कंजारभाट समाजाने पुन्हा दोन नववधूंची ‘कौमार्य’ चाचणी घेतली. यामध्ये वराचे वडील नंदूरबार येथील न्यायालयातील निवृत्त अधीक्षक असून, वधूचे काका पुण्यातील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती कंजारभाट समाजातील व धर्मादाय आयुक्तालयातील संचालक कृष्णा इंद्रेकर यांनी दिली.
गेल्या महिन्यात इंग्लडवरून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या वराने जातपंचायतीला शरण येत उच्च शिक्षण घेतलेल्या वधूची कौमार्य चाचणी घेण्याला संमती दिली होती. या घटनेनंतर राज्यभरातून अनेकांनी कंजारभाट समाजावर टीकाही केली होती. मात्र, पुन्हा एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या पुतणीला नंदुरबार येथील न्यायालयातील निवृत्त अधिक्षकाच्या मुलाचा तर याच पदाधिकाऱ्याचा पुतण्या व मुंढव्यातील एका कुटुंबातील मुलीचा असे कोरेगाव पार्क येथे विवाह संपन्न झाला.
विवाहाच्या दुसऱ्या दिवशी जातपंचायत भरविली गेली. सदस्यांनी वरांना त्यांची वधू शुद्ध आहे का अशी विचारणा केली. त्यासाठी त्यांनी एकाला ‘तू सात विहिरी ओलांडून गेला. तुला काही अडचण आली काय?’ तर दुसऱ्याला ‘तुझा माल खरा आहे का?’ अशी विचारणा केली. यावेळी दोन्ही वरांनी होकारार्थी मान हलवून संमती दिल्याचे धर्मादाय आयुक्तालयातील संचालक कृष्णा इंद्रेकर यांनी सांगितले.
कुऱ्हाडीचे तप्त पाते हातात देऊन सत्त्वपरीक्षा
जातपंचायतीमध्ये कौमार्य परीक्षेत वधू अपयशी असल्याचे वराने सांगितल्यास वधूला तिचे पालक रात्रभर मारहाण करतात. दुसऱ्या दिवशी तिने कोणत्या मुलाशी संबंध ठेवले याची चौकशी केली जाते.
मुलगा जर समाजातील नसल्यास वधू पित्याला दंड करून विधिवत पुन्हा वधूला समाजात घेतले जाते. मुलगा समाजातील असल्यास त्याला जातपंचायतीसमोर आणून कबूल करायला सांगतात. अन्यथा खरे किंवा खोटे करण्यासाठी वधूच्या हातावर वडाच्या झाडाची पाने ठेऊन त्यावर तप्त कुऱ्हाडीचे पाते ठेवण्याचा विधी आहे. यामध्ये वधूचा हात भाजल्यास ती खोटे बोलते तर हात भाजला नाही तर ती खरे बोलत असा समज जातपंचायतीला असल्याचे इंद्रेकर यांनी सांगितले.
बातमीचा स्रोत : https://www.esakal.com/maharashtra/virginity-test-again-pune-two-brides-came-examination-167977?amp