‘महिला दिना’प्रमाणे ‘पुरुष दिन’ असावा का? _प्राजक्ता धुमाळ

762

‘महिला दिना’प्रमाणे ‘पुरुष दिन’ असावा का? हा प्रश्न आपण अलीकडेच वेबसाईटवर वाचकांना विचारला होता. यावर अनेकांनी ‘पुरुष दिन’ असावा असं मत व्यक्त केलं आहे. तर काहींना ‘महिला दिना’प्रमाणे ‘पुरुष दिन’ असण्याची गरज वाटत नाही. या निमित्ताने आपण महिला दिनाची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेऊया.

न्यूयॉर्कमधील लढाऊ वृत्तीच्या शिवणकामगार महिलांनी रस्त्यावर येऊन ८ मार्च १९०८ रोजी शोषणाविरुद्ध लढा पुकारला आणि ८ मार्चला ‘जागतिक महिला दिन’ अशी ओळख मिळाली. ही लढाऊ परंपरा एकजुटीने चालू ठेवून जगभरातील महिला दरवर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात.

भारतीय संस्कृती ही केवळ पुरुषप्रधानच नाही, तर पुरुषसत्ताकही आहे. त्यामुळे कुटुंबात, समाजात बाईला दुय्यम स्थान दिलं जातं. परिणामी महिलांना अनेकदा शिक्षणाच्या, नोकरीच्या, व्यक्ती म्हणून स्वतःला विकसित करण्याच्या संधी नाकारल्या जातात किंवा तुलनेने कमी मिळतात, हाच अनेक वर्षांचा इतिहास आहे. आजही स्त्रियांचे आरोग्य, आहार, शिक्षण, मनोरंजन असे मूलभूत अधिकारही सरळसोटपणे नाकारल्याच्या घटना घडताना दिसतात. मात्र पुरुषाच्या आहार, शिक्षण, मनोरंजन या संधींकडे लहानपणापासूनच विशेष लक्ष पुरवले जाते असे सामान्यत: दिसते. वंशाचा दिवा म्हणजे मुलगा, म्हातारपणाची काठी म्हणजे मुलगा या सगळ्या समजुतींमुळे मुलगा जन्माला आल्याचा अभिमान बाळगला जातो. परिणामी त्यांना शिक्षणाच्या, नोकरीच्या, स्वतःला विकसित करण्याच्या संधी-सवलती सहजपणे मिळत जातात. याउलट आजही महिलांनी त्यांच्या हक्कासाठी लढा पुकारावा अशी परिस्थिती आहे. त्यासाठी महिला दिन हे जागतिक व्यासपीठ अत्यंत महत्वाचं आहे, जेणेकरून त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचू शकतील.

पुरुषांचे हक्कही डावलले जाऊ शकतात, परंतु ‘पुरुष’ म्हणून पुरुषांचे अधिकार डावलले जाण्याची शक्यता क्वचितच असते. आदिवासी पुरुष, कामगार पुरुष, दलित पुरुष म्हणून त्यांचेही हक्क डावलले जाताना दिसतात, पण ते ‘पुरुष’ असल्यामुळे नाही तर वंचित समाजाच्या व्यक्ती म्हणून डावलले जात असतात. पण नोंद घेण्याची गोष्ट म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत त्यांचे हक्क डावलण्याची सुरुवात केवळ त्या ‘स्त्री’ असल्यामुळेच होत असते.

तरीही ‘पुरुष दिन’ असायला हरकत नाही, पण ‘महिला दिन’ विरुद्ध ‘पुरुष दिन’ अशी संकल्पना मनात धरू नये. ‘पुरुष दिना’च्या निमित्ताने स्त्रिया आणि मुलींसाठी समाजात हिंसाविरहीत, छेडछाडमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पुरुषही भूमिका घेऊ शकतील. स्त्री-पुरुष समानता हा भारतीय राज्यघटनेने दिलेला अधिकार प्रत्यक्षात येण्यासाठी पुरुषांना मिळणाऱ्या संधी स्त्रियांनाही मिळाव्यात यासाठी अनेक पुरुष एकत्र येऊन आपापल्या पातळीवर काही प्रयत्न करू शकतील, याही नजरेतून या विषयाकडे पाहाता येऊ शकेल.

1 Comment
  1. निखिल says

    खरंच सर्व पुरुषांनी एकत्र येवून काहीतरी प्रयत्न केले पाहिजे ज्यामुळे महिलांना संधी मिळतील. आणि समाजात हिंसामुक्त वातावरण तयार होईल.

Comments are closed.