असं काहीतरी आहे जे मला माहित नाहीये
असं काहीतरी आहे जे मला माहित नाहीये
पण माहित असायला हवं आहे.
मला काय माहित नाही हे मी जाणत नाही
तरीही ते मला माहित असायला हवं आहे.
मला अगदी मठ्ठ असल्यासारखं वाटतं
कारण एकीकडे ,मला ते माहित पण नाही
आणि जे माहित नाही ते काय
हे तरी कुठे माहित आहे?
आणि म्हणून मग सगळं काही
माहित असल्याचा माझा आव असतो.
पण हे चक्रावणारं आहे.
कारण आव कसला आणायचा हेच मला माहित नाहीये.
मग मला सगळंच माहित असल्याचं भासवतो.
मला काय माहित असायला हवं हे तुम्ही जाणता बहुतेक.
पण तुम्ही पण मला ते सांगू शकत नाही, कारण
मला काय माहित असायला हवं हे तुम्ही जाणता बहुतेक.
पण तुम्ही पण मला ते सांगू शकत नाही, कारण
मला काय माहित नाही हे तुम्हाला तरी
कुठे माहित आहे?
मला काय माहित नाही हे तुम्हाला माहीतही असेल कदाचित
पण ते मला माहित नाहीये हे तुम्हीही जाणत नाही
आणि मीही ते सांगू शकत नाही
म्हणून तुम्हाला, मला सगळं काही सांगावं लागेल.
- आर. डी लॅग, नॉट्स (रुपांतरीत)
आपल्या स्वतःच्या शरीराविषयी, लैंगिकतेविषयी बहुंताशी लोकांची परिस्थिती अगदी या कवितेत वर्णन केल्यासारखीच असते. आपलं शरीर, मन, लैंगिकता, शरीराच्या विविध अवस्था, प्रक्रिया याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. याचा आपल्या स्वतःच्या शरीराशी मैत्री करण्यासाठी, स्वतःवर प्रेम करण्यासाठी, स्वतःच्या शरीराविषयी, आरोग्याविषयी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी मदत होते. ‘असं काहीतरी आहे जे मला माहित नाहीये, पण माहित असायला हवं आहे.’ असं ज्यांना कुणाला वाटत असेल त्यांना ते माहित करून देण्यासाठी आपणही काही हातभार लावूयात. चला लैंगिकतेवर मोकळेपणाने बोलूयात.