पुरुष आणि आभासी समानता- आनंद पवार

890

स्त्री-पुरुष विषमतेबद्दल आणि समानतेबद्दल पुरुष कसा विचार करतात? काय वाटतं त्यांना या विषयी? मागील दशकभराच्या अनेक स्तरांतील पुरुषांसोबत समानतेविषयक आम्ही सात्यत्याने करीत असलेल्या कामातून निदर्शनास आलेली काही निरीक्षणे येथे नोंदवणे आवश्यक ठरते. मुळात विषमता- समानता- समता- हिंसाचार ही भाषाच पुरुषांच्या रोजच्या जगण्याची किंवा चर्चेची नसल्याचे दिसून येते अणि अशी भाषाच जेव्हा स्थापित नसते तेव्हा त्या विषयांबाबतचे चिंतनही समाजात होताना दिसत नाही. उदाहरणार्थ, मागील सहा महिन्यांमध्ये आपण आपल्या कुटुंबात लोकशाही, लोकशाही मूल्ये, भारतीय राज्यघटना या विषयी आपल्या कुटुंबीयांशी कधी चर्चा केली आहे का? जर आपण असे बोललो नसू तर त्याचा अर्थ आहे की आपल्या कुटुंबात भारतीय राज्यघटना हा विषय आपण केवळ संसदीय राजकारणाचा समजतो. मात्र कुटुंबांमधील नातेसंबंधात लोकशाही मूल्ये रुजण्याची शक्यता त्यामुळे दुरावताना दिसते. कुठल्याही विषयाची व्यापक चर्चा समाजात स्थापित व्हायची असेल व परिवर्तन घडवायचे असेल तर आधी त्या विषयाची व परिवर्तनाची भाषा स्थापित व्हावी लागते.

आम्हाला असे दिसते की पुरुषांच्या चर्चा विश्वामध्ये स्त्री-पुरुष समानता अथवा स्त्रियांची सुरक्षितता इत्यादीविषयींची भाषाच स्थापित झालेली नाही. खरे तर ‘स्त्री-पुरुष समानता’ असा विषय सुरू झाला की बहुतांशी पुरुषांच्या (आणि तरुणांच्या) मनात ‘आता काय पहिल्यासारखे राहिले आहे का?’ असा प्रश्न येतो. आता समानता आली आहे, स्त्रिया स्वतंत्र आहेत, आता समानतेबद्दल बोलण्यात अर्थ नाही अशा आशयाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसतात. जेव्हा आपण विचारतो की कशाच्या आधारावर त्यांना असे वाटते तर आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ ते व्यावसायिकदृष्टय़ा सबलीकरण झालेल्या इंदिरा गांधी, कल्पना चावला, किरण बेदी, प्रतिभाताई पाटील आदी नावांचा दाखला देताना दिसतात अथवा विमान चालविणाऱ्या, बस चालविणाऱ्या स्त्रियांची उदाहरणे देतात. शिवाय स्त्रिया शिकू लागल्या, कपडे बदलले, पाश्चिमात्य संस्कृती आली. इत्यादी नेहमीचे मुद्देही ते उपस्थित करतात. अर्थात ही सर्व उदाहरणे व दाखले खरे असले तरी ते समानतेविषयी अंशत:च बोलतात हे पुरुषांच्या लक्षात येत नाही. प्रश्न असा आहे देशाच्या सर्वोच्च पदी एक स्त्री असताना स्त्रियांच्या घरकामाच्या बोज्यामध्ये काही फरक पडला होता का त्या पाच वर्षांमध्ये? विमान चालवणारी मुलगी आपल्या कुटुंबात असते का? तर असे दिसून येते की काही उदाहरणांचे दाखले देऊन माझ्या कुटुंबात किंवा आमच्या गावात अशी समानता आली आहे असा दावा अनेक पुरुष करताना दिसतात. अशा ‘आभासी समानते’मुळे मूळ विषमतेच्या विषयाची पुढे चर्चाच केली जात नाही. समानतेचा मुद्दा आला की स्थानिक स्वराज्य संस्थेतील स्त्रियांसाठीच्या पन्नास टक्के आरक्षणाचा मुद्दा पुढे करून ती चर्चा तिथेच थांबवली जाते. त्या पन्नास टक्के निवडून आलेल्या स्त्रियांच्या वतीने प्रत्यक्षात आजही अनेक ठिकाणी पुरुषच नियंत्रण ठेवतात, कारभार चालवतात हा मुद्दा मात्र चर्चेत येत नाही किंवा जाणीवपूर्वक टाळला जातो किंवा आली तरी ते गृहीतच धरलं जातं. आणि ‘आभासी समानतेच्या’ जगात मग पुरुष जगत राहतात. प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने समानतेच्या दिशेने जाणारी एखादी मुलगी -स्त्री जेव्हा झगडताना दिसते तेव्हा मात्र ती ‘आगाऊ’ अथवा ‘जास्त स्मार्ट’ झाल्याचा ठपका तिच्यावर ठेवला जातो. एखाद्या कर्तबगार स्त्रीला मागे खेचण्याची मानसिकता त्यातून दिसून येते. म्हणूनच पुरुषांची समानतेप्रती असलेले आभासी भ्रम समजून घेणे व त्यांना या भ्रमातून बाहेर काढणे महत्त्वाचे ठरते.

anandapawar@gmail.com 

साभार: लोकसत्ता वर्तमानपत्राच्या ‘चतुरंग’ या पुरवणीमध्ये ६ ऑगस्ट २०१६ रोजी प्रकाशित झालेला लेखातील काही भाग. संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

चित्र साभार- http://www.loksatta.com/lekh-news/abhasi-equlityman-and-woaman-1279559/

 

Comments are closed.