जातीबाहेर …

- शर्मिष्ठा भोसले

0 696

आंतरजातीय प्रेमविवाह करणार्‍या किंवा प्रेमात पडणार्‍या ‘बंडखोर’ मुला-मुलींच्या मनात-आयुष्यात काय धुमसत असतं?

माझी पिढी, चहापोह्याचे पारंपरिक कार्यक्रम नाकारत हवा तसा जोडीदार शोधणारी. विवाहसंस्थेला ‘आउटडेटेड’ ठरवत कॉण्ट्रॅक्ट मॅरेज, ‘लिव्ह इन’सारख्या पर्यायांचा गांभीर्यानं विचार करणारी! चेतन भगतच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’च्या संकल्पनेला केवळ पुस्तकी न मानता गांभीर्याने समजावून घेऊ पाहणारी. टेक्नोसॅव्ही, आधुनिक.

पण प्रत्यक्षातलं आमचं जगणं असं आहे का? 
 ‘मी जातीबाहेर लग्न केलं तेव्हा अस्पृश्यता काय असेल हे मला अनुभवता आलं. आयटी कंपनीत काम करणार्‍या, सर्वार्थाने अल्ट्रा-मॉडर्न लाइफस्टाइल जगणार्‍या एका मित्रानं एका वाक्यात सांगितला आपला आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्नाचा अनुभव. गंमत ही, की हा मित्र रुढार्थाने उच्चवर्णीय! मात्र आंतरजातीय लग्न करायचं म्हटल्यापासून त्याची वाट अवघड होत गेली. जातीव्यवस्थेच्या उतरंडीत वरपासून तळापर्यंतच्या जातीसमूहांना ‘जातीबाहेरच्या’ बेटीव्यवहाराचा विखार बहुतांशी सारखाच अनुभवावा लागतो आणि ‘खानदान की इज्जत’पासून ते ‘लोग क्या कहेंगे’पर्यंतची सारी भावनिक आवाहनं करणार्‍या कुटुंबासह स्वत:च्या आतल्या संघर्षाला सामोरं जाण्याचा दुहेरी प्रवासही करावा लागतो.
बंडाचं निशाण फडकावत विवाहाचे पारंपरिक निकष नाकारणार्‍या तरुणांमध्येही काहीएक विभागणी करता येते. असे काही तरुण जे जातीअंतासाठी आंतरजातीय विवाह हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्या या वैयक्तिक बाबीला सामाजिक अवकाश देऊ पाहतात आणि दुसरे एकमेकांच्या प्रेमात असलेले. ते प्रेमात पडतात ते परस्परांच्या ओढीनं. प्रेमात पडताना एकमेकांची जात पाहिली जात नाही. मुळात ओढच अशी की जात, धर्म, प्रादेशिकता यांना ती गैरलागूच ठरवते.

पहिल्या प्रकारातले तरुण-तरुणी,  परिवर्तनवादी विचारांची काही एक पार्श्‍वभूमी असणारे, जातवास्तवाच्या विखारासह आपल्या आतल्या संघर्षालाही ते तुलनेने अधिक समंजसपणे हाताळत असल्याचं दिसतं. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, ‘युवा भारत’सारख्या जातीवर्ग स्त्रीदास्य अंताच्या व्यापक चळवळीमध्ये काम करणारे तरुण मित्र-मैत्रिणी, ते म्हणतात आंतरजातीय विवाह ही ‘जातींअंताची कार्यशाळा’ आहे.

परमेश्‍वर जाधव हा मराठवाड्यातल्या एका लहानशा खेड्यातला तरुण. पुणे विद्यापीठात शिकताना वर्गमैत्रीण मनीषा शिंदे हिच्याशी मैत्र जुळलं. दोघांनी समजून उमजून लग्न केलं. परमेश्‍वर म्हणतो, ‘मी सरंजामी मानिसकता जपत आलेल्या मराठा कुटुंबात जन्मलेलो. त्यातही लहान खेड्यात हे सारं अधिकच टोकदार. आई-वडील शेतात राबणारे. ग्रामीण जीवन, त्यातही कष्टकर्‍याचं, पुढे शिकायला पुण्यासारख्या महानगरात आलो आणि खुल्या समाजव्यवस्थेशी नकळत गावाकडच्या वातावरणाची तुलना करू लागलो. यादरम्यानच डाव्या चळवळीत सक्रिय झालो. मनीषा भेटली. आम्ही लग्न केलं. मी मराठा, तर मनीषा माळी समाजात जन्मलेली. लग्नानंतर माझाच माझ्याशी पावलापावलांवर वाद सुरू झाला. चळवळीतल्या अभ्यासवर्गातून भेटलेल्या स्त्रीवादाचं ‘प्रॅक्टिकल’ करताना मी कितीदा चुकलो. त्यातून शिकलो. असा हा ‘प्रायोगिक’ संसार आता बर्‍यापैकी यशस्वी झालाय! पण सुरुवातीच्या काळात नवरा म्हणून माझी ‘मराठा’ मानसिकता नकळत पण पदोपदी वर यायची. जात आणि लिंगभेदापलीकडे विचार करणं, वागणं मला स्वत:लाही अवघड आहे याचा या काळात अनेकदा प्रत्यय आला. घरात मुलगा म्हणून वाढल्यानं ‘बायकांच्या’ कामाची मला काही सवय नव्हती, म्हणजे घरकामाची. आता बायकोचं काम हलकं करण्यासाठी मी घरकाम करू लागलो. तिला बाईपण सोडायला सांगताना मीही पुरूषपणाचा उंबरा ओलांडायला हवा हे आता कळतंय हळूहळू..’

सेवालय या सामाजिक संस्थेत काम करणारा रणजित आचार्य आणि विद्या. प्रेमातून नाही तर एकत्र रचनात्मक काम करण्याच्या उमेदीतून एकत्र आले. ‘विवाह ही आम्हा दोघांसाठी एक परिवर्तनाची कृती होती’ असं ते म्हणतात. मात्र एक मुलगी म्हणून कुटुंब आणि नातेवाइकांना हा निर्णय सांगताना मनात आलेल्या अपराधभावापुढे हतबल झाल्याची भावना होती असं विद्या म्हणते. ‘एरवी ज्यांच्यापाशी मन मोकळं करावं वाटतं त्या मैत्रिणीही अशावेळी भवतालाच्या दडपणाखालीच असतात. न केलेल्या गुन्ह्य़ासाठी आपण सगळ्यांचे गुन्हेगार होऊन बसतो. आसपासचे लोक मात्र आमच्या एकत्र असण्याचा निषेध आपापल्या पद्धतीने नोंदवत राहतात’- असं विद्या सांगतेच.

विद्यार्थीदशेत ओळख झाल्यानंतर विचारपूर्वक निर्णय घेऊन विवाह केलेले विष्णू आणि कीर्ती बडवे दोघेही सध्या प्राध्यापक आहेत. विचारीपणातून नास्तिक झालेल्या विष्णूसह कीर्तीही आता तिच्या कुटुंबात चालत आलेल्या पारंपरिक कर्मकांडातून बाहेर पडतेय. मात्र ही वाट ह्या दोघांसाठीही सोपी नाही. पावलोपावली संघर्ष आहे.

पण निदान या जोडप्यांच्या पाठी काहीतरी वैचारिक बळ आहे. त्या जोडप्यांचं काय जे शारीरिक मानसिक ओढीनं एकमेकांच्या जवळ येतात. प्रेमात पडतात, व्यवहार-जात आणि त्याचे परिणाम हे सारं मनाच्या रडारवरही येत नाही, त्यांचं काय होतं? ‘घरी कसं सांगायचं’ ही घुसमट जगू देत असेल त्यांना?

प्रेमात पडून आंतरजातीय विवाह करणार्‍यांच्या घुसमटीला बरेच पदर असतात. प्रेमात पडून आईबाबांशी भांडून आंतरजातीय लग्न केलेली एक ‘ती’ म्हणते, ‘लग्नाआधी जातबित सब झूट’ म्हणणारा तो आता मुलांना त्याचीच जात लावण्याविषयी आग्रही असतो. मग मी काय मिळवलं, जातबित काही नाही म्हणत घरच्यांशी भांडले. हे भांडण ज्याच्यासाठी केलं, त्या नवर्‍यानंच मला तिथंच पुन्हा आणून सोडलं.’

या मैत्रिणीच्या अस्वस्थतेइतकीच दुसरीची व्यथा छळकुटी. ती म्हणते, ‘मुळात मुलगी असणं म्हणजे अख्ख्या घराण्याच्या इभ्रतीचं जोखड आपल्याच खांद्यावर ते काढून ठेवणं अवघड आणि  तथाकथित उच्चवर्णीयांमध्येही जातपंचायतींची दहशत आहेच. ती सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही. आपण जातीबाहेर केलेलं लग्न बहुतेकदा लहान भावंडाच्या विवाहात कायमचा अडथळा होऊन बसतं. मग हा गिल्ट जन्मभरासाठी मनावर गोंदला जातो.’’

एक मित्र तळमळून सांगत होता, ‘आपल्या अजूनही पुरुषसत्ताक असलेल्या समाजव्यवस्थेत घरातला मोठा मुलगा हा भविष्यातला ‘कर्ता पुरूष’ असतो. त्यानं घेतलेला हा चौकटीबाहेरचा निर्णय आई-वडिलांना सांधा निखळून पडल्याच्या भावनेपर्यंत आणून पोचवतो. पुरुषपणाचे काच दिसत नाहीत.. सांगताही येत नाहीत.. मग नेहमीच खंबीर, पोलादी पुरूष असण्याचं ‘बेअरिंग’टिकवून धरणं हेच एक आव्हान होऊन बसतं..’

बाहेरचं क्षणाक्षणाला कात टाकणारं वेगवान जग, त्याला कवेत घेऊ पाहण्याचा प्रयत्न एकीकडं आणि एरवी रोजच्या जगण्यात तशा ‘सेलेबल’ नसणार्‍या जात, कूळ, कुंडली या बाबींना अचानकच आलेलं महत्व. या सगळ्या विरोधाभासांना हाताळताना निर्माण झालेला संघर्ष, अवघड होत चालली आहे तरुण मुलामुलींसाठी ही घुसमट. ती कुणाला दिसत नाही. आंतरजातीय लग्नाला सरावलेल्या समाजात आजही परक्या जातीच्या मुलाच्या किंवा मुलीच्या प्रेमात पडणं ही सुळावरची पोळीच आहे.
….आणि तरीही हट्टानं आपली वाट निवडणारे आहेत, हे ही महत्त्वाचं.!

लेख  साभार – http://www.lokmat.com/storypage.php?catid=31&newsid=976

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.