विजय तेंडुलकर लिखित “मित्रा” बद्दल

726

मध्यंतरी एका कार्यक्रमानिमित्त रवी जाधव दिग्दर्शित तेंडुलकरांच्या कथेवर आधारित “मित्रा” ही फिल्म बघितली. फिल्म तशी ठीकच आहे पण कथेबद्दल तेंडुलकरांच्या दृष्टीकोनाचं कौतुक करावसं वाटलं. *केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे “कलाकाराला दूरच्या हाका ऐकू येतात…” “मित्रा” वाचताना लेखक म्हणून तेंडुलकरांचं श्रेष्ठत्व यात जाणवतं की ४०-५० वर्षांपूर्वी त्यांनी “मित्रा” लिहिली आणि कदाचित् त्यांना तेव्हाच दूरची हाक ऐकू आली असावी. तो काळ असा होता जेव्हा समलैंगिकतेबद्दल अशी कथा लिहिणं तर दूर पण समलैंगिकतेबद्दल विचार करण देखील कठीण जात असावं. या कथेचं सर्वात पाहिलं वैशिष्ट्य मला वाटतं ते म्हणजे हेच की आजही ज्या विषयाकडे अनैसर्गिक, घाण, विचित्र, वेगळं या दृष्टीकोनातून पाहिलं जातं तिथं अशा विषयावर त्या काळात कथा लिहिणं म्हणजे कमाल आहे!

गोष्ट आहे “मित्रा” ची… नैसर्गिकरित्या मुलीचं शरीर असूनही स्वतःमध्ये कुठेतरी एक पुरुष दडलाय असं वाटणारी, कॉलेजच्या इतर मुलींमध्ये वावरत असताना मनात पुरुषी ताकतीची जाणीव निर्माण होणारी, स्वतःच्या रूम पार्टनर वर प्रेम करणारी, रेक्लेस, बिन्दास्त मित्रा! कथेची सुरवात होते “मित्रा” चा बालपणीचा आणि कॉलेज मधला एकुलता एक मुलगा मित्र असणाऱ्या विन्याच्या आठवणींमधून! आणि मग संपूर्ण कथा आपल्याला “मित्राच्या” समलैंगिकतेमधील विविध पैलू उलगडून दाखवते. तिचं पुरुषी वागणं, नाटकाच्या प्रयोगावेळी विन्या कडून सिगरेट मागून पिणं, तिला स्वतःच्या वेगळेपणाविषयी वाटणारी अस्वस्थता, तिचं तिची रूम पार्टनर उर्मिलावर जडलेलं प्रेम, तिच्याबद्दल वाटणारं शारीरिक आकर्षण आणि सामाजिक पातळीवर लैंगिकतेवर घातलेली बंधनं धुडकावून उर्मिलाला आपलंसं करण्याची इच्छा आणि त्यातून निर्माण होणारा तणाव या व इतर अनेक पैलूंना हात घालताना तेंडुलकर आपल्याला एक वाचक म्हणून सुन्न करून सोडतात आणि लैंगिकतेबद्दल असणाऱ्या आपल्याच संकल्पनांवर प्रश्न उपस्थित करायला लावण्यास भाग पाडतात.

कथेमधील अनेक प्रसंगांपैकी एक प्रसंग इथं आवर्जून मांडावा वाटतो. तो प्रसंग म्हणजे जेव्हा मित्रा आणि विन्या एका निवांत जागी एकत्र भेटतात आणि मित्रा तिच्या मनातील गोष्टी विन्यासमोर उघडपणे मांडते. प्रसंग आहे जेव्हा मित्राची रूम पार्टनर उर्मीचं लग्न ठरलंय आणि ती लवकरच अहमदाबादला जाणार आहे. या प्रसंगापर्यंत आपल्याला हे लक्षात आलंय की मित्रा इतर मुलींसारखी साजरी-गोजरी, नटायला आवडणारी अशी मुलगी नसून वेगळी आहे परंतु या प्रसंगामध्ये ती विन्यासमोर तिचा हतबलपणा, तिला स्वतःविषयी वाटणाऱ्या तिटकाऱ्याविषयी, रागाविषयी, स्वतःबद्दल वाटणाऱ्या घृणेविषयी मनापासून बोलते आणि खासकरून तिला उर्मीलाविषयी वाटणाऱ्या आकर्षणाची कबुली देते. एवढ्यावर येऊन तो प्रसंग थांबत नाही तर आपल्याला तिच्याच तोंडून तिची एक डार्क साईड समजते. तिला उर्मिलाविषयी वाटणारं पजेशन! तिला कोणत्याही परिस्थितीत आपलंसं करून घेण्यासाठी तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी तिच्या मनात पेरलेलं विष, त्याला पुरुषाच्या नावानं लिहिलेली अर्वाच्य पत्र, तिने उर्मिलावर मिळवलेला ताबा या सर्वांची कबुली मित्रा विन्याजवळ करते आणि त्यातून एक वाचक म्हणून आपल्याला अस्वस्थ करते. दोन भिन्नलिंगी व्यक्ती – मित्रा आणि विन्या यांच्यातल्या संभाषणातून एक वाचक म्हणून आपल्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. मित्राच्या मनातील खळबळ आपल्याला भेडसावून सोडते, आपल्याला अस्वस्थ करते… मुलीचं शरीर असूनही तिला एका दुसऱ्या मुलीबद्दल वाटणारं आकर्षण आणि सामाजिक बंधनांमुळे निर्माण होणारे स्वतःबद्दलचे प्रश्न कुठेतरी आपल्यावरही दडपण आणतात आणि ती बंधनं आणि समाजाच्या दांभिकतेविषयी विचार करण्यास भाग पाडतात. या प्रसंगामध्येच विन्याला तिच्याबद्दल एक मैत्रीण म्हणून वाटणारी आपुलकी, तिचं वागणं, बोलणं समजण्याचा प्रयत्न करताना समाजाचा एक भाग म्हणून ते सर्व कसं घृणास्पद आहे असं वाटणं आणि त्यातून त्या दोघांच्या नात्यामध्ये निर्माण झालेला तणाव हा देखील आपल्याला भेडसावून सोडतो आणि एक मित्र म्हणून आपण जर का विन्याच्या जागी असतो तर काय केलं असतं, काय stand घेतला असता असा प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतो.

कथेतील दुसरा महत्वाचा प्रसंग म्हणजे “मित्रा” ने शेवटी तिच्या हतबलपणातून घेतलेला निर्णय! उर्मिलाचं प्रेम मिळवण्याचे नानाविध प्रयत्न करून, विन्याला तिच्या मागावर रहाण्याची, तिची गुप्तहेरी करण्याची विनंती करून आणि दारू पिण्याची इच्छा व्यक्त करून स्वतःचा पलायनवादी दृष्टीकोन दाखवणारी मित्रा जेव्हा सर्व बाजूंनी कोंडमाऱ्यात सापडते तेव्हा शेवटचा उपाय म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. कथेतील हा प्रसंग पुन्हा एकदा आपल्याला आपणच तयार केलेल्या सामाजिक बंधनांवर प्रश्न उपस्थित करण्यास भाग पाडतो. एखाद्या व्यक्तीची लैंगिकताच त्या व्यक्तीला मारक का ठरावी? असा तो प्रश्न आहे. खरं पाहता आपली लैंगिकता आपल्याला आनंद देणारी, माणूस म्हणून प्राणी जगतात आपल्याला वेगळ्या पातळीवर नेणारी असते पण मग “मित्रा” सारख्या मुलीचं असं का व्हावं? हा प्रश्न कथा संपल्यानंतर देखील मनाला भेडसावत राहतो. केवळ एका विशिष्ट सामाजिक चौकटीमध्ये नं बसणारी “मित्रा” जेव्हा स्वतःला संपवण्याचा विचार करते तेव्हा एक प्रश्न सतत उपस्थित होतो आणि तो म्हणजे भलेही लैंगिकते मधील विविधता हा ज्या समाजाचा एक अविभाज्य घटक आहे, त्याच समाजाचा एक भाग असणाऱ्या “मित्रा” ला तिच्या लैंगिकतेमुळेच समाजापासून तुटल्यासारखे का वाटते? कदाचित् तसं तिला वाटतं त्याचं कारण आहे तिच्यावरील सामाजिक बंधनं, मुलगी म्हणून तिच्या कडून समाजाने केलेल्या अपेक्षा आणि त्या अपेक्षा पूर्ण नं झाल्यानं तिला स्वतःपासून वेगळं करणारी समाजाची प्रवृत्ती!

या कथेमध्ये “मित्रा” त्या व्यक्तींना रीप्रेजेन्ट करते जे समाजाचा भाग असूनदेखील समाजाच्या टिपिकल चौकटीत बसत नाहीत, “विन्या” त्यांना रीप्रेजेन्ट करतो जे मित्रासारख्या व्यक्तीची हतबलता, तिच्यावरील सामाजिक दबाव समजू शकतात पण एका शक्तिशाली, रिजिड, जुनाट सामाजिक व्यवस्थेपुढे काही करू शकत नाहीत किंवा करण्याची इच्छा बाळगत नाहीत आणि “उर्मिला” त्या समाजाला रीप्रेजेन्ट करते जो आपल्याच चौकटीमध्ये इतका अडकलाय की त्याला मित्रासारखी व्यक्ती आपला हिस्सा नं वाटता तो त्या व्यक्तीला एक परकी, विचित्र, वेगळी, घाण व्यक्ती म्हणून पाहतो आणि तिची सतत हेटाळणी करतो.

आज देश स्वतंत्र होऊन ६२ वर्षं उलटून गेली आहेत परंतु तरीही आपला समाज अनेक बंधनांपासून स्वतंत्र झालेला नाहीये… समाजाच्या या बंधनांबद्दल प्रश्न उपस्थित करणारी “मित्रा” ची कथा आजही तितकीच महत्वपूर्ण, खळबळजनक आहे जितकी ती जेव्हा लिहिली गेली असेल तेव्हा होती! *सार्त्रने म्हटल्याप्रमाणे लेखक दोन प्रकारचे असतात – एक ते जे वाचकाला सिडेट करतात आणि दुसरे ते जे वाचकाच्या सेन्सेस मध्ये खळबळ माजवतात. “मित्रा” वाचताना आपल्याला लक्षात येतं की तेंडुलकर यातील दुसऱ्या प्रकारात मोडणारे लेखक आहेत आणि “मित्रा’ ची कथा आपल्या सेन्सेस मध्ये खळबळ निर्माण करते. लैंगिकतेविषयी आपल्या मनात असणारे प्रश्न आणि त्याबद्दल बोलू नं देणारा समाज आणि त्यातून तयार होणारी “मित्रा” सारख्या मुलीची व्यथा आजही कुठेतरी आपल्या आजूबाजूला अस्तित्वात आहे, आणि कदाचित् अशा अनेक “मित्रा” स्वतःचं आयुष्य हतबलतेमधून, स्वतःला स्वतःबद्दल वाटणाऱ्या घृणेतून संपवत असतील किंवा स्वतःला वेगळं, घाण समजून मानसिक दृष्ट्या खच्ची होत असतील आणि एक समाज म्हणून आपल्याला या व्यथेची जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थी स्वतंत्र होणार नाही हेच खरं!

—– निहार सप्रे

*अविनाश सप्रे यांच्या संदर्भातून

 

 

 

Comments are closed.