ग्लोबल सर्वार्थानं

987

ती म्हणाली,
आवडतो मला जाहिरातीतील पुरुष
केसांना जेल लावून आभास निर्माण करणारा
सचैल स्नान केलेल्या गोपींचा;
आवडतात मला त्याचे कामुक डोळे
देहात आरपार शिरणारे;
त्याचं फिजिक आणि सेक्स अपील
तरंगत राहतं माझ्या डोळ्यांत;
मी बंद करते पापण्या आणि पाहते पुन:पुन्हा
ग्लोबल पुरुषाचं स्वप्न
मला शिरायच नसतं त्याच्या मेंदूत,
जाणूनही नसतो घ्यायचा त्याचा बुद्धय़ांक
किंवा त्याची आवड,
त्याच्यावर कोणते संस्कार आहेत याचीही माहिती नको असते मला ;
नसतो रस त्याच्या कौटुंबिक पाश्र्वभूमीत.
मला हवा आहे केवळ पुरुष
आव्हान देत सुसाट निघालेल्या वाऱ्याबरोबर बाईकवरून.

मी बदलले आहे असं म्हणतंय जग
कुंकवासाठी धनीबिनी मागायचे दिवस आता पडलेत मागे,
तो संपला तर चुडेबिडे फोडण्याचेही
पावित्र्य आणि योनिशुचिता
लादणाऱ्या समूहाला ठोकरून
मी निघालेय शोधात माझ्याच ग्लोबल अस्तित्वाच्या.
मला बदलायचे आहेत अर्थ संस्कृतीचे
छोटय़ा छोटय़ा वावटळींना घेत अंगावर
मुरवायचं आहे एका नव्या संस्कृतीला
खोल रक्तात.

तुम्ही काय दिलंत तुमच्या कवितेतून आम्हांला?
गुळगुळीत झालेल्या रोमॅंटिक कल्पनांनी भारलेला
नरमादीचा प्रेमेतिहास
किंवा लैला-मजनू, रोमिओ-ज्यूलिएट यांच्या प्रेमकहाण्यांचा
कंटाळवाणा पाऊस.
चिरंतर वेदना इज इक्वल टू प्रेम
हे तुमचं गणित
लादलं आहे आमच्यावर
प्लीज गिव्ह अस अ ब्रेक.
या साऱ्यातून हवा आहे ब्रेक,
एकमेकांना बांधून ठेवण्यातून ब्रेक,
एखाद्या पुरुषाची जर केलीच अभिलाषा तर
उंडारलेली रांड म्हणण्यापासून ब्रेक,
एका वडाला सात जन्म बांधून घेण्यापासून ब्रेक;
प्रेमाच्या अद्वैतापासून ब्रेक,
त्यातून मिळणाऱ्या वेदनेपासून ब्रेक
आणि तो नाहीच भावला तर त्याच्यापासूनही ब्रेक

मी काटला आहे आता दोर
परंपरेच्या पतंगाचा
माझ्याकडच्या धारदार मांजानं
दिशाहीन उडतोय तो केव्हापासून,
त्याला पकडायचा की सोडून द्यायचा ते ठरवा तुम्ही,
मला मात्र उडू देत आता माझ्या पंखातल्या बळावर

ती म्हणाली,
होऊ देत आता मला ग्लोबल सर्वार्थाने

नीरजा

Image Courtesy: http://psdfinder.co/page/20?list5=1122

Comments are closed.