असलं लगीन नको गं बाई…

1,856

आमच्या पारगावच्या कमळी आणि मंजुळी आज काय गप्पा मारायला लागल्यात ते पाहू या… चला.

क – हिरामाय, लगीन लई झाक लावलंस बग पोरीचं. समदे नाव काढत व्हते. सुखात राहील आता सासरी.

हि – मंग लगीन एकदाच व्हतंय की माय. आन फ़ुडं चालून लेकीचंच तर होनार हाय समदं.

क – पोरगा लईच तराट हाय म्हनं. वरमाय त्येवडी पाह्या नाय भेटली.

हि – आत्ता? लगीन पाह्यलं अन वरमाय नाय पाह्यली? नवलाचंच बोलायलीस बाई कमळाक्का. शोधून गावनार नाहीत असली मान्सं हाइत. धा एकर रान हाय़, हीर हाय, बोअर हायता दोन. जवारी, सोयाबीन, उडीद, मूंग, तुरी.. समदं निगतयं रानात. लाखभराचा उस होतोय. काय बी कमी नाय बग.

क – मोठं खटलं हाय म्हन की…पर रानातलं काम हुतयं का सुवर्णाला? शाळाच शिकलं की लेकरू. कदी रानात गेली नाय.

हि – कामाचं सोड, सासर्‍यानं बैठकीच्या टायमालाच सांगितलं. तुमच्या लेकराला रानात धाडनार न्हाय. तिनी फकस्त घरच्या अन गड्यावाच्या भाकरी करायच्या आन लहान लेकरं सांभाळायची.

क – अगं हुत असतील की ५०-६० भाकरी. जमलं का सुवर्णाला?

हि – मी काय म्हनलं तिला. भाकरी अन लेकरं सोडली तर आरामच हाय की. धुनी भांडी काय… हुतात लगोलग.

क – हां. आता सोताचा संसार म्हनला की त्येवडं तरी कराया लागनारच की.

हि – त्येचेसाठी तर आपला जलम हाय. संसारबिगर बाईला शोभाच न्हाई बग.

मं – काय बोलली हिरामाय, पुन्यांदा सांग.

हि – आली का मंजुळी? काय नाय पोरीच्या डोईवर तांदूळ पडले त्येचचं बोलत व्हतो. गळ्यात काळी पोत बांधली ना पोरीच्या, तवा कुटं चेहर्‍याला शोभ आली बग.

मं – अस्सं? काळी पोत अन मनी घातले की झालं. बाकी काईच न्हाई का पोरीचं?

क – म्हंजी? मंजुळे, नीट उकलून बोल बग.

मं – अगं कमळे, जिकडे बगावं तिकडे लोक निस्ते पोरीवाच्या मागं हाईत बग. पावणे आणा, लगीन करा, उजवून टाका. पोरीचां काय इचारच नाई बग.

हि – आत्ता? बरोबरच हाय. परक्याचं धन, किती दीस घरात ठेवनार? वेळ आली की ज्येचं त्येला देउन टाकायचं.

मं – कसं बोलती गं हिरामाय तू? पोरगी जलमली की तिच्या कपाळावर परक्याचं नाव लिवती का काय तुजी सटवाई?

हि – मंग, समदं नशीबच लिवती ती.

मं – अरारारारा, मला जर म्हाईत अस्तं ना तर माज्या कपाळावर शिवाचचं नाव लिवाया लावली असती बग.

क – मंजुळे, आता हा शिवा कोन अजूक?

मं – अगं, लई आवडायचा त्यो मला. कामाला धट, कुनाच्या अध्यात ना मध्यात. मला तर त्येच्याच गळ्यात माळ घालायची हुती बग.

क – मंग करायची हुतीस की.

मं – कसलं काय. आमच्या समाजाचा नव्हता ना तो. मंग माय बापानं बांधली मालकाच्या गळ्य़ात. ही काळी पोत फासागत वाटली हुती बग तवा.

हि – असं इपरित बोलू नाय माय. भाग्यवान बाईलाच लाभती ती.

मं – कसलं भाग्य कुनास ठाउक. लगीन म्हंजी खेळच वाटतो पोराकडच्याला. लग्नातच शोभा करतात काय काय जन.

क – ह्ये मात्र खरंय बग. माज्या नन्दंचा नवरा तर बनियन चड्डीसाठी रुसून बसला व्हता माय. काय सांगावं?

मं – तसाच हुबा करायचा व्हता त्येला लग्नाला. असलं असतं का?

क – आमच्यात लई असत्यात बग येकेक. कुनाला काय तर टिळ्याला चांदीचा रुपाया लागतो, अन कुनाला काय तर म्हनं ताटाला नोटेचं टेकन. सुवर्णाच्या लग्नात बी थोरला चुलता रुसला व्हता. बापानं हजाराची नोट ठेवली तरा कुटं घास गेलं त्याच्या तोंडात.

मं – काय येकेकाच्या तर्‍हा बाई. आपली नानी न्हाय़ का? समद्या लोकावाच्या लग्नाला जाती, जेवती, लुगडं बी नेसून येती. आन आली की सुरू…. हलकंच नेसविलं माय… अन भातच कच्चा. कुनाची जिलबीच वाईट तर कुनी पुर्‍याच कशा नाय केल्या.

क – खरयं बाई.

मं – पोराकडचे खास तिला घेऊन जातात… रुसायला. आता इतकी लुगडी घेऊन काय लोनचं घालनार हाय का? पेट्या भरूभरू निस्ती लुगडी अन टाईल टोप्या. इकाया काढली तर वरली माडी हुईल बांधून.

क – जाऊ दे गं. जुनं खोडं हाय. एरवी कोन पुसतयं तिला? म्हणून मिरवून घेती. बाईचा जलमच हाय असला.

मं – कसला गं असला जलम. कुनाच्या तरी भाकरीची सोय म्हनून पोरीचं आयुष्य बरबाद करतेत बग. आता भाकरी टुकडा घालाया ती काय सैपाकीन हाय?

हि – मंजुळे, काय भांडून आलीस की काय मालकाशी?

मं – भांडाया कशाला हवंय. रोजचंच हाय बग. आंघुळीचं पानी द्या, कापडं काढून ठिवा, पान्याचा तांब्या बी हातात. निस्तं खाटंवरून पाटावर आन पाटावरून खाटंवर. उगा म्हनायला घरची लक्षुमी, नोकरच आपुन.

हि – अगं आपल्याच मानसाचं करायलीस ना? धन्याची शेवा करशील तरच स्वर्गात जाशील.

मं – अन त्यो? त्येला डायरेक्ट पास हाय़ का काय स्वर्गाचा? माज्या बापानं काय पाहून गळ्यात बांधली काय ठावं. मानूस कसा हाय काय पाह्यलं का नाय काय ठावं?

हि – म्हंजी लगीन झालं तर कायच सुख न्हाई म्हन की. का त्या बाबीसंगं राहून अशी करायलीस?

मं – तिला का उगा नावं ठिवता गं? छान मजेत र्‍हाति, फिरती, लगीन केलं नाई म्हनून तुमच्यासाठी बादच झाली ती. काय कमी हाय गं तिच्यात? हुश्शार हाय, देखनी हाय़.

क – पर उपेग काय देखनं असून? तिच्या मागच्या किती पोरींची लग्नं झाली तरी ही इथंच हाय़ अजून. भावाच्या घरात. आता बाब्या हाय़ चांगला म्हनू ठिवून घेतलयं. एकांदा म्हन्ला आसता, तुजी तु सोय बग. तर?

मं – आत्ता? त्यो पोरगा… म्हनून लगीच घर त्येचं. अन त्येच्याहून मोठी असून, त्य़ा घरात राबत असूनसुदीक ही मात्र परकी… कसला गं न्याय तुजा हिरामाय? तिचा काहीच वाटा न्हाय़.

हि – असतो की. पर तो फकस्त चोळी बांगडीचा अन सणावरी म्हायेरात येण्याचा. लगीन करावंच लागतं माय.

मं – आगं करावं की. पर नसंल एकांद्याला करायचं तर काय यवडं त्य़ात? लगीन सोडून किती तरी गोष्टी करता येतात की. शिकता येतं, काम करता येतं, हिंडता फिरता येतं. आता माजचं घे. पारगाव अन घारगाव … दोन गावं सोडून कदी कुनी नेलंय का कुटं फिराय़ा? पोरीनं शिक्षन सोडायचं, सासरात जाय़ाचं, घरच्यांचं पोरा-बाळाचं करायचं, राब राब राबायचं अन तसचं संपून जायचं.. असलं असलं तर काय गं लगीन करुन. सांग ना हिरामाय?

हि – खरंय म्हना ते बी.

क – अन मंजुळे, लगीन बी कसं, इतरांचंच र्‍हातं. आहेरं, जेवनं, हुंडा, हाच अडून बसला, नाय़ तर तीच रुसून बसली. एकेका लग्नाचा खर्च लाखावर जातो. किती पैका जातो गं. पोरीकडच्यांना तर साफच करतात बग पोराकडले. उगा कशापायी येवडा खर्च करायचा?

मं – अगं कसं का करंना.. सुखानी करावं. पोरीच्या बापाला ऋण काडाया लावून सुख लागंल का अंगाला? बड्या लोकाचं पाहून गरीबी परिस्थितीतला मानूस बी तसंच करु पाहतो न्हवं? सगळ्यांनीच थांबवावा बग डामडौल, तरीच पोरी सुखात राहतील. आता आमचे मालक सांगायले होते, एका गावात एक पोरगी एका पोराबरोबर पळून गेली, लगीन बी लावलं घरच्यांन्ला न सांगता. तर दोगांच्या घरच्यांनी कुठून तरी बामनाला सांगून त्यांचं गोत्र काडून त्ये दोगं बहीन भाऊ लागत्यात असं सांगितलं अन पंचायतीनीच त्येंचं लगीन मोडलं बग. काय वाटलं असंल गं त्येंना? जात, धरम, समाज, आपुनच तयार केलाय न्हवं, त्याच्या आतला मानूस एकच र्‍हातो की.

क – लई तत्त्वज्ञान सांगाया लागलीस बग मंजुळे… मास्तरीनच व्हाय़ा पायजे व्हतीस बग.

मं – झाले असते माय… पर लगीन लावलं ना बापानं. म्हनून राहिले.

(साभार – तथापिचा जिव्हाळा)

Comments are closed.