ना मुंह छुपा के जियो…

1,206

जान्हवी गोस्वामी गेली काही वर्षं आसाममधल्या सर्वसामान्य लोकात एड्सविषयीच्या जागृतीचं काम करतेय. एड्सच्या संदर्भात लोकांच्या मनात रुतून बसलेले गैरसमज दूर करणं, एड्सबाधित व्यक्तींना मानसिक आधार देणं, त्यांना वैद्यकीय मदत पुरवणं अशा कामांमध्ये जान्हवीचा पुढाकार आहे. ‘इंडियन नेटवर्क ऑफ पॉझिटिव्ह पीपल’च्या अध्यक्षपदावरूनही एड्सबाधित व पीडितांच्या समस्या धसास लावण्याचं काम तिने केलं आहे.

तसं पाहता, भारतात एड्ससंदर्भात काम करत असलेल्या संस्था काही कमी नाहीत. अनेक व्यक्तींनीही जाणीवपूर्वक या कामात स्वत:ला झोकून दिलंय. जान्हवी गोस्वामीही त्यांच्यासारखीच एक; फक्त थोडीशी निराळी. जान्हवी स्वत: एड्सग्रस्त. अर्थात तिने ही गोष्ट कोणापासूनही लपवून ठेवलेली नाही, हेच तिचं वेगळेपण आहे. सामान्यत: एड्स झालेल्या व्यक्ती स्वत:ची ओळख लपवण्याचा अटोकाट प्रयत्न करतात. आपल्याला एड्स झालाय हे कोणालाही समजू नये यासाठी जिवाच्या आकांताने धडपडतात. सर्वार्थाने कोेजून जातात. आप्त, स्वकीय, समाज आपल्याला वाळीत टाकेल ही भीतीच त्यांना मुळातून खचवून टाकते. अर्थात एड्सचं निदान झालं तेव्हा जान्हवीलाही या वास्तवाची कल्पना नव्हती असं नाही. तरीही आपल्याला एड्स झाल्याचं तिने कोणापासूनही लपवून ठेवलं नाही. याचं महत्त्वाचं आणि प्रामाणिक कारण एकच. एड्स झाल्यावर आपल्याला खूप काही सहन करावं लागलं; ते किमान इतरांना सहन करावं लागू नये, असं जान्हवीला तीव्रतेने वाटत होतं. ती पोटतिडकीने म्हणते, ‘‘ईशान्य भारतात जवळपास लाखभराहून अधिक व्यक्ती एचआयव्ही बाधित आहेत. त्यात महिलांचं प्रमाण जास्त आहे. एचआयव्ही बाधित आणि पीडित व्यक्तींविषयी समाज अजिबात संवेदनशील नाही हे निर्विवाद सत्य आहे. त्यातही एड्सग्रस्त विवाहित महिलांना सासरचा आधार तर मिळत नाहीच शिवाय माहेरचेही त्यांना ‘आपलं’ म्हणत नाहीत. त्यांचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष छळ होतो. त्यांच्या चारित्र्याबद्दल सरेआम संशय घेतला जातो. हे खूप वाईट आहे. ही छुपी हिंसाच आहे.’’ एड्सग्रस्तांना मानाने जगता यावं, त्यांचा छळ होऊ नये, त्यांना योग्य ती मदत मिळावी, आधार मिळावा… जान्हवीचा लढा त्यासाठीच आहे!

स्वत: जान्हवीलाही अशाच छळाला सामोरं जावं लागलं होतं. १९९४ साली जान्हवीचं एका उद्योगपतीशी लग्न झालं. १९९६ साली तिच्या नवऱ्याचा एका ‘गूढ’ आजाराने मृत्यू झाला. तो गूढ आजार म्हणजे एड्स आहे हे तिला ठाऊकही नव्हतं. नवर्‍याच्या मृत्यूनंतर सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढलं. मुलीला तिच्या ताब्यात दिलं नाही. कोर्टकचेर्‍या झाल्यावर शेवटी मुलीचा ताबा मिळाला. पण काही महिन्यांतच मुलीचाही मृत्यू झाला. तिलाही एड्सची लागण झालेली होती. आपल्यालाही एड्स झालाय हे जान्हवीला तेव्हा समजलं. आधी नवरा, मग मुलगी हातची गेल्यावर खरंतर ती खचूनच गेली होती. पण आपण जे सहन केलं ते इतरांना सहन करावं लागू नये यासाठी तिने एड्सविरोधी जनजागरण मोहीम सुरू केली. गुवाहाटी हे तिने आपल्या कामाचं केंद्र मानलं. स्वयंस्फूर्तीने काम सुरू केलं खरं पण पुढचा रस्ता सोपा नव्हता. एड्स झाल्याचं आधीच जाहीर केल्याने तिला राहण्यासाठी कोणी भाड्याने घर द्यायलाही तयार होईना. मग देवळात, आश्रमात, बागेत आसरा घेत तिने काम सुरू ठेवलं. वृत्तपत्रात तिची कहाणी प्रसिद्ध झाल्यावर आसामच्या तत्कालीन सरकारने तिला गुवाहाटीत एक फ्लॅट दिला. मग तिने अधिक जोमाने एड्स जनजागृतीचं काम सुरू केलं. ‘आसाम नेटवर्क ऑफ पॉझिटिव्ह पीपल’ ही जान्हवीची संस्था. शंभराहून अधिक एडस्बाधित व पीडित महिला कार्यकर्त्या या संस्थेसाठी आसाम राज्यात एड्सविषयक जनजागृतीचं काम करत आहेत.

‘‘या ना त्या कारणाने पुरुषाला एड्स झाला तर त्याच्या चारित्र्याची चर्चा होत नाही. पण एड्सग्रस्त महिलेचं चारित्र्यहनन करायला कुणी मागेपुढे पाहत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनजागृतीचं का करायला हवंय ते यासाठीच!’’ असं म्हणत जान्हवी पॉझिटिव्ह पावलं टाकत पुढे निघालीय. ‘ना मुंह छुपाके जियो और ना सर झुकाके जियो, गमों का दौर भी आये तो मुस्करा के जियो’ हे तत्त्वज्ञान ती प्रत्यक्षात जगतेय!

image courtesy – http://www.ctvnews.ca

Comments are closed.