कथा उत्कट प्रेमाची ! – सुनंदा कर्नाड

3,144

मागे वळून भूतकाळात बुडी मारायची नाही, असं मधुराने अनेक वेळा आपल्या मनाला बजावलं होतं. तरीही नकळत डोळ्यांपुढून सरकणाऱ्या फ्लॅशबॅककडे ती पाहत होती. तिला पाहता क्षणीच पसंत करणारा मोहन तिला आठवला.

कोपऱ्यातला तिचा तंबोरा पाहून तो म्हणाला, ‘गाणं शिकता?’ शास्त्रीय संगीताची आपल्याला आवड आहे, असं तिने त्याला सांगताच तो आणखी सुखावला, कारण त्यालाही त्याचं वेड होतं.

‘स्वयंपाकाची आवड आहे की नाही?’ मोहनच्या आईने विचारलं. ‘हो…हो…. आजचा स्वयंपाक मधुरानेच केलाय.’ तिच्या आईनं सावरून घेतलं. ते ऐकून आपल्या पोटाची ही सोय झाली, या कल्पनेनं त्यानं मनाशी निश्चय केला, ‘करीन लग्न तर हिच्याशीच’.

आणखी एक संभाषण आठवलं मधुराला, मोहनने तिला सांगितल्यामुळे. ‘दादा, ही मुलगी तुझ्यापेक्षा जास्त शिकली आहे. शिवाय पीएच. डी. करून करियर करायचं म्हणते, जड जाईल हं तुला !’ तिच्या दिरानं –  मुकुलनं दादाला बजावलं होतं. ‘माझं लाईफ आहे मी पाहीन काय करायचं ते! तू नको काळजी करूस’ दादानं (मोहननं) ठणकावलं.

मधुरानं पहिल्या भेटीतचं होकार देणं नाकारलं. तिला आपला जोडीदार पारखून घ्यायचा होता. शेवटी जन्माची गाठ, ती नीट विचार करून बांधायची होती. तिनं मोहनला भेटायचं ठरवलं. त्यानेही साथ दिली. तिच्या शिक्षणात, करियरमध्ये कसलीही अडचण येणार नाही, असं त्याने वचन दिलं आणि ते पाळलंही..!

मधुराने इंग्रजी विषयात एम. ए. पहिल्या वर्गात पास केलं. एका प्रतिष्ठित महाविद्यालयात तिला लेक्चररची नोकरीही मिळाली. लग्नानंतर तिनं आपलं घर आणि नोकरी व्यवस्थित सांभाळली. मोहन बरोबरचं तिच्या सासू – सासऱ्यांनीही उत्तम साथ दिली. मोहन फार प्रेमळ आणि समजूतदार होता. आपली बायको खूप शिकलीय आणि प्राध्यापिका आहे याचा त्याला खूप आभिमान होता. ती आपल्यापेक्षा जास्त कमावते याचाही त्यानं कधी हेवा केला नाही. उलट पुढे तिनं डॉक्टरेट मिळवावी यासाठी उत्तेजनच दिलं. मोहन जातीचा कलाकार आहे, हे मधुरानेही जाणलं होतं. त्याला शास्त्रीय संगीताची अत्यंत आवड आहे आणि तो ‘गुरूच्या शोधा’त आहे, हे तिला कळल्यावर तिनं त्याला नोकरी सोडायला लावली. तिच्या आग्रहामुळेच मोहन संगीताकडेच वळला. चांगला गुरुही मिळाला आणि खूप मेहनत करून मोहन एक यशस्वी गायक म्हणून ओळखला जावू लागला. हे सगळ मधुराच्या सहकाऱ्याने झालं, याची त्याला जाणीव होती. त्याचं गाणं, तिचं शिकवणं – सारं काही व्यवस्थित चालू होतं. आपल्याला मूल नाही, हे दु:खही दोघं विसरली आणि त्यांचा संसार दृष्ट लागण्यासारखा झाला आणि एक दिवस, मधुरा कॉलेजच्या ट्रीपसाठी बाहेरगावी गेली असताना तिचा निरोप न घेता, भैरवी न म्हणताच मोहन निघून गेला तो कायमचा..!

मधुरा एकाकी झाली. काही क्षण बधीर झाली; पण तिनं सावरलं स्वतःला ती खंबीरपणे उभी राहिली. ‘कुणालाही त्रास न देता, कसल्याही व्याधीनं, यातना न भोगता झोपेतच गेला – किती सुखाचं मरण’ असं म्हणून तिनं स्वतःच सांत्वन करून घेतलं. तिनं गुंतवलं स्वतःला गायन- वाचन–लेखन करण्यात ..! त्यानं ‘गाणं सोडू नको’ म्हंटल्यामुळे पहाटे तासभर तंबोरा घेवून गाण्याचा रियाज तिनं सोडला नाही. दिवस- महिने कसे गेले कळलं नाही तिला. राहत्या घरात मोहनचं तिसरं श्राध्द करून तिनं मुंबई सोडली आणि पुणं गाठलं. हे शहर तिच्या काही मैत्रिणी मुळे फार आवडीचं ..! मराठी नाटकं, फिल्मस्, गाण्याच्या मैफिली आणि क्वचित मैत्रिणींबरोबर रम्मी..!

आणि अचानक एक दिवस तो भेटला एका पार्टीत. एकटाच सिगरेट फुंकत कोपऱ्यात बसला होता. शून्यात दृष्टी लावून. मधुराच्या मैत्रिणीने ओळख करून दिली.

‘मिलिंद, ही माझी मैत्रीण मधुरा. अलीकडेच पुण्यात शिफ्ट झालीय. मुंबईत कॉलेज मध्ये प्रोफेसर होती. आताच अलीकडे रिटायर्ड झालीय. तुम्ही बसा बोलत, मी आलेच.’ ‘बसा. नाईस मिटिंग यू’, मिलिंद हसत म्हणाला.

‘तुम्ही इथंच असता पुण्यात?’ मधुरानं विचारलं.

‘मीही गेल्या महिन्यात रिटायर्ड झालो आर्मीतून. इथं आई असायची. तीही गेली. मी एकटाच असतो माझ्या इथल्या घरात? हाऊ अबाऊट यू?’

‘माझे मिस्टर दोन वर्षापूर्वी गेले. मी दोन वर्ष मुंबईतच राहिले रिटायर्डमेंट ची वाट पाहत. इथं भाड्याचं घर मिळालंय बाणेरला.’

अशा बऱ्याच गप्पा झाल्या. पार्टी संपून परत जायची वेळ झाली तेव्हा मिलिंदनं विचारलं,

‘कॅन आय ड्रॉप यू इफ यू डोन्ट माइंड ?’ त्यानं विचारलं.

‘आय शॅल बी आँबलाइज्ड’ तिनं हसत उत्तर दिलं. मधुराला बाणेरला सोडताना मिलिंदनं पुन्हा भेटण्याची इच्छा दर्शवली.

‘उद्या रविवार काय करताय?  वुड यू लाईक टू जाँईन मी फॉर ब्रेकफास्ट अॅट ९.३०?’ – मिलिंद.

‘आय डोन्ट माईड. तुम्हीच या नं घरी. आय अॅम अ गुड कुक.’ – मधुरा.

‘ओह, दॅट विल बी सुपर्ब. आय विल कम!’

या ना त्या कारणानं दोघं भेटत होती. मधुराला पहिल्या भेटीतच वाटत होतं, अॅज इफ शी हॅड नोन हिम फॉर एजेस.

मिलिंदलाही मधुरा खूप आवडली होती.

साठी उलटलेले दोन एकाकी जीव एकत्र आले होते. दोघांनाही खूप काही बोलायचं होतं. शेअर करायचं होतं. मधुरा नकळत गुंतत गेली, एका उत्कट प्रेमाची प्रचंड लाट अंगावर घेत. नुसता मिलिंदचा विचार तिला अस्वस्थ करू लागला.

स्त्रीच्या प्रेमाला, स्पर्शाला मुकलेला मिलिंद मधुराच्या सहवासात, कधी न अनुभवलेलं मैत्रीचं, मायेचं अतूट बंधन स्वतः भोवती बांधत होता. आता एकमेकांना सोडून राहणं त्यांना अशक्य झालं आणि लग्न नं करता, एकत्र राहण्याचं ठरवलं, एकमेकांचे मित्र म्हणून. त्यांना हवा होता एकमेकांचा सहवास, समजूतदार साथीदार, मायेनं सांभाळणारा (री) कम्पॅनियन. एकमेकांविषयी प्रेम आणि आदर त्यांच्या ‘ लिव्ह इन रिलेशन’ चा भरभक्कम पाया होता. स्वत:चा छंद पुरवायचा आणि एकमेकांना ‘स्पेस’ द्यायची त्यांनी ठरवलं.

मधुराला सासरच्या मंडळीनी तिच्या या निर्णयाचा आनंदानं स्वीकार केला. मिलिंदच्या बाजूनं आडकाठी करणारं कुणी नव्हतं. ‘लोक काय म्हणतील?’ ही भीती मधुराला कधीच वाटली नाही. तिच्या काही मैत्रिणी ‘कम्पॅनियन’ हवा असं उत्कटतेनं वाटत असूनही आतल्या आत झुरत होत्या केवळ या भीतीनं ..! शिवाय मुलांचा विरोध, नातेवाईकांची टीका कशी सहन करायची? पण मधुरा अशा टीकेलाही घाबरणारी नव्हती. ‘माझं उरलंसुरलं आयुष्य कसं जगायचं, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. ते मी ठरवणार, दुसरं कुणी नाही,’ असं तिचं ठाम मत होतं. प्रत्येकानं आर्थिक बाजूही स्वतंत्र ठेवायची, कसलेही कायदेशीर क्लेम्स करायचे नाहीत, असंही ठरवलं. केवळ एकमेकांची काळजी घेणं, साथ देणं, सुखा – समाधानानं आला दिवस ‘बोनस’ म्हणून मजेत जगणं हाच त्यांच्या सहजीवनाचा मंत्र..!

मधुरा – मिलिंदचं एकाकी, भकास वाटणारं जीवन पुन्हा फुललं. त्यात अतूट बंधनाचा निश्चय होता. मायची ऊब होती. एकमेकांना सुखी करण्याची ओढ होती. किती सुंदर हे जीवन. किती गोड हे लिव्ह इन रिलेशन’..!

 

संदर्भ: सुनंदा कर्नाड लिखित सदर कथा ‘मिळून साऱ्याजणी (सप्टेंबर २०१७)’ या मासिकात प्रकाशित झाली होती. 

Comments are closed.