इभ्रतीच्या नावाखाली होणारे गुन्हे (ऑनर क्राइम्स)

747

इभ्रतीच्या नावाखाली होणारे गुन्हे (ऑनर क्राइम्स)

भारताच्या अनेक भागांमध्ये वेगळ्या जातीच्या किंवा धर्माच्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न किंवा प्रेम केलं म्हणून किंवा स्वतःच्या गोत्रात लग्न केलं म्हणून मुला-मुलींचे खून करण्यात आले आहेत. दहशतीचा वापर करून अनेकांना असे प्रेमसंबंध तोडायला लावल्याची उदाहरणं तर अनेक आहेत. त्यातूनही जे पळून जाऊन किंवा स्वतःच्या मनाप्रमाणे लग्न करतात अशांना लग्नानंतरही ठार मारल्याची उदाहरणं देशाच्या विविध भागात घडली आहेत. या सर्व गुन्ह्यांना ऑनर क्राइम्स किंवा घराण्याच्या इभ्रतीपायी केलेले गुन्हे असं म्हटलं जातं.

हरयाणाच्या खाप पंचायती, महाराष्ट्रातील अनेक जातींच्या जात पंचायतींनी अशा प्रकारच्या लग्नांना तीव्र विरोध करून जातीचे असे नियम मोडणाऱ्यांना शिक्षा करण्याचं फर्मान काढल्याच्या त्यासाठी पालकांवर दबाव टाकल्याची उदाहरणं आहेत. लैंगिकतेवरील नियंत्रण हा जात-गोत्र-धर्म रक्षणाचा मुख्य आधार आहे हेच या फतव्यांनी आणि त्यानंतर झालेल्या खुनांमधून सिद्ध झालं आहे.

लग्नांना विरोध म्हणून खून होत आहेत पण लग्न केल्यानंतरही मुलींचे खून झाले आहेत. गोडीगुलाबीने परत बोलवून गरोदर असतानादेखील मुलींना मारून टाकण्याच्या घटना महाराष्ट्रासह देशाच्या इतर बऱ्याच भागांमधून घडत आहेत.

घरच्यांचा, वडील, भाऊ, काका, जवळचे नातेवाईक आणि कधी कधी आई, आजीचाही सहभाग या खुनांमध्ये असतो असं दिसून आलं आहे. मुलींच्या स्वातंत्र्यावर, स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याच्या अधिकाराचं हे सरळ सरळ उल्लंघन आहे.

 

 

2 Comments
  1. साधना says

    आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला असायला हवा.

  2. साधना says

    अशा घटना घडतात आणि कोणी विरोधही करत नाही.
    पान मला अस वाटत की अशा घटना घडत असतील तर खरंच विरोध केलं पाहिजे.

Comments are closed.