दोष कपड्यांचा नव्हे तर मानसिकतेचा

2,369

जगभरातील सर्वजण नवीन वर्षाचे उत्साहाने आणि जल्लोषात स्वागत करत होते. आपणही एकमेकांना भरभरून शुभेच्छा दिल्या असतील, गिफ्ट्स दिले असतील. याच नववर्षाच्या रात्री महिलांसोबत बंगळुरूमध्ये सामुहिक छेडछाडीची घटना घडली त्याबद्दल तुम्ही ऐकले असेलच. नेहमीप्रमाणेच या घटनेची खापरही महिलांवरच फोडले गेले. ‘अशा घटना घडतंच असतात’ ‘भारतीय संस्कृती’ ‘पाश्चात्यांचे अनुकरण’ ‘छोटे आणि फॅशनेबल कपडे’ याभोवतीच चर्चा झाली. ही घटना अनुभवणाऱ्या, एका अनामिक मैत्रिणीचा सोशल नेटवर्किंग साईट्स व्हायरल होत झाला तो वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.

नववर्षाच्या रात्री बंगळुरुमध्ये जो काही प्रकार स्त्रियांबरोबर घडला, त्याविषयी मी इथे लिहिले होते. त्यावर बरीच चर्चा झाली. या सगळ्या चर्चेच्या धामधुमीत इनबॉक्समध्ये एक मेसेज येऊन पडला. फेसबुकच्या माध्यमातूनच झालेल्या एक मैत्रिणीचा. राहते बंगळुरुमध्ये.

‘मुक्ता, त्या दिवशी मी तिथेच होते. आणि तो किळसवाणा प्रकार मी अनुभवला आहे. मला लिहायचंय, पण भीती वाटतेय. त्या दिवशीचे ते स्पर्श आणि तो अनुभव मनातून जात नाहीये. तू लिहिशील का? मी माझा अनुभव तुला सांगते. प्लीज माझ्यावतीने लिहिशील का?’

नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पुढच्या दहा-पंधरा मिनिटात तिची अनुभव सांगणारी इंग्रजीत लिहिलेली फाईल माझ्या इनबॉक्समध्ये येऊन पडली. तिचा अनुभव वाचताना अंगावर काटा उभा राहिला.

माझी ही अनामिक मैत्रीण लिहिते. (तिच्या मताचा आदर राखून तिचे नाव लिहित नाहीये.)

यावर्षीचा ३१ डिसेंबर मस्त मजेत घालवायचा असा आमचा प्लान होता. मी आणि माझा नवरा आम्ही दोघेही मद्यपान करत नाही. पार्ट्या करत नाही. किंवा पबमध्येही जात नाही. कामाचा दिवस असल्याने दिवसभर जो तो आपापल्या व्यापात होता. त्यामुळे रात्री निवांत काहीतरी मस्त प्लान करू, असं माझं आणि नवऱ्याचं बोलणं झालं. ब्रिगेड रोडबद्दल आणि तिथल्या सेलिब्रेशनबद्दल खूप ऐकलं होतं. एकदाही अनुभव घेतला नव्हता म्हणून या वर्षी रात्री जेवण झाल्यावर नववर्षाच्या जल्लोषात सामील होण्यासाठी ब्रिगेड रोडला जायचं ठरलं. रात्री ११ च्या दरम्यान आम्ही ब्रिगेड रोडला गेलो. प्रचंड गर्दी होती. लोक एकमेकांना धक्काबुक्की करत होते. नाक्या नाक्यावर पोलीस होते. महिला पोलीस त्यांच्या वाहनांमध्ये शांत बसून होत्या. पोलीस त्या प्रचंड गर्दीला सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. प्रत्येक नाक्यावर मचाण सदृश्य उंचावरची जागा बांधून तिथून पोलीस गर्दीवर लक्ष ठेवून होते. गर्दी असल्यामुळे माझा नवरा मला शक्य तेवढं सुरक्षित करत होता. तो तसं नेहमीच करतो. माझ्या भोवती त्याच्या हाताचं कवच तो नेहमीच तयार करतो. तसं त्याने त्याही दिवशी केलं होतं. आम्ही एका चौकात पोचलो. एका बंद दुकानापाशी आसरा घेऊन आम्ही नवीन वर्षाचा जल्लोष बघायला उभे राहिलो. माझ्या मागे बंद दुकानाचं शटर होतं आणि पुढे नवरा. त्यामुळे मी सुरक्षित होते असं मला वाटत होतं. ‘इतकं काय ब्रिगेड रोडवर सेलिब्रेशन असतं, की लोक त्याचं नेहमी कौतुक करत असतात?’ हा विचार सतत मनात येत होता. त्याच कुतूहलाने आम्ही बघत होतो. समोरची प्रचंड मोठी गर्दी नवीन वर्षाच्या स्वागतात रममाण झाली होती. तितक्यात, अचाकन एक १६-१८ वयोगटातली मुलगी आमच्या समोर आली. तिच्याच वयाचा मुलगा तिच्याबरोबर होता. तो तिला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होता आणि ती भीतीने प्रचंड थरथरत होती. काय झालं काहीच कळत नव्हतं पण तिच्या चेहऱ्याकडे बघून मी क्षणभर अस्वस्थ झाले. मी तिला पाणी पितेस का, काय झालं अशी विचारपूस केली पण ती इतकी घाबरलेली होती की कुणाचंही काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. मी एकदा तिच्याकडे, एकदा गर्दीकडे बघत होते. अजूनही कळत नव्हतं नेमकं काय झालंय ते. तितक्यात अजून चार-पाच मुली त्याच दिशेने धावत आल्या. त्या ओरडत होत्या. किंचाळत होत्या. ‘पोलीस कहा है, क्या कर रहे है’ म्हणत ओरडत होत्या. पोलीस बरोबर आमच्या समोर रस्त्याच्या पलीकडे उभे होते.

गर्दी जल्लोषात ओरडत होती. आणि त्या मुली भीतीने किंचाळत होत्या. काय होतंय कुणालाच समजत नव्हतं. त्या गर्दीच्या आवाजात मुलीची मदतीसाठीची पुकार पोलिसांपर्यंत पोचत होती की नाही कुणास ठाऊक. खरंतर पोलिसांकडे दुर्बिणीही होत्या. त्या मुलींनी वेस्टर्न कपडे घातले होते. एका क्षणासाठी मनात आलं, काय मूर्ख मुली आहेत, इतक्या गर्दीत, इतक्या थंडीत हे असे कपडे कशाला घालून यायचे. (मी किती मुर्खासारखा विचार करत होते खरंतर) मी हा विचार करेस्तोवर गर्दीचा एक प्रचंड मोठा लोंढा आमच्या दिशेने आला. त्या क्षणापर्यंत मॉलेस्टेशन म्हणजे काय, गर्दीत कुणीतरी तुमच्या शरीराशी खेळ करणं म्हणजे काय? याचा मी अनुभव घेतलेला नव्हता. १२ वाजून २० मिनिटं झाली असावीत. ती गर्दी बघून आम्ही घरी जायचं ठरवलं. तिथे थांबण्यात काही अर्थ नाही हे तोवर लक्षात आलं होतं. एक आवर्जून सांगते, मी वेस्टर्न कपड्यात नव्हते. चांगले अंगभर कपडे घातले होते. थंडी होती त्यामुळे फुल स्लीवचा कुर्ता तोही गळाबंद, त्यावर स्वेटर. माझ्यापासून दोन मीटर अंतरावर पोलीस उभे होते आणि शिवाय सोबत नवरा होता. त्यामुळे या गर्दीतही मी सुरक्षित आहे. मला कुणी त्रास देणार नाही अशी माझी खात्री होती. आमच्या दिशेने येणारा गर्दीचा लोंढा वाढत चालला होता. चोहोबाजूनी येणाऱ्या गर्दीतून मला प्रोटेक्ट करत माझा नवरा बाहेर पाडण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होता.

तितक्यात कुणीतरी माझी छाती घट्ट पकडली. शॉक. तो किळसवाणा स्पर्श. माझ्याशी गैरवर्तन करणाऱ्या मुलाला माझी नजर शोधायला लागली. तो माझ्या समोरच होता. मी प्रतिकार करण्यासाठी त्याला जोरात फटका मारला. पण त्याने त्यावर कसलीही प्रतिक्रिया न देता, माझ्या छातीवरून हात बाजूला केला आणि शांतपणे गर्दीत चालू पडला. जणूकाही त्याने जे काही केले ते करणं हा त्याचा अधिकार आहे. मी कन्फ्युज झाले. हे काय चाललंय. तितक्यात कुणीतरी मला मागून स्पर्श केला. तोच किळसवाणा स्पर्श. मी सावरत नाही तोच अजून कुणीतरी माझ्या पोटाला स्पर्श केला. हे तीन अत्यंत किळसवाणे स्पर्श फक्त काही सेकंदात झाले. मी काही प्रतिक्रिया देण्याआधी मला स्पर्श करणारे गर्दीत मिसळून गर्दीचा चेहरा बनून गेले होते. शॉक. फक्त शॉक. आजूबाजूला कुणी पोलीस आहे का, माझी नजर शोधत होती. अत्यंत घाणेरडे फिलिंग. मला शब्दातही मांडता येत नाहीये. तितक्यात त्या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी माझ्या नवऱ्याने माझा हात धरला आणि मी किंचाळले. क्षणभर मला माझ्या नवऱ्याच्या स्पर्शाचीही भीती वाटली इतकी मी अस्वस्थ होते. शॉकमध्ये होते. काहीही कळत नव्हतं. मगाशी अशाच नकोशा स्पर्शांनी शॉकमध्ये गेलेल्या त्या मुलींबद्दल मी किती जजमेंटल झाले होते. मला माझीच लाज वाटली.

मी थरथरत होते. किंचाळत होते. माझा नवरा मला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. मला घेऊन त्याला ताबडतोब बाहेर पडायचं होतं. आणि माझ्या आजूबाजूच्या बायका माझ्याकडे विचित्र नजरेने जजमेंटल होत बघत होत्या. काही वेळापूर्वी मी त्या मुलींकडे बघत होते तशाच! त्यांनाही बहुदा वाटत असावं जे माझ्याबरोबर झालं ते कधीही त्यांच्याबरोबर होणार नाही!

मलाही पाच-दहा मिनिटांपूर्वी असंच काहीतरी वाटत होतं…जो निव्वळ भ्रम होता.

साभार- मुक्ता लिखित सोशल मिडियावर व्हायरल झालेली पोस्ट. मूळ स्त्रोत समजू शकला नाही. लेखिकेचे खूप खूप आभार.

चित्र साभार: http://indianexpress.com/article/india/bengaluru-mass-molestation-protest-touch-me-not-in-onlookers-dont-always-help-woman-in-distress-4463574/

Comments are closed.