दिल खोल, चुप्पी तोड

865

समाजात लैंगिक शोषण, छेडछाड, बलात्काराच्या घटना एकीकडे वाढत असताना तरुणाईवर या सर्वांचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. लिंग गुणोत्तराची विषम आकडेवारी, वाढत्या हिंसाचाराच्या घटना आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती असं विरोधाभासी चित्र समाजात दिसून येत आहे. हे दिसताना जरी तिन्ही वेगवेगळे मुद्दे वाटत असले तरी यांचा घनिष्ठ संबंध काही उदाहरणांवरून स्पष्ट होतो. महाविद्यालयातील विद्यार्थी त्रास देतात म्हणून विद्यार्थींनीचे शिक्षण बंद केले, सामाजिक असुरक्षेततेमुळे मुलींना जन्माआधीच संपवून टाकलं जातं आणि सोशल मिडीयावर केल्या जाणाऱ्या छेडछाडीमुळे आत्महत्या..!

हे सर्व घडत असताना तरुणाई या सर्वात कुठे आहे याचा मागोवा घेण्यासाठी वर्षभरात “नो फियर, नो शेम” अभियान राबविण्यात आलं. यामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत छेडछाड, हिंसाचार आणि यांचा सोशल मिडियाशी असलेला संबंध यावर चर्चा केल्या गेल्या. चर्चा करण्यासाठी कार्यशाळा, कट्ट्यावरच्या गप्पा आणि एन.एस.एस कॅम्प अशा स्पेसेसचा वापर करण्यात आला. वर्षाच्या सरतेशेवटी विद्यार्थ्यांना त्यांना समजलेल्या, जाणवलेल्या गोष्टीं अभिव्यक्त करण्यासाठी दिल खोल, चुप्पी तोड या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच केले गेले.

छेडछाड का होते, त्याचे परिणाम काय असू शकतात, छेडछाड करणाऱ्या व्यक्तीची भूमिका आणि मानसिकता कशा प्रकारची असते… याविषयी विचार करणं आणि बोलणं आज गरजेचं आहे. “दिल खोल, चुप्पी तोड” कार्यक्रमात असे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी एक खुला मंच  ‘आय सोच’ने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला.

मुलांनी स्वत: लिहून सादर केलेली नाटकं, नृत्य आणि लघुचित्रपट अशी माध्यमं विद्यार्थ्यांनी वापरली. यामधून असं दिसून आलं की, आजची बेजबाबदार वाटणारी तरुणाई ह्या विषयावर अतिशय संवेदनशील आणि गंभीर विचार करत आहे. छेडछाडीचा मुद्दा फक्त मुलींपर्यंत मर्यादित राहिलेला नसून समाजातली पितृसत्ताक व्यवस्था सर्वांना प्रभावित करत आहे. स्त्री, पुरुष, गे, लेस्बियन आणि ट्रान्स जेंडर असे सर्व यास बळी पडत आहेत. एस.एन.डी.टी.च्या विद्यार्थिनींनी लिंग निवड चाचणीपासून ते स्त्रियांचे होणारे वस्तूकरण अशा अनेक संदर्भांचा मेळ नाटकातून उलगडून दाखवला. तर गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शारीरिक विविधतेवरून होणारी छेडछाड फिल्मच्या स्वरुपात दाखवली. एकूणच कार्यक्रमाच्या सादरीकरणात युवक-युवतींनी स्त्रियांवर होणारे शोषण, स्त्री-पुरुष असमानता, लिंग निदान, प्रेमभंग, कॉलेजमधील छेडछाड, लैंगिकतेविषयी तरुणाईचे विचार अशा अनेक सामाजिक तसेच लैंगिकता विषयक पैलूंवर तरुणाई व्यक्त होताना दिसली.

आज तरुणाईमध्ये सामाजिक विषयाची जाणीव आणि संवेदनशीलता वाढताना दिसत आहे. समाजातील मर्यादीत प्रमाणात का होईना; पण तरुणाई आज परिवर्तनाकडे वाटचाल करताना दिसत आहे. शोषण, छेडछाड, बलात्कार याचे परिणाम आत्महत्येपर्यंत जाऊ शकतात, याची जाणीव त्यांना होताना दिसते. ज्या समाजात लैंगिकता ह्या विषयावर बोलणं वाईट मानलं जातं तिथं ही सगळी  तरुणाई “लैंगिकता आयुष्यात महत्वाची भूमिका निभावत आहे’ हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

“दिल खोल, चुप्पी तोड”सारख्या कार्यक्रमांमुळे तरुणाईला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळालं. पण फक्त एवढ्या एकाच व्यासपीठावरुन समाजातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे अशक्य आहे. तथापि, या व्यासपीठावर अधिक जणांना सोबत घेवून मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे. अर्थात असे कार्यक्रम मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देत असतात, त्यामुळे तरुणाईमधील सृजनशीलता, सामाजिक भान वाढीस लागण्यास मदत होते, हे निश्चित. याचाच प्रत्यय “दिल खोल, चुप्पी तोड” या उपक्रमाने दिला आहे.

Comments are closed.