म्हैसाळमधील गर्भलिंगनिदान आणि असुरक्षित गर्भपात प्रकरण  

1,495

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे व त्यांच्या साथीदारांवर खुनाचा (culpable homicide) गुन्हा दाखल करण्याची महिला संघटनांची मागणी आहे. स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीचे याबद्दलचे निवेदन वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील उघडकीस आलेली घटना अतिशय घृणास्पद आणि संतापजनक असून, त्यात सहभागी असलेले डॉ बाबासाहेब खिद्रापुरे व त्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साथीदारांवर खुनाचा गुन्हा (culpable homicide) दाखल करावा अशी मागणी स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती करीत आहे. गर्भलिंगनिदान, असुरक्षित गर्भपात, महिलांची आरोग्यसेवांकडून होणारी अक्षम्य हेळसांड, सरकारी आरोग्य यंत्रणेचे अशा गुन्हेगारांबरोबर असलेले संगनमत, तसेच अनियंत्रित खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची नफेखोरी, असे ह्या घटनेचे अनेक गंभीर स्वरूपाचे पैलू यानिमित्ताने समोर आले आहेत.

पी.सी.पी.एन.डी.टी. (लिंग निदान प्रतिबंधक) कायद्याचा सर्रासपणे भंग होण्याचा पूर्व इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा एका महिलेचा मृत्यु घडेपर्यंत काय करत होत्या असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. योग्य तांत्रिक प्रशिक्षण नसलेला एक डॉक्टर म्हैसाळ सारख्या केवळ पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात बेकायदेशीरपणे तळमजल्यासहीत एक तथाकथित ऑपरेशन थिएटर असलेले हॉस्पिटल उभे करून बेमालूमपणे नफेखोरीसाठी व्यवसाय करण्यासाठी गर्भलिंगनिदान, बेकायदेशीर गर्भपात व अनावश्यकपणे गर्भाशय काढून टाकण्याचे काम केवळ एकट्याच्या बळावर करू शकत नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. या मध्ये सहभागी असणाऱ्या इतर डॉक्टरांची व त्यांच्या दलाल-साथीदारांचा शोध घेऊन त्यांच्या सर्वांवर त्वरित कारवाई करण्याची आम्ही मागणी करीत आहोत.

सांगली जिल्हा हा गर्भलिंगनिदानाच्या बाबतीमध्ये कायमच संवेदनशील राहिला आहे. १९९१ मध्ये ह्या जिल्ह्यात ०-६ वर्ष वयोगटात दर १००० मुलांच्या मागे ९२४ मुली होत्या, ते प्रमाण अवघ्या १० वर्षात २००१ मध्ये ८५१ पर्यंत घसरले. २०११ मध्ये हे प्रमाण किंचितसे  वाढून ८६२ झाले असले तरी विशेषतः कर्नाटकच्या सीमेला लागून असलेल्या भागात गर्भलिंगनिदान करणारी, बेकायदेशीर आणि असुरक्षित गर्भपात सेवा पुरवणारी छुपी यंत्रणा मोठ्या प्रमाणात काम करते, हे सर्वश्रुत आहे. सीमावर्ती भागांमध्ये पी.सी.पी.एन.डी.टी. कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा अधिक संवेदनशील आणि दक्ष असावी अशी मागणी आम्ही सातत्याने करीत असताना त्याकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. उलट, अशी बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या माफियांसोबत त्यांचे हितसंबंध असल्याचा संशय आहे, आणि याची सखोल चौकशी करावी अशी आमची मागणी आहे.

हे देखील स्पष्ट आहे की सुरक्षित गर्भपाताच्या सेवा जर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतील, आणि असलेल्या आरोग्य सेवा गरजू स्त्रियांना सुरक्षित व कायदेशीर गर्भपाताच्या सेवा पुरवत नसतील तर डॉ. खिद्रापुरे सारख्या धंदेवाईक प्रवृत्तींचे आयतेच फावते. ज्यांना खरोखरीच गर्भपाताची गरज आहे अशा स्त्रियादेखील गावोगावच्या बेकायदेशीर व असुरक्षित गर्भपाताच्या सेवांकडे ढकलल्या जातात. गर्भलिंगनिदानाचा मुद्दा व गर्भपाताचा मुद्दा पूर्णपणे वेगळा असतानाही त्यांची विनाकारण सांगड घातल्यामुळे स्त्रियांच्या आरोग्याची स्थिती आणखीनच गंभीर बनली आहे. म्हैसाळच्या या घटनेमध्ये हे दोन्ही मुद्दे स्पष्टपणे समोर आले आहेत. गर्भलिंगनिदानाला विरोध करत असताना गरजू स्त्रियांना सुरक्षित गर्भपाताच्या सेवा मिळाल्याच पाहिजेत अशी आमची भूमिका असून, हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणांनी घ्यायला हवी.

म्हैसाळ सारख्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कृत्य होत असताना त्याची माहिती इतर कुणालाही नसणे हे या घटनेचे गांभीर्य बघता न पटणारे आहे. तळमजल्यासहीत तीन मजल्याची इमारत उभी करण्यासाठी परवानगी देणारी ग्रामपंचायत यंत्रणा, या सर्व बेकायदेशीर कृत्यां मध्ये सहभागी असणारा डॉ. खिद्रापुरेचा कर्मचारी वर्ग, त्याच्या हॉस्पिटलच्या आजूबाजूला व्यवसाय करणारे छोटे-मोठे व्यावसायिक, हॉटेल चालक, पेशंटची ने-आण करणारी स्थानिक वाहतूक यंत्रणा, तालुक्यातील व जिल्ह्यातील देखरेख ठेवणारी शासकीय यंत्रणा, स्थानिक लोक प्रतिनिधी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे म्हैसाळमधील आणि मिरज तालुक्यातील इतर खाजगी वैद्यकीय व्यावसायिक किंवा त्यांच्या संघटना यांना या सर्व बेकायदेशीर व घृणास्पद कृत्याची माहिती नसेल असे मानणे केवळ दिशाभूल करणारे ठरेल. एम.टी.पी. कायद्यानुसार गर्भपात केंद्र म्हणून नोंदणी केली होती का? ती कुणी आणि कशाच्या आधारावर दिली? सोनोग्राफी यंत्राचे पी.सी.पी.एन.डी.टी. कायद्याखाली नोंदणी केली होती काय? नोंदणी केली असेल तर वेळोवेळी पाहणी झाली होती काय?  अन्न व औषध प्राधिकरण (Food and Drugs Administration – FDA) ने नियम कडक केले असतानाही गर्भपातासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्या आणि इंजेक्शन्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांना कशी मिळाली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे चौकशी मधून पुढे येतील अशी आमची अपेक्षा आहे. ह्या प्रकरणाचा अहवाल एक महिन्याच्या सादर करून जाहीर करावा अशी देखील आमची मागणी आहे..

तसेच मृत्यू पावलेल्या स्त्रीच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची आणि विशेषतः तिच्या मुलींच्या शिक्षण व पालन-पोषणासाठी शासनाने त्वरित व्यवस्था करावी अशी आम्ही मागणी करतो.

म्हैसाळच्या घटनेची चौकशी करणाऱ्या समितीला स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले असून, त्याच्या प्रती मा. आरोग्य महासंचालक, महाराष्ट्र राज्य, राज्य समुचित प्राधिकारी (State Appropriate Authority), पी.सी.पी.एन.डी.टी, महाराष्ट्र राज्य आणि मा. आरोग्य मंत्री, महाराष्ट्र ह्यांना पाठवण्यात येत आहेत.

 

    आनंद पवार                                    किरण मोघे

  सम्यक संस्था, पुणे                     अ.भा.जनवादी महिला संघटना, महाराष्ट्र

९८५०५१६२३७                              ९४२२३१७२१२

उडान संघटना – पश्चिम महाराष्ट्र, भारतीय महिला फेडरेशन, मासूम, तथापि, स्त्री मुक्ती संघटना, नारी समता मंच, आलोचना, चेतना महिला विकास केंद्र, लोकायत-अभिव्यक्ती, नवनिर्माण न्यास, समाजवादी महिला सभा, श्रमिक महिला मोर्चा, सीफार, सोपेकॉम, श्रमिक मुक्ती दल (लोकशाही), स्त्री वाणी, भारिप बहुजन महासंघ – महिला आघाडी, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, रचना विकास संस्था, स्वाधार, माहेर, व अन्य घटक संघटना

चित्र साभार: जुनी विषमता, नवे तंत्रज्ञान, सेहत-मासूम प्रकाशन

2 Comments
  1. Sneha says

    खरे तर सर्वच स्त्रियांच्या बाबतीत हे घडत असते पण या लैंगिक विषयाबाबत उघडपणे बोलणे आपल्या संस्कृतीला मान्य नसल्याने याबाबतीत उद्भवणाऱ्या अनेक समस्या या उघड होतच नाहीत. बऱ्याचदा हा प्रकार अगदी सुशिक्षित पुरुषांकडूनही घडत असतो.. पण मग स्त्री पुरुष नात्याला अर्थच नाही उरणार.. लग्न झाले म्हणजेच लैंगिक सुख मिळवण्यासाठी कायदेशीर मान्यता मिळाली इथेच पुरूषाला दोषी ठरवण्यावर मर्यादा येतात. आणि अशा छोट्या पातळीवर होणारा तोही आपल्याच पतीकडून त्याला चूक म्हणता येईल पण अत्याचार म्हणता येत नाही म्हणूनच त्याला शिक्षाही देणे चुकीचे ठरते. हो पण नियमितपणे हीच चूक घडत असेल आणि स्त्रीला सतत त्या गोष्टीबाबत कोंडमारा सहन करावा लागत असेल तर तिने प्रथम हे पतीच्या लक्षात आणून द्यावं आणि तरीही जर हेच होत राहीलं तर तिने विचारपूर्वक निर्णय घ्यावा व दूर व्हावं (कायदेशीर) असं मला वाटतं.

    1. I सोच says

      अगदी खरं आहे तुमचं म्हणणं… तुमचे अनुभव वेबसाईटसाठी लिहा…आम्हाला आवडेल

Comments are closed.