लहानपणी आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात आणि प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. जसे की, ‘ढग आकाशात कशावर टांगलेले असतात?’ किंवा ‘रात्रीला पळापळी खेळतांना चंद्र बरोबर माझ्या सोबत कसा काय धावतो?’ इत्यादी इत्यादी.. असे प्रश्न आपण घरात, गावात किंवा शाळेत आपल्या जवळच्या माणसांना, शिक्षकांना सहज विचारू शकतो. अशा प्रश्नांना काल्पनिक कथांमधून किंवा शाळेतल्या पुस्तकातून असो, त्या वयाला पटणारी उत्तरं तरी मिळतात. परंतू अशा प्रश्नांसोबत अजुनही काही प्रश्न आपल्याला पडत असतात आणि तेही तितकंच साहजिक आहे. कोणते असतात हे निराळे प्रश्न?
मी पाचवीत असतांना माझा एक मित्र होता. तो नववीत होता, म्हणजे माझ्यापेक्षा मोठा. एकदा आम्ही दोघं शेतात जात होतो. वाटेवरील शेतांमध्ये जनावरे चरत होती. त्याच वेळी कळपातील एक वळू एका गाईच्या अंगावर चढला होता हे आम्हाला दिसलं. आता गावात हे असले प्रकार पहायला मिळणं सहज असतं. त्यात विषेश असं काही वाटत नाही. जसं की शहरातील लोकांना अॅनिमल प्लॅनेटवर असं काही पाहिल्यावर वाटतं. तर हे आम्ही पाहत असतांना त्या गाईला आता किती दिवसांनी वासरू होईल याबद्दल आम्ही बोललो. तो म्हणाला ‘तुला माहित आहे का, नवरा बायकोसुद्धा असे करूनच मूल जन्माला घालतात.’ हे मला पटलं नाही. मला ते खूप विचित्र वाटलं. म्हणजे माझ्या आई वडिलांनी हे असं काही करून मला जन्माला घातलं? मला त्याचा खूप राग आला. मी त्याच्याशी खुप भांडलो. पण मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याने मला खूप त्रासही झाला. तेंव्हापासून मी आई-बाबांसोबत चिडून वागायला लागलो.
त्यानंतर असंच एक वेळेस गल्लीतल्या काही बाया मासिक पाळी बद्दल बोलत होत्या तेंव्हा मी आसपासच उभा होतो. मी त्यांना सहज विचारलं ‘आत्या ही पाळी काय असते?’ त्यावर त्यांनी मला तिथून हाकलून लावलं. पण प्रश्न तर तसाच राहिला. मग मी घरी जाऊन आईला विचारलं तर तिने असे प्रश्न विचारू नयेत म्हणून मला बजावलं.
आता त्या लहानपणीच्या प्रश्नांवर मलाच हसू येतं. पण त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तेंव्हा जी काही जिवाची तगमग व्हायची ती आज सुद्धा सेक्स किंवा लैंगिकतेबद्दल पडणार्या प्रश्नांबद्दल होते. आमच्या वयाच्या सगळ्याच मुलांमध्ये सेक्स, लैंगिकतेबाबत प्रश्न किंवा गैरसमज खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातला एक मोठा गैरसमज आहे मुलींच्या योनिपटलाबद्दल. मुलांच्या मते व्हर्जिन म्हणजे कुमारी किंवा जिचे आत्तापर्यंत कुणाशी लैंगिक संबंध आले नाही मुलीच्या योनीच्या आतील भागात एक पडदा असतो. पहिल्यांदा सेक्स करताना तो फाटतो आणि मग रक्त बाहेर येतं. जर का रक्त नाही आलं आणि सेक्स दरम्यान मुलीला खूप त्रास/वेदना नाही झाल्या तर समजायचं की ती व्हर्जिन नाही. आता या सगळ्या प्रकारामुळे ग्रामीण भागात नविन लग्न झालेल्या मुलाला त्याच्या मित्रांकडून हा प्रश्न विचारला जातोच! आणि प्रत्येक सांगणारा त्या बद्दल अस काही वर्णन करतो की, ‘खूप रक्त आलं, मी तर घाबरलोच इ.’ किंवा मग बायकोला किती त्रास झाला या सर्व गोष्टी तो अशा प्रकारे सांगतो की मग प्रश्न निर्माण होतो या नवरा -बायको मध्ये नक्कीच सेक्स झाला की त्या मुलीवर रेप?.
या सारखे अनेक गैरसमज माझ्या वयाच्या मुलांमध्ये आढळून येतात. जसे की
1) बायको किंवा प्रेयसी दुसर्या कुणाच्या प्रेमात पडू नये म्हणून रोज सेक्स देत राहिले पाहिजे.
2) पॉर्न व्हिडिओज् मधल्या स्त्रीला जशा आणि जितक्या वेदना होतात तशा आणि तितक्याच वेदना आपल्या बायकोला/प्रेयसीला व्हायला हव्यात अशा प्रकारे सेक्स करावा.
3) लग्नानंतर स्त्री जाड होते कारण पुरूषाच्या विर्याद्वारे पुरूषाची शक्ती स्त्री मध्ये ट्रान्सफर होते.
4) प्रेयसीचे स्तन जर कडक असतील तर सेक्स दरम्यान ते जोरात दाबून नरम करायचेत. भलेही ती रडली तरी चालेल…
आणि सर्वात वाईट गैरसमज म्हणजे
5) प्रेयसी अथवा स्त्रीला नेहमीच सेक्स पाहिजे असतो, ती नाही म्हणत असली तरी तीची मनातुन इच्छा असतेच.
अशा अनेक सेक्स आणि लैंगिकतेबाबतचे गैरसमज मुलांच्या मनात आहेत. या सगळ्यामध्ये मुलग्यांनी काय केलं पाहिजे हेच डोक्यात असते. पण हे सगळं करताना ज्या व्यक्तिसोबत करायचा विचार करतो, त्या व्यक्तिला निदान विचारावं, तिची संमती घ्यायची असते हे आम्हा पुरुषांच्या डोक्यात कधी येतच नाही. अन असे हे गैरसमज दूरच होत नाहीत आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न अजूनही सुटत नाहीत. शहरातील मुला-मुलींना लैंगिक शिक्षण मिळण्यासाठी एखाद दुसरे तरी मध्यम उपलब्ध असते. क्वचित शाळा, कॉलेज मध्ये लैंगिकते बाबत माहिती होते. मात्र गावातील शाळा व महाविद्यालयांबाबत बोलायलाच नको. “मर्जीने होणारा सेक्स व पुरूषी वर्चस्वातून होणारा रेप” या मधला फरक मुलांच्या लक्षात आणून देणे ही खरं तर आता आमची महत्वाची अशी प्राथमिक गरज आहे.
वरील गैरसमजांविषयी सत्यता मांडणा-या आपल्या वेबसाईटवरील काही लिंक सोबत देत आहोत.
छान नितीन…..आजच्या उंचभ्रू समाजास ह्या गोष्टी माहिती असण्याची खूप गरज आहे.
सुंदर लेख. खरोखर आजदेखील कोणीही या विषयावर उघडपणे बोलत नाही.अभ्यासक्रमात विषय असला तरी जाणीवपूर्वक शिकवला जात नाही. व म्हणून तरुण पॉर्न साईट,भोंदू वैदू, बाजू पुस्तके यांचा आधार घेतात.
विशेष आवडले ते नाव लिहिण्याची पद्धत???