आज त्यानं मला फुलं दिली
आज त्यानं मला फुलं दिली,
खरंतर आज माझा वाढदिवस किंवा इतर कोणताही विशेष दिवस नव्हता.
काल रात्री आमच्यात पहिल्यांदा वाद झाला,
तो माझ्याशी खूप क्रूरतेने बोलला, मला खरंच खूप वाईट वाटलं.
त्याला पश्चाताप झाला असावा, त्याला मला दुखवायचे नसावे.
कारण आज मला फुलं मिळाली.
आज त्यानं मला फुलं दिली,
खरंतर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस किंवा इतर कोणताही विशेष दिवस नव्हता.
काल रात्री त्याने मला भिंतीवर आपटले, माझा गळा दाबला;
मला एखादं भयंकर स्वप्न पडल्यासारखं वाटलं,
हे प्रत्यक्षात घडतंय यावर माझा विश्वासच बसत नव्हता.
आज सकाळी सगळीकडे दु:खद वातावरण आहे,
पण मला माहितेय त्याला पश्चाताप झाला असावा,
कारण आज मला फुलं मिळाली.
आज त्यानं मला फुलं दिली,
खरंतर आज ‘मदर्स डे’ किंवा इतर कोणताही विशेष दिवस नव्हता.
काल रात्री त्याने मला पुन्हा मारहाण केली,
रात्रीची मारहाण नेहमीपेक्षा खूपच भयानक होती
जर मी त्याला सोडून गेले तर ???
त्यांनतर मी काय करू ? मी माझ्या मुलांची काळजी कशी घेणार ? पैसे कुठून आणणार ?
मला त्याची भीती वाटायला लागलीये आणि त्याला सोडून जायलाही मी घाबरते.
पण मला माहितेय त्याला पश्चाताप झाला असेल,
कारण आज मला फुलं मिळाली.
आज त्यानं मला फुलं दिली,
आज मात्र विशेष दिवस होता, तो माझ्या दहनाचा दिवस होता
काल रात्री शेवटी त्याने मला मरेपर्यंत मारले.
त्याला सोडून जाण्यासाठी मी पुरेसं धैर्य आणि शक्ती एकवटली असती,
तर मला कदाचित आज फुलं मिळाली नसती.
संदर्भ: I got flowers today या इंग्रजी कवितेचा स्वैर अनुवाद…
Photo by: ORNELLA BINNI on Unsplash
खूप छान कविता आहे.
शेवटच्या दोन ओळी खूप काही सांगून जात आहेत.
“त्याला सोडून जाण्यासाठी मी पुरेसं धैर्य आणि शक्ती एकवटली असती,
तर मला कदाचित आज फुलं मिळाली नसती.”
खरं आहे.. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद… वेबसाईट नियमित वाचत जा… तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.