ज्यांना ‘मित्र’ नाहीत अशा सर्व पुरुष मित्रांसाठी….

1,530

१.

परवा फारच अपसेट झालो होतो. वैयक्तिक कारण. (आपण पुरुष, मनातलं न बोलण्यासाठी, शेअरिंग टाळण्यासाठी हे कारण देत असतो नाही का? स्त्रियांनी केव्हाच ‘पर्सनल इज पॉलिटीकल’ चा स्वीकार केला आहे.) एकटाच कुठेतरी बसलो होतो. काही तरी करायला पाहिजे असं वाटत होतं पण काय ते कळत नव्हतं. मग लक्षात आलं, आपल्याला कोणाशी तरी बोलण्याची आवश्यकता आहे. ‘पण बोलणार कोणाशी?’ मोठा प्रश्न पडला. दोन तीन नावं समोर आली. पण आत्ता ते उपलब्ध असण्याची किंवा त्यांना वेळ असण्याची खात्री नाही वाटली. मी अशात किंवा बऱ्याच वर्षात असं कोणाशी बोललो नव्हतो. नेहमीप्रमाणे हाताचा मोबाईलशी चाळा चालला होता. मोबाईल ऑन केला. मोबाईलच्या संपर्क यादीत ३०० पेक्षा अधिक क्रमांक होते. प्रत्येक क्रमांक पाहिला, अगदी प्रत्येक. आणि फोन ठेवून दिला. मी पूर्ण हादरलो होतो. एकही व्यक्ती नाही जिच्याशी मी बोलू शकतो. अशी एकही व्यक्ती नाही जी निव्वळ माझा फोन आहे, म्हणून काम बाजूला ठेवून पाच मिनिटे माझ्याशी बोलेल. अशा व्यक्ती कधीच नव्हत्या का? त्या होत्या, मग कुठे गेल्या? कुठे तरी हरवल्या, कुठे ते सांगणं अवघड होतं. मला माझीच दया आली.. स्वतःला एक शिवी हासडून मी गाडी चालू केली आणि साधनेच्या पुस्तकालयात पोचलो..

२.

तिथं पुस्तकं चाळत असताना ‘ही व्यवस्था काय आहे?’ हे राजीव कालेलकर लिखित पुस्तक दिसलं. राजीव माझा मित्र. हो मित्रच… जरी तो वयाने माझ्यापेक्षा किमान २५ ते ३० वर्षे मोठा होता तरीही. एक वर्ष झालं असेल कदाचित त्याला जाऊन. त्याच्या जाण्याच्या आदल्या दिवशी या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं असं एका मित्राने मागे सांगितल्याचं स्मरलं. शारीरिक अपंगत्वामुळे हालचालींवर मर्यादा असल्या, तरी राजीव वाचन, लेखन आणि मित्रांशी संवाद या माध्यमातून शेवटपर्यंत खूप कृतीशील होता. अनेक विषयांतील त्याची जाण, माहिती आणि चिंतन मला नेहमीच थक्क करून सोडायचं.

राजीव एक कार्यकर्ता, एक चिंतक होता. राजकीय सामाजिक विषयांसोबतच पितृसत्ता, पुरुष प्रधानता, लैंगिकता इ. विषयांवरही तो सातत्याने बोलत आणि लिहित आला होता. गम्मत म्हणजे वरती उल्लेख केलेल्या त्याच्या या पुस्तकातील एका ‘मैत्री’ वरील लेखावर माझं लक्ष गेलं आणि मला  हसायला आलं. काय योगायोग होता ! पूर्ण लेख तिथेच बसून वाचून काढला. याच लेखातील काही उतारे, ज्यांनी मला माझी अवस्था आणि त्यावरील उपायही सांगितला, सर्व पुरुष वाचक मित्रांसाठी मुद्दाम देत आहे.

३.

‘आपल्याला दुसरा माणूस समजत नाही तोवर खरं म्हणजे आपण आपल्याला समजत नाही. आपण आपल्याला समजून घेण्याची तीच पूर्व अट असते. आरशात आपल्याला तो किंवा ती दिसायला हवी. तरच मैत्री होण्याची जराशी शक्यता तयार होऊ शकते. हल्ली आपल्या सर्वांना स्वतःला पहायची, दुसऱ्यातही स्वतःला पहायची इतकी सवय लागली आहे, की दुसऱ्यात दुसरा किंवा दुसरी दिसली की मैत्री भंग व्हायला सुरुवात होते. आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी दुसऱ्याचं माध्यम वापरतो. परंतु त्या व्यक्तीलाही इच्छा आहे, त्या इच्छांची तिला पूर्तता करायची आहे, हा विचारच रहात नाही.’

‘मैत्री म्हणजे काय आहे? अखंड संवाद आहे. मैत्रीला अनुकूल असं पर्यावरण तयार केलं जाऊ शकतं. आज, आत्ताच्या साम्राज्यवादी, जातीय आणि भांडवली जगातही हे शक्य आहे. पण त्यासाठी भावनिक, तत्ववैचारिक अशी इच्छाशक्ती पाहिजे. इथेच समस्या आहे. आज असंख्य कारणांमुळे तशी इच्छाशक्ती बहुतांश नाही. बहुतेक ठिकाणी दिसून येत नाही. पण तिथे मैत्री होतच नाही असे नाही. व्यावहारिक, व्यवहारोपयोगी, व्यवहारनिष्ठ संबंध ठेवले जातात, त्याला मैत्री म्हटले जाते. अशी मैत्री टिकतेही; जोवर तो व्यवहार शाबूत असतो तोवर. याला मैत्री म्हणावे का? याला मैत्री म्हटले जाते हे आजचे वास्तव आहे.’

‘मला भोवताली मैत्रीच्या अभावी माणसे एकाकी पडलेली, हिंस्त्र, हिंसक झालेली किंवा एकदम चिडीचूप बसलेली, कोणाशीही न बोलणारी, माणूस असून माणसांनाच घाबरणारी, वेडसर झालेली दिसतात. ही माणसं एकाकी केली कोणी? माणसाच्याच समाजाने? माणूस हा सामाजिक प्राणी आहे असं तर आम्ही शिकलो, तो उत्क्रांत आहे, माणूस म्हणून इतर प्राण्यांहून खूपच उन्नत आहे. मग तो  असामाजिक कधी झाला? माणूस म्हणून एकाकी कधी पडला? की त्याला कोणीतरी आपले हितसंबंध जपण्यासाठी एकाकी पाडला?’

‘मैत्रीचा पायाच मुळी विश्वास आहे. तो पायाच भुसभुशीत असेल तर, तर मैत्रीची इमारत बांधताच येणार नाही. मैत्री हवी असं जेव्हा आपण म्हणतो, खरं म्हणजे त्या अगोदर म्हणायला हवं – विश्वास पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास, मग ती व्यक्ती कोणीही असो, पुरुष असो वा स्त्री. मुलगा असो व मुलगी, त्या व्यक्तीवर विश्वास पाहिजे आणि त्या व्यक्तीचा आपल्यावर. खरं म्हणजे प्रेमभंग, मैत्रीभंग होतंच नाही, होतो तो विश्वासभंग. म्हणूनच विश्वासाला बळ देणं, बळकटी देणं महत्वाचं.’

‘पुरुष-पुरुष मैत्रीबद्दल थोडेसे बोलतो. स्त्री पुरुषांची निरोगी मैत्री होण्यासाठी, पुरुष-पुरुष मैत्री होणे, ती निरोगी होणे, ती निरोगी राहणे मला महत्वाचे वाटते. आज जग बहुतांशी पुरुषांचे आहे, निदान बरेच पुरुष तसे ते मानतात. जल, जंगल, जमीन या बरोबरच बऱ्याच पुरुषांना स्त्रीवरही ताबा मिळवायचा असतो. पण पुरुषांमधील काहींना विशेषतः ज्यांचे हितसंबंध विषमतामूलक समाजात गुंतलेले नाहीत यांना बदलता येऊ शकतं, नव्हे तसे पुरुष बदलत आहेतच. त्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. आपल्याला साध्या साध्या गोष्टींनी सुरुवात करायला हवी. दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला हवा. विश्वास ठेवून पाहू या. खूप मोकळं वाटेल. मनावरची ओझी उतरतील. मन हलकं होईल. फुलासारखं होईल.’

नोट ज्यांच्याजवळ असे मित्र आहेत त्यांचे अभिनंदन. ज्यांचे दुरावत आहेत त्यांनी वेळीच सावध व्हा आणि पूर्ण ताकदीनिशी, आपली सर्व उर्जा एकवटून मैत्रीला जपा आणि माझ्यासारखे ज्यांचे मित्र हरवले आहेत त्यांना ते परत मिळावेत, नवे मैत्र रुजावे या सदिच्छा…

 

2 Comments
 1. दत्ता गोडसे says

  लिंगाचे टोकावरील कातडे मागे सरकत नाही. पण तरीही संभोगास अडचण वाटतं नाही. माझे वय ५२ आहे. पण पत्नीला समाधान मिळते असे वाटत नाही.कारण तिचे बाहेर संबंध आहेत.

  1. let's talk sexuality says

   तुमचं वय पाहता अन आजपर्यंत संभोगास अडचण येत नाही हा आलेला तुमचा अनुभव पाहता, तुम्हाला वयाच्या या टप्प्यावर पत्नीला समाधान वाटत नाही हा शोध कसा काय लागला? त्यांचे बाहेर संबंध आहेत वा नाहीत यापेक्षा तुम्ही याबाबत त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलला आहात का? की त्यांना समाधान मिळत आहे की नाही.
   लैंगिक संबंधात समाधान न मिळण्याची अनेक कारणे असू शकतात. दर वेळी शारीरिक कारणच असेल असं नाही ना! अन एकमेकांशी बोलल्याशिवाय नक्की काय कारण आहे ती कशी काय कळतील. तेव्हा नात्यामध्ये नव्याने रंग पेरा, एकमेकांना वेळ द्या. एकमेकांशी मनातल्या गोष्टी बोला. सध्याच्या काळात तर भरपूर वेळ आहे त्याचा उपयोग करून घेऊ शकता.
   सोबतच्या काही लिंक नक्की वाचा
   https://letstalksexuality.com/sex-after-40/
   https://letstalksexuality.com/sex-life-after-40/
   https://letstalksexuality.com/sexual-pleasure/
   https://letstalksexuality.com/sexual-pleasure-2/

Comments are closed.