‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग २) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे

आंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या लेखाचा पहिला भाग तुम्हाला आवडला असेलच.  या विषयावर ‘आयसोच’ ने एक कार्यशाळा आयोजित केली होती. यासाठी ‘भारतीय महिला फेडरेशनच्या कोल्हापूर’ च्या जिल्हाध्यक्ष तसेच, ‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्र, कोल्हापूर’ च्या सचिव, प्रा. डॉ. मेघा पानसरे यांना आमंत्रित केले होते. उपस्थित युवकांचा खूपच चांगला प्रतिसाद आणि सहभाग होता. खूप छान चर्चा रंगली. या सत्रामध्ये युवक-युवतींनी त्यांच्या मनातील या विषयाबद्दलच्या शंका अगदी मनमोकळेपणाने विचारल्या. त्यांनी विचारलेले प्रश्न आणि डॉ. मेघा पानसरे यांनी दिलेली उत्तरे वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.

तुमच्याकडे  आंतरजातीय/धर्मीय लग्न करण्यासाठी जेव्हा मुलं-मुली येतात तेव्हा ते एकमेकांशी योग्य आहेत का, हे तुम्ही पाहता का?  

आमच्याकडे जेव्हा लग्न करण्यासाठी मुलं मुली येतात, तेव्हा आम्ही त्यांची सविस्तर माहिती घेतो. त्यांची परस्पर पूरकता, त्यांचे भविष्यातील नियोजन याविषयी त्यांना विचार करायला लावतो. एखाद्या नात्यामध्ये त्यांनी आणखी थोडा वेळ घेण्याची आवश्यकता आहे असे वाटले, तर त्यांना तसंही सुचवितो. अनेकदा नोकरी शोधायलाही मदत करतो. मात्र हा वेळ घेत असताना, मुख्य प्रश्न खरंतर मुला-मुलींच्या आई वडिलांचा असतो. बहुतेक आई वडील आपल्या मुलांचं बाहेर काहीतरी (प्रकरण?) आहे, हे समजताच त्यांचं लग्न लावून देण्याच्या मागे असतात.

सैराटच्या निमित्ताने अलीकडे असे मेसेजेस पसरवले गेले की, ‘आर्ची आणि परश्यासारखं पळून जाऊन लग्न करून, करिअर सोडून, शिक्षण सोडून असं हालाखित जगण्यापेक्षा तुम्ही शिका, अभ्यास करा.’ यावर तुमचे काय मत आहे?

आमचा प्रश्न असा आहे की, आमच्याकडे जे आर्ची परश्या येतात त्यांना पळून जायला लावणारे कोण आहेत? त्यांना काही शिकायची इच्छा नाही का? स्वतःच्या पायावर उभं राहायची इच्छा नाही का? पण आईवडील, समाज त्यांना कळत-नकळतपणे असं सांगतात की, तुम्ही जर पळून गेला नाहीत, तर आम्ही पटकन तुमचं लग्न लावून देऊ. म्हणूनच त्यांना पळून जाणं भाग पडतं. हा निर्णय आतताईपणे घेण्यासाठी, खरंतर ते जबाबदार नाहीत तर कुटुंबव्यवस्था आणि समाजव्यवस्था जबाबदार आहे. ‘तुम्ही आर्ची- परश्याचा आदर्श घेऊ नका’, असे मेसेजेस पसरवले जातात आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अशा लग्नाला विरोध केला जातो. एक विशिष्ट विचारसरणी आणि यंत्रणा, आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांच्या विरोधात काम करत आहे. जाणीवपूर्वक दिशाभूल करणारे, चुकीचे मेसेजेस तयार करून सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून समाजामध्ये पसरवत आहे. असे मेसेजेस जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा त्याचा अर्थ, त्याचा समाजावर होणारा परिणाम आणि तो मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा उद्देश या गोष्टींचा विचार करूनच आपण तो पुढे पाठवायचा की नाही, हे ठरवले पाहिजे. अशा दिशाभूल करणाऱ्या मेसेजेसवरून आपले मत बनवण्यापेक्षा, यावर सविस्तर चर्चा करायला पाहिजे. यासाठी संवाद हा उत्तम मार्ग आहे.

असे अनेक आर्ची आणि परश्या आहेत. त्यांना जर कुटुंबाचा आणि पालकांचा पाठींबा मिळाला, तर ते खूप चांगलं करिअर घडवू शकले असते. आर्चीसारख्या मुलींच्या बाबतीत पालकांनी, ‘ठीक आहे. तुला तुझ्या मर्जीने लग्न करायचं आहे कर. थोडे दिवस शिक्षण घे, करिअर कर. तोपर्यंत जर तुमचं प्रेम टिकलं तर आम्ही पाठींबा देऊ’. अशी भूमिका घेतली तर आर्ची आणि परश्या उत्तम करिअर घडवू शकतील. प्रेमविवाह, आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह टिकत नाहीत असं म्हंटलं जातं याबद्दल तुमचं काय मत आहे?  

खरंतर, विवाह संस्थेवरच प्रश्नचिन्ह आहे. आम्ही ‘महिला सहाय्यता केंद्र’ चालवतो. या केंद्रात अनेक महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी घेऊन येतात. यातील बहुत्वांशी लग्न ही कुंडली, जात, गोत्र, गुण बघून केलेली असतात. यातील बऱ्याचशा महिलांना घटस्पोट हवा असतो. मग ठरवून केलेली ही लग्न अयशस्वी का होतात? पण यावर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. खरंतर, लग्न नक्की कशामुळे यशस्वी होतात? याचा आपण विचार करायला पाहिजे.

लग्नव्यवस्थेवर जर तुमचं प्रश्नचिन्ह असेल तर लिव- इन- रिलेशनशिप मध्ये राहणं हा चांगला पर्याय आहे असं तुम्हाला वाटतं का?

तो ज्याचा-त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे. एखाद्याला असं वाटत असेल की, आम्ही परिपक्व आहोत, सज्ञान आहोत, आमचा एकमेकांवर विश्वास आहे आणि आम्हाला कायदेशीर चौकटीची गरज नाही तर त्यांनी परस्पर संमतीने एकत्र राहायला काहीच हरकत नाही. तरुण मुलगा-मुलगी उच्चशिक्षित आहेत, स्वतःच्या पायावर उभे आहेत, स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत तर त्यांनी असा निर्णय घायला काय हरकत आहे ? अशा प्रकारामध्ये बऱ्याचदा नैतिक- अनैतिक, बरोबर की चूक या गोष्टी येतात. आपण नैतिक-अनैतिकतेच्या आपल्या संकल्पना तपासून बघितल्या पाहिजेत. अशा नवीन प्रकारच्या नात्यांची उत्तरं  आपल्याला काळानुरूप मिळतील.

आधुनिक काळात अनेक मुलं-मुली एकटे आहेत. एका टप्प्यानंतर मानवी नात्यांची, मदतीची गरज आहे ते एकत्र राहतात. एकमेकांना आधार देण्यासाठी स्त्री-पुरुषांनीच आणि विवाहाच्याच नात्यामध्ये एकत्र राहिले पाहिजे असे नाही. सहजीवनाची, मानवी नात्यांची, मदतीची आणि आधाराची गरज पूर्ण होत असेल, तर परस्पर संमतीने कोणीही कोणासोबत राहू शकतं.

आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. जे लोकशाहीचे तत्व आपण समाजामध्ये मानतो, ते कुटुंबातही मानलं पाहिजे. तसंचं व्यक्तिगत जीवनात देखील लोकशाही असली पाहिजे. आजच्या कुटुंबव्यवस्थेमध्ये लोकशाही नाही. कुटुंबव्यवस्था विषमतेवर आधारित, पुरुषसत्ताक आहे. या व्यवस्थेमध्ये स्त्रिया आणि लहान मुलं दुय्यम आहेत. आम्हाला असं वाटतं की, कुटुंब व्यवस्थेची पुनर्रचना झाली पाहिजे. निर्णय घेताना प्रत्येकाच्या मताला तितकाच आदर पाहिजे.

कुटुंबरचनेतून तयार झालेली विवाहसंस्था देखील लोकशाहीवर आधारित नाही. प्रचलित विवाहपद्धतीमध्ये जात, धर्म, मालमत्ता, बाह्यरूप, कुंडली, हुंडा या गोष्टींचा विचार केला जातो. मुला- मुलींना काय वाटतं? त्यांच्या आयुष्याच्या कल्पना काय आहेत? याचा फारसा विचार होताना दिसत नाही. मग ही लोकशाही आहे का? आपल्या घटनेने १८ वर्षावरील मुलगी आणि २१ वर्षावरील मुलगा यांना आपल्या मर्जीने  जोडीदार निवडीचा अधिकार दिलेला आहे. मात्र त्याची अंबलबजावणी होताना दिसत नाही. जोडीदार निवडीचे अधिकार कुटुंबाकडे आहेत. जे जे याविरुद्ध बंड करू इच्छितात, त्यांना संघर्षाला सामोरं जावं लागतं.

माझं वैयक्तिक मत असं आहे की, आजच्या समाजाला कुटुंबाची गरज आहे. आजही व्यक्तीच्या आयुष्यात कुटुंबव्यवस्थेचे महत्व आहे. आपण स्पर्धेच्या जगात जगतो, ताण-तणावांना सामोरं जातो, संध्याकाळी घरी गेल्यावर आपल्याला बरं वाटतं, सुरक्षित वाटतं. कुटुंबामध्ये आईवडील, भावंडं, नातेवाईक, प्रेम आणि एक प्रकारची उब आहे. आजही आनंदानं जगता येण्यासाठीची कुटुंब ही एक जागा आहे. म्हणूनच आज ती टिकून आहे. कुठलीही व्यवस्था टिकून राहण्यामागे काहीतरी उददेश असतो, तो उददेश साध्य होत नसेल तर व्यवस्था मोडकळीस येऊ शकते. हा नियम अर्थातच कुटुंबव्यवस्थेला देखील लागू आहे.

क्रमशः

(या सत्रामध्ये युवकांनी विचारलेल्या इतर प्रश्न आणि त्याला मेघा पानसरे यांनी दिलेली उत्तरे वाचण्यासाठी ३ नोव्हेंबर २०१६ ला वेबसाईटला अवश्य भेट द्या. )

या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

  1. Shriniwas says:

    जर एखाद्या एकटीच असलेल्या विधवेस मदत हवी असल्यास संपर्क करावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap