इटाळाचा कटृाळा

1,567

मासिक पाळीत बाई पवित्र असती का विटाळशी…लई वाद चाललाय. पारगावात कमळी आन् मंजुळी बी त्येच बोलाया लागल्यात.
(कमळी – क, मंजुळी – मं)

मं – कमळे परवा का आली नाहीस?

क – परवा काय व्हतं माय?

मं – आगं पार्वताच्या घरी पुजा व्हती की. त्याचं विचारायलीये.

क – पूजेचं व्हय? अगं करायचं न्हवतं. कस यावं? उगा विटाळ कालवाया?

मं – अस्सं व्हय?आराम असंल आता मंग? काम नको ना काय नको.

क – कसला काय आराम? तुला काय माहित नाय व्हय? आत्याबाईंनी हंडे कळशा काढून ठेवल्यात की घासाया. म्हनं आराम. आधीचं हे दुखनं त्यात त्यो भांड्यांचा ढिगारा. वर मालकाचे सदरे बी हाइत धुन्यात. नको हुतं बगं. वाटत बाईचा जलमच नगं हुता.

मं. अगं येवडं कशाला कावायलीस?

क – सारखं आपलं, याला हात लावू नगं,हितं बसू नगं पानी घेऊ नगं अन्‌ डोक्यावरुन पानी घे. कटृाळा येतो बग. परमेसरानं बायावाला असला भोग का दिला असंल कुना ठावं?

मं – मला ठाव हाय. अगं आपला बामन गुर्जी सांगत व्हता. काय तर म्हने, पुरान काळात एका राक्केसानं द्येवलोकाचं पानी तोडलं. मंग त्या राक्केसाचं आन्‌ इष्नूद्येवाचं लई जुपलं. इष्नूद्येवानं खलासचं केलं त्या मुडद्याला.

क – आता याचा इटाळाशी काय सबंध?

मं – आइकशील का? तर त्या राक्केसाला खलास केला पर आपला इष्नू द्येव पुन्यात्माच की. त्येचं मन खाऊ लागलं त्येला. मंग सगळया बायावाला इन्ती केली की माजं दुख वाटून घ्या म्हन. तवाधरनं बायावाला पाळी येती. असं सांगत व्हता गुर्जी.

क – काय तर नवलाचंच बोलायलीस बाई.एवडं भगवंताचं काम, त्येचा इटाळ का हुईल मंग? मला तर लईचं वंगाळ वाटतं बगं चार दीस.

मं – कमळे, पाळीच आली न्हाई तर काय मज्जा गं? -कटकटच न्हाई. कुटं पाळाया नगं, भाइर बसाया नगं. बिछाना धुवाया नगं…गडयासारखं एकदम बिनदास.

क – मंजूळे डोकं फिरलंय का काय? पाळी येती म्हून तर आपुन हावं.पाळी न्हाई तर बाईच न्हाई.

मं – पर मला एक कळत न्हाई पाळी बाईला आणि तरास घरादाराला?

क – अगं आख्खी बाईच इटाळती न्हवं?

मं – पर त्या आख्खा बाईन घासलेली भांडी न्हाईत इटाळत, कापडं न्हाई. अन्‌ झाडलोट, घास-पूस, त्येनी कसलाच इटाळ हुत न्हाई?

क – न्हाई कसा? माज्या नन्देनं पाळी आली तरी कुनाला सांगितलं न्हाई. मेलीनं पार सैपाक भी केला. व्हायचं ते झालंच. पोरं जी तापली जेवल्यावर. काय इचारु नगं. मंग बसली व्हती रडत.

मं – अगं पोरं खेळली असतील पान्या फिन्यात. कशाचं सूत कशाला जोडायलीस.

क – तुजा विश्वास नाई ना.. माजंच सांगते. आमच्यात लईच कडक हायेत. मी नवी घरी आले तवाची गोष्ट. पहिलाच महिना आला. आत्याना सांगावं तर बिस्तरा धुवायला लावला असता, म्हून काहीच सांगितलं न्हाई. न्येमकं पापडाचं काम काडलेलं, बसले की त्यांच्यासंगं. नंतर पापड तळला की लाल जरद. म्हनल्या, कमळे, बाहेरची झालीस का काय? सगळे पापड फेकून दिले बग. वर गोमतर टाकून सगळं घर धुऊन घेतलं.

मं – तुमच्यात जनवरं तरी हाइत गं. आमच्यासारख्यानी कुटं पळावं गोमतारासाठी? मला तर कदी कदी वाटतं गडी ते बाटलीतला स्प्रे का काय मारतात ना वासाचा, तसला गोमतराचा असाया पाहिजे होता बग. कुटं चुकून हात लावला तर निस्तं मारायचं फुस करुन. इटाळ खलास.

क – चेष्टा पुरे हं मंजुळे.

मं – चेष्टा नाय गं, किती दिस बायानी असं इटाळशी म्हून ऱ्हायचं? आला परवाच माजी पुतनी शानी झाली. घरात निस्ता गोंधळ. गोडाचं जेवन, नवी कापडं, मामाला काय बोलवून घेतलं. बावरुन गेलं बग लेकरु. मला इचारली, काकी खेळाया जाऊ? म्हन्लं, नको. माय बाप कावतील. मोठी जालीस नवं? तर म्हन्ते कशी? मोठी ? मी तर सातवीतच हाय? आता काय सांगावं माय लेकराला?

क – खरंय बंग. माजी तर शाळाच बंद झाल्ती. खेळ बंद मस्ती बंद. दोन वर्सात उजवून बी टाकलं माय बापानं.. अजून याद येती साळंची.

मं – दिराला म्हन्लं शाळा थांबवू नगं लेकराची. काय म्हाईत काय करतात आता? म्हनून म्हन्ते, गडयासारखं पायजे व्हतं.

क – पर पोरं कशी झाली असती मंग?

मं – अगं गडयाला जाली असती की …

क – मंजुळे, थिल्लर बोलू नगं उगा. अन्‌ काय गं, तुमच्यात चाल्तं वाटतं सगळं?

मं – कुटं चालायला? पर म्या ठरविलंय. काय बी पाळायचं नाय.परतेक पोरगी मोठी झाली की पाळी तर येनारच. शरीराचा धरमच हाय त्यो. कशाला मंग असलं नाटक? आमच्या आजीची आजी तर सांगायची, पूर्वी म्हनं पेरनी आली की इटाळशी बाईलाच पेराया लावत. लई पिकावं म्हनून. आन्‌ आता, फिरकू बी द्यायाचे न्हाईत तिथं. म्हनून म्हन्ते आता काय बी पाळायचं न्हाई.

क – आन्‌ घरच्यांना कळल्यावर? घरात ठिवतील का? बाकी ऱ्हाऊ दे, कपडा तरी नीट झाकून सुकवीत जा बाई.उगा मालकाच्या नजरंला पडंल अन्‌ डोळं जातील बिचाऱ्याचं.

मं – जाऊ दे की मंग. न्हाई तरी कुटं वापरतात डोळं. डोळयासमोर आस्ती वस्तू. तरी कुटंय, कुटंय म्हनून जीव खातात माजा.

क – गप उगा. अन्‌ हे बग पाळीचा कपडा नीट जपाया लागतु. माज्या मेव्हणीची मेव्हणी सांगत व्हती, तिच्या शेजारची बाई अशीच कुटं तर कपडा ठिवायची. अन्‌ मंग जालं की इपरीत.

मं – काय त्ये?

क – अंग कंदी साप आला, अन्‌ कदी अंडं दिलं. काय ठावं? तोच कपडा बिचारीनं घेतला अन्‌ दिवस राह्यलं की माय.

मं – मंग?

क – मंग काय? नऊ महिन्यानी सापच आला की पोटी.

मं – काय सांगायलीस?

क – मंग सादं – सुदं हाय व्हय? सगळ्या बाया उगा करत्यात का?

मं – कमळे, मला काय खरं वाटं नाय बग.

क – जाऊ न साक्ष काडतीस का माज्या मव्हनीची? सांग.

मं – तसं न्हाई गं. पर म्या म्हन्ते, आपुन एवडं इटाळ, इटाळ करतो, त्येच्यावरच जीव जगत असतु की गं पोटात. त्येच त्याचं खानं. आपुन जेऊ थोडीच घालतो? त्येला गं कसं चाल्तं?

क – चाल्तं कुटं, बाळ जलमलं की बाई इटाळशीच असती.

मं – आली परत फिरुन तिथंच. अगं आपल्याच अंगचं रगत असतंय न्हवं? त्ये गं कसं खराब हुईल?

क – मंजुळे तुजं लक्षन काही खरं नाय बग. उगा बाहेरची झाल्यावर मठात जाशील अन्‌ मोहोळ उठंल वरलं.

मं – हां. अन्‌ गावचा भगत बी मरतो म्हनं हात लावल्यावर. आता पुढच्या बारीला अदुगर जाऊन त्येलाच धरनार हाय बग मी. बगू तर काय व्हतंय ते… मरतो का ऱ्हातो. उगा आमच्या मागं हा घोर लावून ठिवलाय. त्येच्या माईला पाळी आली नसती तर त्यो जलमला तरी असता का? म्हनं इटाळानी मरतो.

क – अन्‌ त्या हिराबाईचं कसं गं? तिला लई झोंबतो इटाळ.

मं – तिला तर बघूनच घेनार आहे. इतकी पिडती सुनंला. तिनं भरलेलं पानी वतून देती, तिच्या हातचा च्या पीत न्हाई. यील तिला इचारती, तू झाली का? असली तर दूर हो माय. मला लई झोंबतं. तिला बी पकडून ठेवनार हाय एकबार.

क – म्हंजी मंजुळे, आता काहीच पाळनार नाहीस? निस्ती हिंडनार?

मं – व्हय हिंडनार. अन्‌ समद्या बायावाला सांगनार पाळी वाईट नस्ती. उगा कटकट नको म्हनून पिशवी काडू नगा आन्‌ पूजा हाय घरात म्हनून गोळ्या बी खाऊ नगा. असलं राहतंय का? आपल्याच तब्येतीशी असला खेळ करायचा.

क – तुजं ठीक हाय गं. आमच्यासारख्यानी कसं करावं?

मं – काय करायचं का नाय, त्ये तू ठरीव. मी हाय तुज्या पाठीशी. पर पुन्यांदा कदी मला करायचं न्हाई म्हणून कार्यक्रमाला आली न्हाईस, तर गटातून नावच काडाया लावीन तुजं. ध्यानात ठिव.

Comments are closed.