मुंबई पुणे मुंबई २ – लग्नाचा असाही विचार

0 904

सतीश राजवाडे दिग्दर्शित “मुंबई पुणे मुंबई-२” हा चित्रपट वरवर पाहता एका लग्नाची गोष्ट वाटते. लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंतचा काळ ! या काळात, चित्रपटातील गौतम आणि गौरी ही एकदम परस्परविरोधी जोडी, एकमेकांना समजून घेण्याचा, संवाद साधण्याचा, एकमेकांशी व कुटुंबाशी जुळवून घेण्याचा कसा प्रयत्न करतात हे दाखवले आहे. मुलीला लग्न करून सासरी जाताना वाटणारी हुरहूर, आपले घर सोडून जाण्याचे दु:ख, आपला जीवनसाथी व त्याचे कुटुंबीय यांच्याबरोबर आपण कसे जुळवून घेणार याची अनामिक भीती हे अगदी सर्वसामान्य वाटते.

पण चित्रपटाच्या तळाशी जाता, नातेसंबंध, त्यातील पारदर्शकता तसेच गुंतागुती, लग्नानंतर मुलगा व मुलगी यांच्यावर असणारा दबाव, जबाबदाऱ्या, लैंगिकतेच्या गैरसमजुती, स्त्री-पुरुष समानता, दोन पिढ्यांमधील समंजसपणा यांसारख्या अनेक मुद्यांवर हा चित्रपट अंतर्मुख करतो.

आपल्या समाजामध्ये लैंगिकतेच्या गैरसमजुती अगदी खोलवर रुजलेल्या आहेत . पुरुषांनी कसे वागावे आणि स्त्री कसे वागावे याचे काही अलिखित नियम बनले आहेत. एखादी स्त्री अथवा पुरुष समाजाने ठरवून दिलेल्या साच्यामध्ये जर राहत नसेल तर त्यांना दोषी ठरवले जाते. या चित्रपटात मात्र आश्चर्यकारकरित्या गौरीचं दारू पिणं, तिचं आधीचं रिलेशनशिपमध्ये असणं, आधीच्या मित्राबरोबर काम करणं आणि अशाच इतर गोष्टी गौतम आणि त्याचे कुटुंबीय अगदी सहजपणे स्वीकारतात. लग्नाच्या आधी गौरीची आई आणि गौरी पहिल्यांदा सासरच्या घरी आली आणि तेव्हा गौरी अचानक गाणं म्हणायला लागली. तेव्हा तिची आई याबद्दल सासरच्यांची माफी मागते, यावरही गौतमचे कुटुंबीय उलट तिचं कौतुक करतात. मुलगी आहे म्हणून तिनं स्वतःला विशिष्ट चौकटीतच ठेवले पाहिजे याला फाटा पाडून चित्रपट एक नवा विचार देताना दिसतो.

गौरी हे पात्र अत्यंत गोंधळलेले, रागीट, अस्वस्थ, अशा प्रकारे रंगवलेले आहे. तिच्या मनामध्ये सतत असुरक्षिततेची भावना दिसून येते. लग्न हा आयुष्यातील खूप महत्वाचा निर्णय, आई-वडिलांना सोडून जाण्याचं दु:ख, आत्तापर्यंत स्वतंत्रपणे वागण्याची सवय ,लग्न झाल्यानंतर आयुष्यात होणाऱ्या बदलांचा एक अनामिक ताण तिच्यावर जाणवतो. तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडचं अर्णवचं, तिच्या आयुष्यात येणं, त्याची होणारा जीवनसाथी गौतमबरोबर तुलना, सगळेच पुरुष कन्फर्मेशन नंतर बदलतात हा गैरसमज तिच्या अस्वस्थतेमध्ये अधिकच भर टाकताना दिसतो. काही प्रसंगातून गौतम तिला गृहीत धरतोय, तिच्या वेळेला आणि कामाला महत्त्व देत नाही असं तिला जाणवायला लागतं. लग्नाचा आपला निर्णय बरोबर आहे की चूक हे पडताळून पाहण्यासाठी ती गौतमकडे वेळ मागते. एकीकडे स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याची धडपड तर दुसरीकडे मी जर असं वागले तर काय होईल, कुटुंबीय आणि इतर नातेवाईक काय विचार करतील याचा ताण यामुळे गौरी तिची द्विधावस्था तिच्या पालकांजवळ व्यक्त करू शकत नाही.

गौरीला स्वतःचे स्वतंत्र विचार असणे ही गोष्ट चांगलीच वाटते; पण त्याचबरोबर तिचे स्वतंत्र विचार जपत असताना घरच्यांच्या तिच्याकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करतानाची घालमेलही दिसते.

गौरीची मैत्रीण व मावशी यांना गौरीच्या मनातील गोंधळ, अगदी तोंडावर आलेलं लग्न मोडण्याची शक्यता या गोष्टी माहित असतानाही त्यांचं तिच्याबरोबर असणं, आपलं मत तिच्यावर न लादता तिला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी स्पेस देणं; जेव्हा तिच्या वडिलांना तिच्या या निर्णयाबद्दल समजते तेव्हा त्यांनी स्वतःचा किंवा समाजातील इतर लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं खूपच भावतं.

सामान्यतः लग्नामध्ये असणारा हुंडा, देणं-घेणं, मानपान, रुसवा-फुगवा या गोष्टी जरी चित्रपटातील लग्नामध्ये नसल्या तरी प्रतिष्ठा, कुटुंबियांच्या आणि इतर नातेवाईकांच्या अपेक्षाचं ओझं याचा ताण असतानाही गौरीच्या निर्णयाचा आदर करत तिच्यावर कोणतीही गोष्ट न लादता तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे वडील खूप आदर्श वाटतात.

आजही स्त्री भ्रूण हत्या होणाऱ्या आपल्या समाजामध्ये ‘मुलीचं लग्न म्हणजे पालकांसाठी एक तणावाचा विषय आहे’. आजही बऱ्याच कुटुंबांमध्ये मुलीच्या अपेक्षांचा, इच्छांचा व निर्णयाचा विचार न करता मुलीचे लग्न उरकले म्हणजे एक जबाबदारी (कटकट?) गेली म्हणून बरेचसे पालक हुश्श करताना दिसतात. बऱ्याचदा मनासारखा जीवनसाथी नसतानाही तिच्यावर ‘लग्न’ लादले जाते. लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या मुला-मुलींना काय वाटते यापेक्षा ‘लोग क्या कहेंगे’ या आजाराला बळी पडून मुला-मुलींच्या विरोधात जाऊन लग्न ठरवले जाते. परिणामी, पुढे जाऊन त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणींना तोंड द्यावे लागते. या चित्रपटामध्ये मात्र मुलांना काय वाटते याला जास्त महत्व दिल्याचे जाणवते.

‘उठा ले जाऊंगा’ , ‘तू हा कर या ना कर’ असा विचार करणारे बरेचसे ‘महाभाग’ आजही आपल्याला समाजामध्ये दिसतात. मुलीची संमती, इच्छा असो अथवा नसो, आपल्याला आवडणारी मुलगी मिळवणे म्हणजे आपण पुरुष म्हणून जन्माला आलो तेव्हाच आपल्याला मिळालेलं लायसन्स आहे आणि असं केल्याने आपण पुरुषार्थ गाजवला असंच त्यांना वाटतं.

या चित्रपटात मात्र, कुटुंबियांचं आणि समाजाचं लग्नावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालेलं असतानाही कोणीतीही गोष्ट गौरीवर न लादता, तिच्या निर्णयाचा आदर ठेऊन आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा गौतम खरंच खूप भावतो. आपलं लग्न ठरलंय, एवढा खर्च झालाय, घरचे काय म्हणतील? नातेवाईक काय म्हणतील? यांसारखे अनेक दबाव असूनही तो तिला तिच्या निर्णयाचा स्वतंत्रपणे विचार करायला वाव देतो. त्याच्यावर असणाऱ्या दबावांचं भांडवल करूनही तो तिला कदाचित लग्नासाठी तयार करू शकला असता. पण तो सातत्याने तिच्यावरचं प्रेम तिला कसलाही त्रास न देता व्यक्त करताना गौतम एक नवा आदर्श निर्माण करताना दिसतो.

या चित्रपटामधील अर्णव ( गौरीचा आधीचा बॉयफ्रेंड) या पात्राबद्दल प्रेक्षकांमध्ये सामान्यतः “सगळं व्यवस्थित होत असताना आता हा कशाला मध्ये आला ?” अशी प्रतिक्रिया तयार होते. पण अर्णवसुद्धा, ‘तीन वर्षे रिलेशनशिप होतो म्हणून तू माझ्याबरोबरच लग्न केलं पाहिजे’ अशी कोणतीही जबरदस्ती न करता तोही तिच्या निर्णयाचा आदर करतो..

प्रत्येक व्यक्तीला आपण आपले आयुष्य कसे व कोणाबरोबर व्यतीत करायचे याचा स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, मग तो मुलगा असो व मुलगी. तसेच आपले प्रेम प्रामाणिकपणे व्यक्त करण्याचाही अधिकार आहे. पण हे करताना फक्त आपल्याला वाटते म्हणून आपण इतरांवर आपल्या इच्छा लादत तर नाही ना हा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. मुलीची संमती, इच्छा असो अथवा नसो, आपल्याला आवडणारी मुलगी मिळवणे म्हणजे म्हणजे आपण पुरुषार्थ गाजवला हा गैरसमज दूर करून समोरच्या व्यक्तीच्या विचारांचा आणि मताचा आदर केला गेला पाहिजे. मुलगी किंवा मुलगा यांचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय, कारण त्यांना त्याचे आयुष्य कसे व कोणाबरोबर व्यतीत करायचे आहे हे ठरवण्याचा अधिकार आहे हा विचार रुजण्याची खरोखरीच खूप गरज आहे. यांसारखे अनेक सकारात्मक मुद्दे, विचार आणि दृष्टीकोन या चित्रपटातून समोर येतात.

 

गौरी सुनंदा कोंडीराम

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.