मी नाही साला तुझी बायको होणार..

2,857

मी नाही साला तुझी बायको होणार..
झाले तुझी बायको तर काय म्हणशील?
काढ कपडे, ढाळ चवर्‍या, हो माझी चिअर लीडर?
हटहट, झटसे निकल पतली गलीसे फटाफट
चिअर लीडर व्हायला अडलंय माझं खेटर
मारीन मीच, एक नाही चार चौके सहा सिक्सर
तेव्हा तू कुठे स्टेड्यमातपण नसणार..
मी नाही साला तुझी बायको होणार.

काय म्हणतोस, मी तुझी शिडी?
जमनीत पाय रोवून उभी राहणार?
आणि नुस्ता काय तू वरवर चढणार?
तू इंद्रधनुष्य रापणार आकाशातलं
नि मी आढ्यावरची वटवाघळं मोजणार?
हे नाही गड्या जमणार..
मी नाही साला तुझी बायको होणार!

काय म्हणालास, मी ’वाटबघी’?
भास्कर्रावची वसुंधरा?
सोड यार डोळे उघड,
आकाशगंगेत सूर्य रग्गड
आईस्शत, या छोट्याश्या आयुष्यात
ओसाडावरच्या आभाळात तं तश्श्यात
पण माझी मीच च्यांदनी होऊन चमचमणार
तुझी बायको?
साला मी नाही होणार..

काय बोललास,
तू जेवणार, आणि मी ’वाराघालू’?
तू झोपणार, आणि मी ’गोट्यातोलू’?
काय म्हणालास,
तू नांगरणार, नि मी ’भाकरभाजू’?
तू लढणार नि मी ’भांडीघासू’?
तू टपाटप्‌ घोड्यावरून येणार,
माझी तासंतासांची रांगोळी
खुशाल खुराखाली घेणार..
तुझ्या सोयीचा हा मामला
पण मी हळूहळू नाही बोंबलणार!
छे:
साला.. मी.. नाही.. तुझी.. बायको.. होणार!!

मी पाहिलेत ना तुझे आज्जी-आजोबा आणि माझे,
आत्या-आत्तोबा, मावश्या-मावसोबा,
काका-काकवा, मामा-माम्या,

बहिणी-मेव्हणे नि भाऊ-वहिन्या,
कुटुंबसंस्थेची थोर मदार ज्यांच्या खांद्याला
आई अन्‌ बाबा.. तुझे आणि माझे
जाऊं दे साला, ज्याचं त्याला आणि गाढव ओझ्याला..
गंडवागंडवी, फसवाफसवी, लपवाछपवी, चकवाचकवी..
त्याच्यापेक्षा आपुन बरे की ’आपला काम’ काम बरा असणार
मी? बायको? तुझी? नाही होणार..

काय म्हणतोस,
“तिज्यायला, चर्चा करून का कुठं पोरं होतात?
एक दिवस आई व्हायचंच की गं तुला..”
हो तर! आई व्हायचंच की मला..
पण त्यासाठी बा झवला, तुझीच पोरं रे कशाला?
तुझ्यासारखीच व्हायला?
एक सांग मला,
कुंभाराची का नकोत, चांभाराची का नकोत?
म्हारा-बामणाची, परभ्या-पाटलाची
पारशा-किरिस्तावाची, जैना-मुसलमानाची
का नकोत?
हो तर..
कोण बरा बाप भेटला माझ्या पोरासाठी,
तर आई व्हायचंयच की मला..
पण कोण बरा नि कोण बुरा ते मी ठरवणार
आणि आईच्यान्‌ सांगते,
सगळ्या जगाची भले झाले आई..
तरी तुझी बायको? नाही होणार!

~
मेघना पेठे

 

7 Comments
 1. विखारी वास्तव मांडलय मेघना पेठे यांनी. स्त्रीची दाबलेली, दुर्लक्षित, गृहीत धरलेली लैंगिकता …हेच वास्तव आहे बहुतांशी..आणि तिनंही कधी प्रतिकार केला नाही…तीही अडकली आहे योनिशुचीतेच्या जंगलात..तुमच्या कवितेतील स्त्री आहे जिवंत प्रत्येक स्त्रीमध्ये..पण ती जोरात ओरडून सांगत नाही तिच्या मनातलं..लाथाडत नाही तिचं विश्व त्याने व्यापलेलं..तुमची कविता प्रेरणा आहे अशा स्त्रियांसाठी आणि एक नग्न सत्य पुरुषांसाठी…एक धमकी..की कधीही ती लाथाडू शकते त्याला, त्याच्या बंदिस्त आणि क्रूर लैंगिकतेला..वासनेला..

  1. I सोच says

   खरं आहे… धन्यवाद… तुमचे विचार, प्रतिक्रिया आणि सूचना आमच्यासाठी महत्वाच्या आहेत…

 2. महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील says

  मी पण साला तुझा
  नवरा नाय व्हणार
  झालो तुझा नवरा
  तर काय म्हणशील
  धू कपडे,
  नाच माझ्या तालावर
  हो माझा नाच्या
  अरे हट! हो उडं….छू…..
  ट्यां… ट्यां…. फिस…. फिस…
  अरे आपल्या मर्दूमकीसाठी
  आपण नाय कुणापुढे झुकणार

  तुझी कसलीही सरबत्ती
  आपल्यापुढे आता नाय चालणार
  माझी शाब्दीक शेरेबाजी
  हेच माझे चौकार षटकार
  तू याची देही याची डोळी अनुभवणार
  अरे हट चल
  मी पण नाही साला तुझा नवरा व्हणार
  अरे काय म्हणतेस तू माझी शिडी
  तुझी लाघट गोडी आपल्याला नाय चालणार
  स्री पुरुषाच्या नात्याची पायरी,खोली
  तुला रे काय कळणार

  उघड डोळे
  बघ नीट
  ये जमिनीवर
  नको करुस खाली मुंडी
  अन् पाताळधुंडी
  मी काबाडकष्ट करुन राबराबणार
  अन् तू काय नुसत्या
  आयत्या पिठावरती रेघोट्या मारणार
  असलं नाय रे आपल्याला चालणार
  उसणं अवसान आणून
  तू शुक्राची चांदणी बनुन चमचमणार
  अन् मी काय नुसत्या
  ढगात गोळ्या झाडत बसणार
  अरे हट चल हो बाजूला
  असला खुळा नाद
  आपल्याला पण नाय चालणार

  मी पण साला तुझा नवरा नाय व्हणार
  अरे काय म्हणतेस
  मी जेवणार अन्
  तू वारा नाय चालणार
  अरे हट चल
  जेवणासाठी आपण पण
  कुणाच्या ताटाखालचं
  मांजर नाय बनणार
  बिनधास्त आपणपण कुठंतरी
  मिटक्या मारत बसणार
  अन् तू काय नुसता वास घेत बसणार

  हो मी नांगरणार
  हो मी लढणार
  घोड्यावरती टापाटाप करत
  मजल दर मजल करणार
  आपल्या जोगी जी कामे
  ती आपण पुरेपुर करणार
  आपणपण नाय तुझ्या सारखी
  भांडी घासणार
  भाकरी भाजणार
  अन् तासनतास नाय विनाकारण
  रांगोळी काढत टाईमपास करणार
  सारा काही आहे
  तुझ्या सोयीचा मामला
  काही काम नाही
  म्हणुन उगाचच बोंबला

  मी पण नाही साला
  तुझा नवरा नाय व्हणार
  नात्याचा फोल खेळ उगाचच
  मांडतेस कशाला
  खोट्या शीव्या शाप दुषणं
  उगीचच का देतेस कुणाला
  तुझ्यासाठीच असेल साला
  जाऊ दें ज्याची त्याला
  अन् गाढव नुसतं मेलं ओझ्याला
  तुला रे काय कळणार संसारात
  कसा असतो एकमेकांसाठी
  जीवसांठी जीव टांगलेला
  संसाराचा गाढा नाही
  उगीचच हाकलेला
  हा बोलबाला तुला रे नाय कळणार

  म्हणुन साला आपणपण
  तुझा नवरा नाय व्हणार
  वरचष्म्याने पाहण्याचा अँगल
  जेंव्हा तू बदलणार
  तेव्हांच फसवाफसवी,चकवाचकवी
  लपवालपवी सारं काही संपणार
  मी पण साला
  तुझा नवरा नाय व्हणार
  काय म्हणतेस
  सगळा फाफट पसारा,
  वादविसंवाद उगीचच कशाला
  बाराखडी वाचून
  अ रे आईचा अन्
  ब रे बाबाचा
  नाय बनता येत रे कुणाला

  हो तर बा व्हयचंय की रं मला
  पण त्यासाठी व्यभिचाराची
  सारवासारव नाय करायची मला
  ना कोणत्या जातीचा ना पातीचा
  अनाथांचा नाथ व्हयचंयकी रे मला
  उगीचच ह्याचे त्याचे दाखले
  नाय देत बसायचं मला
  कोण बरी बापडी भेटली तर
  माझ्या लेकरांसाठी बा व्हयचंय की मला
  पण कोण खरा
  कोण खोटा
  कुठं छापा अन् कुठं काटा
  हे कोण रे ठरवणार
  म्हणुन बापाच्यान सांगतो सगळ्या
  जगाचा जरी झालो पिता
  पण साला मी तुझा नवरा नाय व्हणार.
  ©- महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील

  1. I सोच says

   मित्रा, वेबसाईटवर मेघना पेठेंची कविता वाचण्यासाठी आणि तुझी ही लांबलचक कविता लिहिण्यासाठी तुझा अमूल्य वेळ दिलास त्याबद्दल आभारी आहे. पण फक्त विरोधासाठी विरोध करून चालणार नाही. बघूयात बाकी लोकांना याविषयी काय वाटतं ?

 3. Mahendrakumar says

  मित्रा त्या अतिषय मोठ्या कवयित्री आहेत. पण त्यांनी केलेला अश्लील भाषेचा वापर मला नाही पटला.त्यांची कविता त्यांच्या ठिकाणी योग्य आहे.माझी कविता ही फक्त त्यांच्या कवितेला दिलेलं फक्त उत्तर आहे.मी साधा अन् सर्व सामान्य माणुस आहे.
  कृपया सांगा तुम्हाला रोष कुठे दिसला.?

  1. महेंद्र says

   सोच
   उत्तराची वाट पाहतोय

   1. let's talk sexuality says

    कुठला प्रश्न?

Comments are closed.