मी पाठलाग का करतो…  

– अच्युत बोरगांवकर

1,685

मुलगा १

मी तेव्हा पंधरा-सोळा वर्षांचा असेन. एके दिवशी ती माझ्या वाड्यात राहायला आली. दोघी बहिणी, ही मोठी. पाहताक्षणी ती मला आवडली वगैरे (हार्मोन्स आणि माझ्या सांस्कृतिक मूल्यांनी आपले काम सुरु केले). गोरी, नाकीडोळी वगैरे नीटसहून अधिक, अंगाने वेधक. फॅशनेबल (म्हणून अधिक आवडली असेल कदाचित). वाड्यातील मित्राने लगेच जोडी लावण्याचे इत्यादी सोपस्कार पार पाडले. जवळच्या पंचक्रोशीत गुपचूप दवंडी देऊन झाली. म्हणजे इतर होतकरू उमेदवारांना आगाऊ सूचना दिली गेली (बुकिंग झाल्याची).

मित्रांनी मिळून माझा दिनक्रम ठरवला. रोज सकाळी ती बाहेर पडे त्यावेळेस मी घरासमोर हजर, कुठे बाहेर जात असेल तर मी तिच्या मागे, इतकंच काय ती घरापासून जरा अंतरावर असलेल्या शौचालयात जरी जात असेल तरी मी रस्त्यात. (पथेटिक !) तिच्या हे लक्षात आलेच. तिच्या मैत्रिणींत मी म्हणजे चेष्टेचा विषय बनलो होतो (तेही समजण्याचे माझे वय झाले नसावे कदाचित). कालांतराने मी ते घर सोडले आणि विषय संपला (माझ्यासाठी तो एक हॉर्मोनल विरंगुळा, तिच्यासाठी मात्र डोक्याला ताप).

मुलगा २

तो आणि त्याचा एक मित्र बसमध्ये चढले. तशा त्यांच्या मागे दोन मुलीही चढल्या. त्या दोघींना स्त्रियांसाठीच्या राखीव असलेल्या बाजूला लगेच जागा मिळाली. पण हे उभेच. अगोदर चढून आपल्याला जागा नाही आणि नंतर आलेल्या या मुलींना मात्र जागा वगैरे असं याच्या मनात. प्रवास ३०-४० किलोमीटरचा. त्यांच्यात आणि मुलींमध्ये दोन-तीनदा नजरानजर झाली. बस पुढे जाऊ लागली तसे याला काहीतरी सुचले. हा त्या मुलींकडे टक लावून पाहू लागला. असेच. ते त्यांच्या लक्षात आले असावे. त्या एकमेकींत काही तरी बोलल्या. त्यांच्या चेहऱ्यावर काही निषेधासारख्या भावना दिसल्या नाहीत. याला बळ मिळाले. मित्र कानात काहीतरी बोलला. टकटकी अधिक वाढली. त्या थोड्या सावध झाल्या. त्यांनी दुसरीकडे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला. मुली घाबरल्या आहेत हे त्याच्या लक्षात आले असावे. आपल्याला काही भीती नाही हेही त्याने पूर्वानुभवाधारे ताडले असावे. किंवा ‘बघू काय होतं ते’ असा भाव. पुढील २५-३० मिनिटे तो त्यांच्याकडे पाहत होता, पापणी न लवता. शेवटी त्याच्या डोळ्यातून पाणी आले (त्याला ही एक रोमांचक गोष्ट वाटली). आपण काही तरी पराक्रम केला असे त्याला वाटले. त्या मुली घाबरल्या होत्या, वरती मान करून त्यांनी कधीही पाहिले नाही.

मुलगा ३

मला ती लय आवडायची. भारी वाटायचं ती समोर आस्ताना, नस्तानाबी. ती आवडती या कल्पनेनंच मला आनंद व्हायचा. पन तिच्या ते गावीही नव्हतं. तिची दुनियाच येगळी, माजी येगळी. लई तफावत. मला त्याची चांगलीच कल्पना. ह्या आंतराला, वास्तवाला मी पुरतं मान्य केलेलं. पन तरीबी.. आयुष्यात पहिल्यांदाच कोनीतरी हितकं आवडलं व्हतं. ती ज्या वर्गाला मी तिकडंच, ती लायब्ररीत मी तिथंच, ती मैदानात, मी मैदानात. (इतर पोरं/मित्र निसते कावलेले). कॉलेजमध्ये तर ती दिसायचीच पन ती ज्या शिकवनीला जायची तिथेही मी. संपूर्ण रस्ता काहीएक अंतर ठेवून तिच्या मागं-मागं, न चुकता. तिला कळनार नाही अशा बेतानं. तिलाही ते कधीच कळलं नाही. शक्य असतं तर मनातील स्पष्ट बोललो आस्तो. हो, नाही कायबी चाललं आस्त. पन ते व्हनार नव्हतं. म्हणून जेवडं जमल तेवडं मागं मागं जायाचं, पहात रहायचं. आसं.

मित्रहो,

पाठलाग करणे हे एक सांस्कृतिक मूल्य घेऊन मी मोठा झालो. मीच नाही तर माझी पूर्ण पिढी. कदाचित माझ्या अगोदरची किंवा नंतरची सुद्धा. माझ्यापेक्षा मोठे, त्यांचे मित्र हेच करताना दिसायचे. माझे सर्व आदर्श हिरो टीव्ही सिनेमात हेच करायचे. माझे अनेक देवसुद्धा याच लीलांत सामील. मुली ताडणे, त्यांना पाहून हसणे, शिट्टी मारणे, डोळा मारणे (याचे नेमके अर्थ माहित नसताना सुद्धा) हे पौगंडीय प्राथमिक शिक्षणाचे धडे. पुढे चालून पाठलाग करणे, मागे मागे जाणे, मुलीची छेड काढणे, गर्दीचा फायदा उचलणे आणि शक्य झालेच तर आणखी काही. याचे व्यवस्थित प्रशिक्षण देणारे आजूबाजूला वगैरे. प्रशिक्षणातील प्रगती अनेक गोष्टींवर अवलंबून. सरंजामी मानसिकतेच्या परीवेशाशी तुमचे किती लागेबांधे आहेत, बापाकडे (बापाकडेच) किती पैसा आहे, एखाद्या ‘छाटछुट’ पोलीस केसमधून बाहेर पडता येण्याची किती शक्यता आहे, बदनामी वगैरे सारख्या गोष्टी आपल्यासाठी नाहीतच याची कौटुंबिय जाणीव असणे, आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही इ. अशा त्या गोष्टी. हे असे सर्व करणे म्हणजे मर्द असल्याचे लक्षण. तंबाखू खा, बिअर ने सुरुवात करा, मुली पटवा, ‘नाही’ ला ‘हो’ समजा, धोका पत्करा, काहीतरी (?) करून दाखवा, इ. आमचे लैंगिकतेचे प्रदेश असे बेदरकार, अंदाधुंद आणि भित्रेसुद्धा ! वर आम्ही पुरुष थोराड झालो तरी लैंगिकतेची ही पौगंडीय अवस्था संपायचे नाव घेत नाही हे अजून एक. हरीयाणाच्या मंत्र्याच्या मुलाची जी मानसिकता तीच त्याच्या बापाची..

हे एकीकडे तर दुसरीकडे मुलांनी एकमेकांशी बोलावे, भेटावे, मैत्री करावी, बिनदिक्कत पण विचार करून एकमेकांना मनातील भावना सांगाव्यात, त्यासाठी सुरक्षित जागा असाव्यात   यांसारख्या गोष्टी अशक्य. मंगळावरील असल्याप्रमाणे. अनेक डोंगर, अनेक दऱ्या मध्ये. मुले वयात येतात, शारीरिक-भावनिक बदल होतात, त्यांच्यात आकर्षण निर्माण होते, ते व्यक्त करू पाहतात, भावनिक होतात, ये सब झूट. संप्रेरक वगैरे खोटं. जंबूद्वीप, आर्यावर्तातील मुलांना वयात येण्याची गरजच काय? आमची मुलं नाहीत हो अशी.. संस्कार-बिंस्कार काही आहेत की नाही ? मुलींनी कशाला एवढा वेळ बाहेर राहायचं ? असे वातावरण. बसा बोंबलत. सगळी कवाडे बंद.

नोट – अशा स्थितीत काही आशादायक, आश्वस्त करणारे, सुंदर काही घडावे म्हणून मी एक करत आहे. मी माझ्या घरातील, परिसरातील मुलांशी बोलतो, संवाद करतो, माहिती देतो, मैत्री करतो. त्यांना पाहतो, समजून घेतो ते काय म्हणतात ते. अधिक माणूस होण्यासाठी माझ्या स्वतःत काही बदल करतो. माझी मूल्यं बदलण्याची धडपड करतो. दररोज. खूप लांबचा पल्ला आहे. पाहा, तुम्हीही करू शकाल. कवाडे उघडतील.

Comments are closed.