कोण म्हणतं मासिक पाळी अपवित्र असते?

4,728

मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीराची अगदी नैसर्गिक क्रिया असूनही पाळीच्या काळात बाईला अपवित्र का बरं मानलं जातं? आज 2015 सालीदेखील किती तरी मुली आणि बायकांना पाळीच्या काळात बंधनं सहन करावी लागतात. स्वयंपाक करायचा नाही, देवळात जायचं नाही, देवपूजा करायची नाही, तुळशीला पाणी घालायचं नाही, लोणच्याला हात लावायचा नाही, पापड करायचे नाहीत… एक ना अनेक. आणि सर्वच जाती-धर्मामध्ये काही ना काही प्रमाणात ही बंधनं घातलेलीच आहेत. गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित असा फारसा फरकही दिसत नाही.

शबरीमाला देवस्थानाचे प्रमुख गोपालकृष्णन यांच्या अत्यंत खळबळजनक विधानानंतर तर ही मानसिकता आजही किती खोलवर रुजलेली आहे हे लगेच लक्षात येईल. शबरीमाला हे दक्षिण भारतातलं एक महत्त्वाचं देवस्थान आहे. इथला देव ब्रह्मचारी असल्याने मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नसतो. हे ठासून सांगत असताना गोपालकृष्णन यांनी असं विधान केलं की जोपर्यंत स्त्रिया ‘शुद्ध’ आहेत का नाही हे सांगणारं मशीन शोधलं जात नाही तोपर्यंत स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. स्त्रियांना दुय्यम मानण्याची, अपवित्र मानण्याची ही व्यवस्था आजही कशी काम करते तेच या विधानाने अधोरेखित केलं आहे. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराच्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश दिला जावा की नाही यावरूनही असंच वादंग उठलं होतं.

खरं तर सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की पाळीचं रक्त स्त्रीच्या शरीरातच तयार होतं आणि जर गर्भ राहिला तर त्या रक्तावरच त्याचं पोषण होतं. मग हे रक्त खराब, विटाळ कसं बरं असेल? बाईला पाळी येणं ही श्वसन, पचन किंवा रक्ताभिसरणासारखीच एक अत्यंत नैसर्गिक अशी क्रिया आहे. ती घाण नाही, अपवित्र नाही आणि तिचा इतरांवर कसलाही परिणाम होत नाही. पाळीच्या काळात जी शिवताशिवत केली जाते त्यामुळे मुलींच्या मनात स्वतःच्या शरीराविषयी नकोशी भावना तयार होते.

ही भावना संपवू या. पाळीमध्ये अपवित्र काहीही नाही, पाळीच्या काळात मुली-बाया नॉर्मल असतात हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवू या.

सामील व्हा- #HappytoBleed, #SmashPatriarchy

Comments are closed.