मी काय काम करतो हे मी माझ्या बायकोलाही नाही सांगू शकलो…

1,426

माझ्या पुरुष मित्रांनो,

नमस्कार.. आपला समाज पुरुषप्रधान आहे हे वाक्य आपण खूपदा वाचलं आहे, ऐकलं आहे. पुरुषप्रधान समाजात स्त्रियांचं स्थान दुय्यम असतं तर पुरुष वरचढ ठरतात हे ही आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनुभवतो. पण हीच पितृसत्ता पुरूषांच्याही भयंकर गोच्या करते, अनेक लोचे करते ज्याचा फटका पुरुषांना बसतो आणि आम्ही माणूसपणाला पारखे होतो. कसं ते पाहू Man to Man या सदरामधून….

—-

सकाळी १० वाजताची वेळ ठरली होती ऑपरेशनसाठी. माझी नसबंदी होणार होती. म्हणजे कुटुंब नियोजनासाठी मी आणि माझ्या पत्नीने हा निर्णय घेतला होता. सकाळी ८ वाजताच मी ‘पूर्ण तयारीनिशी’ दवाखान्यात दाखल झालो. शस्त्रक्रियेआधीची काही औषधं घेवून झाल्यानंतर थोड्या वेळानं मला ब्रदर (दवाखान्यात जशा सिस्टर असतात तसेच इथे ब्रदर होते) ने शेविंग करून घेण्यासाठी एका खोलीत जायला सांगितलं. पुरुष नसबंदीची शस्त्रक्रिया पुरुषांच्या वृषणांना छेद देवून करावी लागते. त्यासाठी ती जागा स्वच्छ करावी लागते. मी भावाला (म्हणजे ब्रदरला) म्हणालो, ‘मी घरीच तशी तयारी करून आलो आहे.’ पण त्याने त्यांचं समाधान झालं नसावं किंवा कदाचित त्यांना त्यांच्या पद्धतीने तशी तयारी करण्याच्या सूचना असतील म्हणून मला खोलीत जावं लागलं. कुठल्याही शस्त्रक्रियेचा आणि विशेषतः नसबंदीचा हा माझा पहिलाच अनुभव होता! त्यामुळे मी अगोदरच नर्वस होतो त्यात आता हे काय म्हणत मी खोलीत गेलो आणि स्ट्रेचरवर जावून झोपलो.

अंदाजे पाच कमी पन्नास चे एक काका आत आले. माझाच नर्वसनेस कमी करण्यासाठी मी स्ट्रेचर वरूनच त्यांना नमस्कार म्हणालो तर ते माझ्याकडे पाहून हसल्यासारखे वाटले. त्यांनी आपली साधनं टेबलवर काढली, मला एप्रन काढावयास सांगितला आणि विचारलं, ‘कसलं आपरेशन हाय तुमचं?’ मी सांगितलं तर म्हणाले, ‘मुलं किती तुम्हाला?’ मी म्हणालो, ‘एक.. मुलगी आहे.’ थोडा वेळ काही न बोलता त्यांनी त्यांची तयारी पूर्ण केली. मग मीच म्हणालो, ‘मी घरीच शेव्ह करून आलो आहे, तुम्ही हवं तर फक्त चेक करून घ्या.’ ‘तेवढं नाही पुरत, डॉक्टर ओरडतेत नंतर, वर करा ते कापड.’ मी गुमान एप्रन वरती केला. त्यांनी माझ्या ओटीपोटापासून शेविंग करण्यास सुरुवात केली आणि स्वतःच बोलू लागले, ‘मागचे ८-१० वर्षे मी इथं हाय. इतर कामासोबतच हे बी काम करावं लागतंय. हे काम आवडत नाही मला पण काय करणार नोकरीसाठी करावं लागतं. नाही म्हणता येत नाही.’

त्यांना माझ्या प्रतिसादाची अपेक्षा होती कि नाही ते मला कळत नव्हतं आणि काय प्रतिसाद द्यावा हे ही कळत नव्हतं. मीच अवघडलो आणि म्हणालो, ‘म्हणूनच मी घरीच करून आलो होतो.’ ‘तुमचं बरोबर हाय. पर हे तर करावंच लागतं. कुणालाबी बोलता येत न्हाई कामाबद्दल. माझ्या बायकोलाबी इतक्या वर्षात कधी बोललो न्हाई मी हे काम करतो ते.’ मी म्हणालो, ‘कामात काय आसतंय, सगळी कामं महत्वाची असतात, मोबदला योग्य मिळाला पाहिजे तेवढा.’

काम झालं आणि मी अधिक नर्वस होऊन बाहेर पडलो. या कामाचे त्यांना काही वरचे पैसे द्यावेत का नाही याचाही निर्णय करू शकलो नाही म्हणून अधिक ओशाळलो वर फुकटचा सल्ला मात्र दिला. आमच्या या थोर समाजात मुळात श्रमाला प्रतिष्ठा नाही, किमत नाही. श्रमाला इतका हीन दर्जा देणारा दुसरा कुठला समाज या पृथ्वीतलावर नसेल. नुसती किमतच नाही असं नाही तर जन्मावरून काम आणि कामावरून त्या व्यक्तीचं सामाजिक स्थान आपण ठरवतो. त्यातही या पुरुष प्रधान समाजात पुरुषांचीच अशी काही गोची करून ठेवली आहे की कोणाला सांगण्याची सोय नाही. लोकांचे केस कापण्याचे काम एक तर ‘हलके’ समजले जाते त्यात इतर पुरुषांचे जनन इंद्रियांवरील केस कापणे तर अधिकच हीन. स्वतःच्या पत्नीला देखील हे काका मागची दहा वर्षे आपण हे काम करतो असं सांगू शकले नाहीत. खरा पुरुष, खरा मर्द असण्याच्या तद्दन जुनाट, भंगार कल्पना आणि काटेरी चौकटी समोर ठेवून आम्हा सर्व मुलग्यांना वाढवलं जातं आणि आमच्यापैकी जे या चौकटीत बसत नाहीत त्यांच्या अशा गोच्या केल्या जातात की ते सर्व आयुष्य लपत छपत, ढोंग करत किंवा स्वतःत कुढत पण वरती खोटा आव आणत जगतात. ज्यांना हा ताण सहन होत नाही ते तुटतात मग त्याची चेष्टा होते, हिणवलं जातं, नामर्द म्हटलं जातं. ही कुचंबणा थांबवायची असेल तर मर्दपणाच्या या चौकटी तोडतानाच श्रमालाही प्रतिष्ठा मिळवून द्यावी लागेल.

तुम्हाला काय वाटतं ते मला जरूर कळ्वा…

नोट – या काकांना ते कोणत्या जातीचे आहेत हे मी विचारले नाही. पण ते विचारण्याची गरजही नव्हती. प्रतिष्ठा नसलेली सर्व कामं आपल्या ‘जातप्रिय’ समाजात कुठले समूह आणि वर्ग करतात हे आपण स्वतःलाच विचारूयात.

(क्रमशः)

पुढील भागात : माझी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया आणि त्यावरील कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिक्रिया

Comments are closed.