लैंगिकतेवर बोलू सारे… नेहा महाजन

2,502

लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन रुजवण्यासाठी त्याविषयी मनमोकळेपणाने बोलणे ही पहिली पायरी आहे. पण लैंगिकता म्हणजे फक्त सेक्स किंवा लैंगिक संबंध नाही. लैंगिकतेबद्दल बोलणं म्हणजे आपल्या मनातील शंका, विचार, भीती, उत्सुकता व्यक्त करणं. त्यासाठी मनमोकळ्या संवादाची, विश्वासाची एक जागा  (स्पेस), हवी असते. मागच्याच वर्षी तथापि संस्थेनं ने  letstalksexuality.com  ही वेबसाईट खुली करून अशीच एक स्पेस निर्माण केली. याला आता  पुढच्याच महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. या वेबसाईटचं उद्घाटन अभिनेत्री नेहा महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याप्रसंगी त्यांनी व्यक्त केलेलं मनोगत… 

लैंगिकतेची संकल्पना आपल्यामध्ये इतकी खोलवर रुजली आहे,  की  आपण एक लैंगिक प्रजाती आहोत, याचं शास्त्रीय आणि प्रामाणिक विश्लेषण करणं हे फारच दुर्मिळ होऊन जातं. आपण एक लैंगिक प्रजाती आहोत असं म्हणणं हे आपण एक “माणूस’ आहोत अस म्हणण्याइतकच सहज आहे.

जेव्हा मी sexuality म्हणजे नक्की काय? असा प्रश्न स्वतःला विचारला तेव्हा लक्षात आलं, की Sex  किंवा sexuality या शब्दांना मराठी भाषेत शब्द उपलब्ध असूनदेखील बोली भाषेत त्यांचा वापर करताना इंग्लिश शब्दच वापरले जातात. त्यामुळे तथापिने आय सोच प्रकल्पांतर्गत लैंगिकतेबद्दल माहिती देणारी वेबसाईट मराठी भाषेत सुरु करून खूप महत्वाचं काम केलं. ज्यामुळे लैंगिकता किंवा सेक्स यासारख्या विषयांवर आपल्याला स्वतःच्या भाषेत सहजरित्या आणि वैचारिक चर्चा करता येऊ शकेल.   लैंगिकता आपल्या सर्वांच्या आयुष्याचा महत्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. एक जिवंत माणूस म्हणून आपली स्वतःची  व्याख्या करण्यात लैंगिकतेची फार महत्वाची भूमिका असते. मला कशाचं आकर्षण वाटतं, कशामुळे दुःख होतं, कशामुळे रडू  येतं, कोणत्या गोष्टींबद्दल मला उत्सुकता वाटते, माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टींना मी प्राधान्य देते, कोणत्या गोष्टींबद्दल मला प्रेम वाटतं, कोणत्या गोष्टींनी मी भारावून जाते; या सगळ्यामध्ये लैंगिकता असते. थोडक्यात आपल्या संपूर्ण  आयुष्याचं सार म्हणजे लैंगिकता असं मला वाटतं.

लैंगिकतेविषयी वाचताना वर्तमान पत्रात प्राथमिक शाळेपासून नेदरलँडने मुला-मुलींना लैंगिकता शिक्षण देण्यात घेतलेल्या पुढाकाराविषयीची बातमी होती. इथं नमूद करण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे या पुढाकारामध्ये  ‘लैंगिक शिक्षण’ नाही तर ‘लैंगिकता शिक्षण’ असंम्हटलं गेलं आहे. सेक्स हा लैंगिकतेचा महत्वाचा भाग असला, तरी लैंगिकता ही त्याहून व्यापक संकल्पना आहे. नेदरलॅंडमधील लैंगिक शिक्षण अभ्यासक्रम बनवण्यात महत्वाची भूमिका घेतलेल्या डच सेक्शुअॅलिटी रिसर्च इन्स्टिटयुट (Sexuality Research Institute) चे व “युवा आणि लैंगिक विकास’  विषयातले तज्ञ ineke van der Vlugt यांच्या म्हणण्यानुसार, लैंगिकता ही स्व -प्रतिमा आहे, जी आपली स्वतंत्र ओळख विकसित करत असते. लैंगिकता म्हणजे स्वतःला व्यक्त करायला, आपल्या इच्छा, आपल्या मर्यादा व्यक्त करायला शिकणं.

बऱ्याचशा हिंदी सिनेमांमध्ये एक प्रसिध्द डायलॉग ऐकायला मिळतो, “हम औरत जात है, ये तो हमारे नसीब में लिखा है.’ परंतु जर का सामाजिक बंधनं आपलं नशीब ठरवू लागली तर लैंगिकता या विषयावर  संवाद होणं फार कठीण आहे.आपल्या लैंगिक भावना मुक्तपणे प्रकट करणे आणि लैंगिकतेविषयी शास्त्रीय माहिती मिळण्यासाठी आपण आपल्या लैंगिकतेचा शोध घेताना येणाऱ्या समस्यांवर उघडपणे बोललं पाहिजे. स्वतःच्या लैंगिकतेसंबंधात गोंधळलेली एखादी व्यक्ती आणि कोणत्याही प्रकारची दडपशाही या दोन गोष्टी एकमेकांत विरोधाभास निर्माण करतात, (ती लैंगिक दडपशाही का असेना!)लैंगिक क्रियेला यांत्रिक होण्यापासून टाळण्याकरिता, त्याविषयी तर्कशील, तात्त्विक आणि सारासार वैचारिक चिंतन होणं गरजेचं आहे. मनुष्य प्राणी म्हणून प्रेम, कुटूंब, प्रजनन या क्रियांविषयी आपल्या कल्पना खूपच क्लिष्ट असतात. कामातुर व्यक्ती आणि लैंगिकतेची जाणीव असणारी व्यक्ती यांच्यात नक्कीच फरक आहे. लैंगिकता म्हणजे संभोग क्रियेविषयी अतिउत्साही असणं असा अर्थ!!! (जरी काही व्यक्तींसाठी ते खरं असलं तरी!) सोप्या भाषेत बोलायचं तर मनुष्य प्राणी म्हणून आपली लैंगिकता समजून घेणं; म्हणजेच आपल्या स्वतःला, आपल्या लैंगिक इच्छांना आणि आपल्या लैंगिक प्राधान्यांना समजून घेणं. आपलं लैंगिक प्राधान्य आपल्या आयुष्यातील उद्दिष्टांवर खूप प्रमाणात अवलंबून असतात, त्यामुळेच कोणत्याही लैंगिक क्रिया  केवळ यांत्रिक आणि सुखदायी स्वरूपात प्राप्त होत नाही. जर कोणतीही लैंगिक क्रिया केवळ यांत्रिक आणि सुखदायी स्वरूपामध्ये राहिली, तर त्याचा दुष्परिणाम म्हणून एखादी व्यक्ती लैंगिक बंधनांधून मुक्त न होता सापळ्यामध्ये अडकण्याची शक्यता निर्माण होते.

सामाजिकदृष्ट्या योग्य अशी स्त्रीची प्रतिमा कशा ना कशा प्रकारे मांडली जाते, तिथे समस्या निर्माण होते. उदा. आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांध्ये अतिशय काळजीपूर्वक फेरफार करून तयार केली जाणारी स्त्रीची प्रतिमा. स्त्री जी आधुनिक आहे, तरीही सामाजिक नैतिकता पाळणारी; लैंगिक इच्छा आहेत, तरीही सामाजिकदृष्ट्या सद्‌गुणी असणारी; दिसायला सेक्सी आहे, पण एक आदर्श  पत्नी आणि आई आहे. भारतीय संस्कृतीचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी स्त्रियांवरच आहे, अशी समाजाची समजूत आहे. हा दांभिक विचार केवळ समाजाने तयार केलेल्या भारतीय स्त्रियांच्या एकनिष्ठ, नैतिक, सदाचरणी, आधुनिक, विनम्र प्रतिमेतून आलेला नसून लैंगिकतेच्या दृष्टीकोनातून या पैलूंकडे न पाहिल्याने विस्कळीतपणा आला आहे. स्त्रिया या केवळ इच्छापूर्ती करणाऱ्या वस्तू नाहीत, तर लैंगिक इच्छापूर्तीसाठी पुरुष जितका महत्वाचा, तितकीच स्त्री महत्वाची आहे आणि हे मान्य करण्यात कसलाही कमीपणा बाळगण्याची गरज नाही.

आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही कारणांनी प्रभावित करणाऱ्या, आपल्या लैंगिकतेविषयी सहजपणे बोलता यावं यासाठी समाजाने घातलेल्या बंधनांना, निती-मूल्यांना, रूढी-परंपरांना बारकाईने आणि बुद्धीला पटेल असे तर्कसंगत प्रश्न विचारणे जरुरीचे आहे. स्त्री पुरुष दोघांनी एकत्रितपणे निकोप समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न  करण्याची गरज आहे. यासाठी आय सोच ने घेतलेला पुढाकार नक्कीच उपयोगी ठरेल, अशी खात्री वाटते.

अनुवादः निहार सप्रे

साभार: तथापिचा जिव्हाळा/अंक 40, जुलैसप्टेंबर 2015

Comments are closed.