समलैंगिकांच्या मागण्यांचा जाहिरनाम्यात समावेश करा

समपथिक ट्रस्टच्या वतीने सर्व पक्षांना पत्र

1,022

न्यायालयाच्या आदेशानंतर ३७७ कलमात सुधारण केल्याने तृतीयपंथी आणि समलैंगिकांना न्याय मिळाला आहे. कायद्यात बदल करून संरक्षण मिळाले असले तरी समाजात सर्वमान्यता मिळण्यासाठी व वारसा हक्क, मेडिक्लेम किंवा अन्य विविध मागण्यासाठी राजकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होण्याची गरज आहे. यासाठीच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात तृतीयपंथी व समलैंगिकांच्या मागण्याचा समावेश करावा, यासाठी समपथिक ट्रस्टच्या वतीने सर्व पक्षांना पत्र देण्यात आले आहे.

समपथिक ट्रस्टचे संस्थापक बिंदुमाधव खिरे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता समलैंगिकत्व गुन्हा नाही. यामुळे समलैंगिक नात्याला कायद्याने संरक्षण मिळाले आहे. भविष्यात आपल्या एकूण कायद्यांमध्येच मोठ्या प्रमाणात बदल करावे लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांना लेखी पत्र देऊन तृतीयपंथी व समलैंगिक लोकांच्या विविध मागण्यांचा सामावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यामध्ये प्रामुख्याने समानलिंग भागीदारी व नागरी संघटना कायदेशीर ओळख मिळावी यासाठी प्रयत्न करावा, एलजीबीटीआयसाठी व्यापक भेदभाव विरोधी कायदा करावा. याशिवाय ट्रान्सजेंडर विधेयक व सरोगसी विधेयकामध्ये असलेल्या तृटी दूर करण्याची मागणी केली आहे. यासाठी भाजप, काँग्रेस आणि सीपीआय या राजकीय पक्षांना लेखी पत्र देण्यात आले असल्याचे बिंदुभाधव खिरे यांनी सांगितले.

बातमीचा स्त्रोत : लोकमत

Comments are closed.