प्रेमात पडण्यापूर्वी पुलाखालून गेलेले पाणी

1,350

प्रेम काही कारणाने फिसकटणं, त्यातून नैराश्य येणं, म्हटलं तर अपघात. अशा घटनांत “नेमकं कुणाचं चुकलं?” हा विषय नेहमीचा. खूप अनुभवातला. साहित्य कलांनी अनेकदा हाताळलेला. प्रत्येक ‘तो’ आणि ‘ती’ यांच्याप्रमाणे भिन्न वळणे घेणारा. त्यांच्यातील विविधता दुरून पाहताना मोहविणारी. म्हणून तर मानवी इतिहासभर प्रेमकहाण्या अंकुरत आल्या आहेत. काही तपशील समान. त्यामुळे अनेक तपशील आणि वळणे भिन्न असूनही नवी प्रेमकहाणी आपल्याला समजते. वेगळेपण समजतंय असं वाटता-वाटता कधी चकवाही देते. स्वतःच जर कहाणीतील त्या ‘तो’ किंवा ‘ती’पैकी कोणी असलो, तर ती कहाणी अनुभवताना दुविधेत टाकते. म्हणूनच या नात्यातील गुंतागुंतीची व्यक्तिप्रमाणे बदलणारी समजही अतिशय मोलाची. या फरकांच्या अनुभवांतून व्यक्तिमत्वाला आकार मिळत असतो. नात्यातील गुंतागुंत, त्यातून वाट्याला येणारे अपेक्षाभंग, शेवटी दुसऱ्याच्या वर्तनावर ‘न्यायनिवाडा करण्यापर्यंत’ मजल जाणं. दुसऱ्या शब्दांत नात्यात कटुता निर्माण केल्याशिवाय ते तोडता न येणं. यातच कुठे तरी गफलत आहे.

ती कसली गफलत आहे, हे कळण्यासाठी आपापल्या मनात वेळोवेळी काय काय चालले होते, याचा ‘तो’ आणि ‘ती’ या दोघांनीही प्रांजळ आढावा स्वतःशी घेतलेला असतो काय? असेल तर घेतलेला प्रांजळ आढावा एकमेकांपर्यंत पोहोचविलेला असतो काय? नसेल तर तो वेळोवेळी आपसूक दिसतो काय? काही महिन्यां-वर्षांच्या नात्यातील ही गुंतागुंत आणखीन थोड्या विस्ताराने आणि जास्त नजाकतीने दिसत नसली तरी कल्पनेने रंगविता येते काय? पाहूयात का?

होकार गृहीत धरून लिहितोय. ‘त्याला’ ‘ती’ किंवा ‘तिला’ ‘तो’ भेटण्यापूर्वी दोघांच्याही पुलाखालून बरेच पाणी गेलेले असते. दोघांनीही जन्मापासून परिसर भाषा आत्मसात करायला सुरुवात केलेली असते. कुठलीही भाषाच येत नसल्याने आयुष्याच्या पहिल्या काही महिन्यांतील घटनादेखील आपल्या लक्षात रहात नाहीत. नंतर मात्र भाषा समजू लागते आणि वापरता येऊ लागते. अनेक कल्पना मनात उतरु लागतात. स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि आजूबाजूचे वातावरण समजून घेण्यासाठी भाषा यावीच लागते. जन्मेल्या बाळाला आपण मुलगा / मुलगी आहोत, याचे अंधुक भान यायलादेखील दोन-तीन वर्षे जावी लागतात. त्यासुमाराला (मोकळीक वाटली तर) ते आजूबाजूच्या मोठ्यांना तू ‘मुलगा’ (पुरुष) आहेस का ‘मुलगी’ (स्त्री) आहेस असे विचारून खात्री करून घेताना आढळते. त्यातून त्याची स्वतः कोण आहोत याचीही जाणीव विकसित होत असते. भाषेचे लिंगसापेक्ष व्याकरण आणि कपड्यांतील तसेच खेळण्यांतील फरकांची सोबत आपणां सर्वांचीच लैंगिक जाणीव विकसित करत आलेली आहे. असे होत-होत प्रत्येक काळाच्या टप्प्यावर बदलत आलेले लिंगभाव जन्मलेल्या बाळात विकसित होत असतात. याच काळात त्याला आणि तिला खेळात अनेक सवंगडी भेटतात. काही जास्त आवडतात, तर काही कमी. या आवडीनिवडींची कारणे प्रत्येक मुलाप्रमाणे वेगळी असतात. बघताबघता वयाची आठ-दहा वर्षें उलटतात. वयाच्या या टप्प्यापर्यंत आपण ‘तो’ आहोत का ‘ती’ आहोत, ही लैंगिक ओळख पक्की झालेली असते. राजा-राणी, जादूमय दुनियेतील पऱ्या, आणि घोड्यावरून येणारे ते राजकुमार यांच्या गोष्टींतून लिंगभावाच्या ओळखी झालेल्या असतात. वयाने मोठे स्त्री-पुरुष जोडीदार म्हणून समाजात वावरताना पाहिलेले असतात. काही लग्नांची आमंत्रणे घरपोच मिळालेली असतात. त्यांतून समाजमान्य लिंगभावदेखील बऱ्यापैकी स्पष्ट होऊ लागतो. या वयात आवडीच्या सवंगड्यांतून धूसरपणे का होईना पण जोडीदाराच्या शोधाचा खेळ मनात अनेकदा चालू होतो. व्यक्तीनुसार वयात दोन-तीन वर्षे इकडे-तिकडे होतात, पण हा खेळ चालू होतो. सुरुवातीला तो धूसर असतो. आपल्यालाही समजलेला असतोच असे नाही. तो खेळ स्वतःशी मान्य करण्यासाठी आणखीन दोन-चार वर्षे जातात. वयाच्या १२-१५ वर्षांपर्यंत अभिनय, शालेय अभ्यास, संभाषण, वक्तृत्व, चित्रकला, संगीत अशा काही क्षेत्रांत थोडीबहुत कौशल्येदेखील प्राप्त झालेली असतात. जोडीला आपण जसे दिसत असतो तसे चांगले आहोत, हे मनापासून स्वीकारले असेल तर आपल्याला समाजात वावरताना, संभाषण करताना एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. त्यामुळे आपणही आकर्षक दिसत असतो. कळतनकळत काही जणांची संगत हवीशी वाटते. सवंगडी, वर्गमित्र / मैत्रिणी, शेजारची मुलें-मुलीं यातून खेळ, अभ्यास अशा अनेक ठिकाणी निवड होते. ही साद घालण्याची आणि प्रतिसाद देण्याची पहिली पायरी असते. आपल्याला मन आहे तसेच शरीर आहे. दोन्हींची हातात-हात घालूनच तर वाढ झालेली असते. मन-शरीर या दोन्हीपैकी फक्त मन जसे असू शकता नाही, तसे फक्त जिवंत शरीरही असू शकत नाही. म्हणूनच शारीरिक आकर्षणदेखील खुणावत असते. या टप्प्यावर आवडणाऱ्या मैत्रीत प्रेमाचाही थोडाबहुत शिडकावा होत असतो. कळाल्यावरदेखील तो नाकारणे ही स्वतःचीच प्रतारणा ठरते. हे खरे आहे की, अजून आयुष्यभराचे जोडीदार होण्याची कमिटमेंट देण्याच्या समेवर मैत्री अनेकदा आलेली नसते. कधी आली आहे असे वाटले, तरी दुसऱ्या मुला-मुलीचे मन त्याच वेळी समेवर आलेले नसते. तोवर वाट पाहिली पाहिजे, हे अंधुकसे कळते. कधी वळते, कधी वळत नाही.

ही जी मानसिक वाढीची प्रक्रिया आहे, तिची दखल सर्व बारकाव्यांनिशी स्वतःच घेतली पाहिजे. त्याबद्दल स्वत:शी मनमोकळा आणि प्रामाणिक विचार होत असला तर आणि तरच याबाबत दुसऱ्याच्या संदर्भात न दुखावणारी स्पष्टता येऊ शकते. वाढीच्या भिन्न टप्प्यांवरील छायाचित्रांतून वाढीचे टप्पे छायांकित होतील. परंतु जर ती प्रक्रिया समजून घ्यायची असेल, तर चलतछायाचित्रण लागेल. ते मनात घोळत असेल तर परस्परांना आयुष्याच्या जोडीदारीचा शब्द देणे शक्य होईल. नकार पचविता येतील. एकमेकांवर दोषारोप होणार नाहीत. विचारपूर्वक दिलेला शब्द मागे घेण्याची मुभा राहील. जोडीदाराने दिलेला शब्द मागे घेतला तरी सोबत घालविलेल्या काळाची आठवण मनात चांगल्या भावना उजळवीत रेंगाळेल. पहिल्या प्रेमाला चूड लावूनच दुसरे प्रेम साकारण्याची गरज उरणार नाही. सामाजिक दडपण दूर करण्याची गरज व्यक्ती आणि तरुणाईच्या पातळीवर जाणवेल. त्या दिशेने काही सामाजिक कृती घडतील. किमान अशा कृती घडण्याची गरज प्रकर्षाने जाणवेल. हा देखील आपण मोठे होण्याच्या प्रक्रियेचा छोटासा शब्दपट रेखटणे बनेल. ‘तरुणाईमुळे नेहमीच सामाजिक बदल घडत आले आहेत’, या इतिहासामागील एक कारण प्रेम हा अडीच अक्षरी शब्ददेखील आहे.

प्रकाश बुरटे

prakashburte123@gmail.com

Comments are closed.