‘लेट्स सोच – एक नया नजरिया’
तथापि ट्रस्टने आयोजित केलेल्या ‘आय सोच- चला लैंगिकतेवर बोलूया’ या उपक्रमा अंतर्गत आयोजित केलेल्या ‘लेट्स सोच – एक नया नजरिया’ हा कार्यक्रम ११ फेब्रुवारी २०१७ या दिवशी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ तील अभिनेत्री सखी गोखले व अभिनेता सुव्रत जोशी, लवमॅटर्स या वेबसाईटच्या गुंजन शर्मा, बिंदुमाधव खिरे, मुकुंद किर्दत, शकुंतला भालेराव व प्रा. वैशाली नाईक उपस्थित होते.
महाविद्यालयीन मुला-मुलींशी लैंगिकता या विषयासंबंधात एकत्र येऊन चर्चा करणे, त्यांचा दृष्टीकोन समजून घेणे, त्यांच्या शंका-कुशंकांना वाट मोकळी करून देणे व लैंगिकतेविषयी सकारात्मक संदेश पसरवून, एक निकोप समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने ‘आय सोच- चला लैंगिकतेवर बोलूया’ हा उपक्रम मागील तीन वर्षापासून राबविण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात, सत्र आणि कार्यशाळा, युवकांशी संवाद, मानवी साखळी, हिंसाचार विरोधी अभियान यांसारख्या माध्यमातून पुणे परिसरातील जवळजवळ ३० कॉलेजेस आणि ५००० पेक्षा अधिक युवकांपर्यंत पोहचता आले. याच प्रकल्पाचा भाग म्हणून तथापिनं letstalksexuality.com ही लैंगिकतेवर बोलणारी पहिली मराठी वेबसाईट सुरु केली असून त्याला वाचकांचा विशेषत: तरुण वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बेंगलोरमध्ये सामुहिक छेडछाडीची घटना घडली आणि समाजामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटल्या त्याविषयीचा परिसंवाद झाला. यामध्ये मुकुंद किर्दत, शकुंतला भालेराव व प्रा. वैशाली नाईक आणि नबिना, ही विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाली होती. झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ हा कार्यक्रम तुम्ही पहिला असेलच. यातील रेश्मा आणि स्कॉलर म्हणजेच सखी गोखले आणि सुव्रत जोशी या नावाजलेल्या कलाकारांची मेधा काळे यांनी मुलाखत घेतली. लवमॅटर्स या वेबसाईटवर उत्तरं देणाऱ्या गुंजन शर्मा यांनी युवकांसोबत संवाद साधला. उपस्थित युवकांनी अगदी मनमोकळेपणाने त्यांना प्रश्न विचारले. वेबसाईटवर आलेल्या प्रश्नांमधून लैंगिकतेबद्दलच्या अनेक गैरसमजुती आमच्या समोर आल्या. याविषयी समलिंगी समुदायासोबत काम करणाऱ्या समपथिक ट्रस्टचे संस्थापक ‘बिंदुमाधव खिरे’ यांनी लैंगिकतेबद्दलच्या गैरसमजुती आणि अंधश्रद्धा याविषयावर संवाद साधला.
‘कामाच्या ठिकाणी लैंगिक छळविरोधी सामितीसाठी’ मार्गदर्शक पुस्तिका आणि या प्रकल्पाअंतर्गत बनविल्या गेलेल्या व्हिडीओ DVD च्या प्रकाशनाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित वक्त्यांनी मांडलेले विचार, महत्वाचे मुद्दे लवकरच वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येतील.