्षाच्या सख्ख्या भावांनी अतिशय थंड डोक्याने केला आहे. याआधीही असे खून झाले आहेत. गेल्या वर्षी जळगावच्या एरंडोलमध्ये अल्पवयीन भावाने आपल्या बहिणीच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिला चिरडून मारलं. तिच्या हातात तिची एक वर्षाची मुलगी होती. कुणीही असे खून करणं हा गुन्हाच पण खून करणारे जेव्हा सख्खे भाऊ, वडील, काका असतात तेव्हा मात्र जातीचं, इभ्रजीचं भूत मनावर बसलं की काय होतं ते इतक्या भयानकपणे अंगावर येतं.  हे सगळे तर जबाबदार आहेतच पण त्यांना चिडवणारे, त्यांना वाळीत टाकणारे आणि त्यांना हसणारे नातेवाईक, गावकरी, आसपासचे शेजारी-पाजारी, जात व्यवस्था टिकवून ठेवणाऱ्या सर्व रुढी, परंपरा आणि पुरुषप्रधान समाजव्यवस्थाही अशा खुनांसाठी तितकीच जबाबदार आहे.

शेवटी मात्र इतकंच की सगळेच भाऊ, आई-वडील अशी हिंसा करत नाहीत. किती तरी कुटुंबांनी जातीची बंधनं तोडून लग्नं लावून दिली आहेत. किती तरी भावांनी जातीबाहेर लग्न करणाऱ्या आपल्या बहिणींना पाठिंबा, आधार दिला आहे. आणि तसंच किती तरी बहिणी असा निर्णय घेणाऱ्या आपल्या भावांच्या मागे हिमतीने उभ्या राहिल्या आहेत. त्या सगळ्यांच्या कहाण्या पुढे आणू या. तुमच्याकडे अशी कहाणी असेल तर ती आम्हाला जरूर पाठवा. भावांचं काय करायचं हे कदाचित त्यातनं पुढे येईल.

Comments are closed.