मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात का? – प्राजक्ता धुमाळ

1,132

मागील महिन्यात हा प्रश्न वेबसाईटवर पोल साठी टाकण्यात आला होता. महिन्याभरात ४४६ व्यक्तींनी या प्रश्नावर आपलं मत नोंदवलं. २३० व्यक्तींनी ‘हो’ या पर्यायावर क्लिक करून मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात, असं मत नोंदवलेलं आहे तर १७५ व्यक्तींनी ‘नाही’ या पर्यायावर क्लिक करून मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार नसतात, असं मत नोंदवलेलं आहे.

मत नोंदवलेल्या ४४६ व्यक्तींपैकी जास्तीत जास्त व्यक्तींना – मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात, असं वाटत आहे, ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. आपण आपल्या तालुक्यात, आपल्या गावात, आपल्या राज्यात आणि देशात घडलेल्या छेडछाडीच्या बातम्यांचा आढावा घेतला, अगदी अलीकडच्या, सध्या घडत घडलेल्या छेडछाडीच्या, बलात्काराच्या बातम्या नीट लक्षात घेतल्या तर समजू शकतं की कोणत्याही बाईला, मुलीला असं वाटत नसतं की तिची छेड काढली जावी. अगदी जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरातल्या मुलींना/महिलांना विचारून बघता येईल. ‘मुलीला/महिलांना मुलांनी/पुरुषांनी छेड काढलेली आवडते’, ‘पुरुषांनी छेड काढावी यासाठीच मुली/महिला नटतात किंवा छोटे कपडे घालतात,’ ‘मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात’ असे गैरसमज आपल्या पुरुषप्रधान समाजात पसरलेले आढळतात. पण हे फक्त आणि फक्त गैरसमजच आहेत. बाईला उपभोगाची वस्तू समजणाऱ्या पुरुषी मानसिकता असलेल्यांनी ते स्वतःच्या सोयीसाठी, बचावासाठी तयार केलेले आहेत. छेडछाडीमुळे अनेकदा मुलींचं आयुष्य उध्वस्त होतं, आयुष्यभर अनेक वाईट परिणामांना सामोरं जावं लागतं. असं असताना कोणत्याही मुलीला/बाईला छेडछाड आवडण्याचा अथवा ती स्वतः या गोष्टीला कारणीभूत होण्याचा प्रश्नच येत नाnsही.

मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार नसतात, तर स्त्रियांना पुरुषांच्या करमणुकीचं, उपभोगाचं साधन समजणारी पुरुषी वृत्ती जबाबदार असते. मुलींना जसं सुंदर दिसावं वाटतं तसं मुलगे/पुरुषही विविध अलंकार, पोशाख करून नटलेले दिसतात, मग मुली त्यांची छेड काढतात का? त्यामुळे त्यांना एखाद्या हिंसेला सामोरं जावं लागतात का? नाही. छोटे कपडे घातल्यामुळे जर मुलींची छेड काढली जात असेल तर जेव्हा एखाद्या वयस्कर महिलेची छेड काढली जाते किंवा अगदी ५-६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक हिंसा होते तेव्हा तिने कुठे छोटे कपडे घातलेले असतात? ह्या लहानग्यांनी कसल्या उत्तेजित हालचाली केलेल्या असतात? तेव्हा मुलींच्या छेडछाडीची उत्तरं छोट्या कपड्यांमध्ये, नटण्या-मुरडण्यामध्ये शोधण्यापेक्षा स्त्रीकडे वस्तूच्या स्वरुपात पाहणाऱ्या पुरुषी मानसिकतेत शोधणं गरजेचं आहे. स्त्रीकडे एक ‘माणूस’ म्हणून पाहिलं, स्त्रीत्वाचा आदर केला तर ही मानसिकता नक्कीच बदलू शकते.

Image courtesy: www.loksatta.com

 

Comments are closed.