पार्च्ड : नग्न देहापलीकडचं नग्न सत्य_नम्रता भिंगार्डे

2,702

चित्रपट अत्यंत खुलेपणानं आपल्यासमोर उलगडत जातो. आजवर बॉलीवूडमध्ये ‘ओपन’ असणं म्हणजे सिनेमात अभिनेत्री कम हिरॉईन कम आयटम गर्लने कमी कपड्यांत दिसणं किंवा अंथरूणावरचे बोल्ड सीन्स देणं हेच मानलं गेलंय…पण ‘पार्च्ड’मधला खुलेपणा पाहताना खाली कसंतरी होत नाही तर मनाच्या खोल गाभाऱ्यात त्यातलं नागडं सत्य सलत राहतं…

स्त्री… अंगापिंडानं भरलेली…. तिचे स्तन, तिचे कुल्हे, तिची कंबर, तिची योनी, कमनिय बांधा…यांच्या पलिकडलं स्त्री मन मांडण्याचा प्रयत्न ‘पार्च्ड’ या नुकत्याच रिलिज झालेल्या सिनेमात करण्यात आलाय.

‘पार्च्ड’ या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक ‘सुकलेलं गवताचं शेत’ आणि दोन ‘तहान’…. हे दोन्ही अर्थ तंतोतंत भारतीय स्त्रियांच्या मनाचं प्रतिनिधीत्व करतात.

राजस्थानातल्या छोट्याशा गावातल्या तीन मैत्रिणी… ‘विधवा’ रानी, ‘बांज’ लाज्जो आणि ‘रांड’ बिजली! विधवा झाल्यानंतर १५ वर्षे पुरूषाचा स्पर्श न झालेली रानी, लग्न होऊनही बाळासाठी आसूसलेली आणि वांझपणाचा ठपका हसण्यावारी नेणारी लाज्जो आणि आर्थिक सबळ असलेली आणि परूषांना नाचवणारी तरीही सेक्सपलिकडल्या प्रेमाची भुकेली असलेली बिजली…या सुकलेल्या, तहानलेल्या तिघी मैत्रिणी एकत्र आल्या की स्वतःच्या सुखाची स्वप्न रंगवतात. कोणत्याही सामान्य स्त्रीप्रमाणेच त्यांच्याही सुखाच्या कल्पना पुरूषाशिवाय पूर्ण होत नाहीत.

चित्रपट अत्यंत खुलेपणानं आपल्यासमोर उलगडत जातो. आजवर बॉलीवूडमध्ये ‘ओपन’ असणं म्हणजे सिनेमात अभिनेत्री कम हिरॉईन कम आयटम गर्लने कमी कपड्यांत दिसणं किंवा अंथरूणावरचे बोल्ड सीन्स देणं हेच मानलं गेलंय…पण ‘पार्च्ड’मधला खुलेपणा पाहताना खाली कसंतरी होत नाही तर मनाच्या खोल गाभाऱ्यात त्यातलं नागडं सत्य सलत राहतं…

विधवा रानीचा १६-१७ वर्षांचा लग्नोत्सुक मुलगा गुलाब आणि त्याचे मित्र जेव्हा त्याच्यासाठी बघितल्या गेलेल्या जानकी या कोवळ्या मुलीच्या स्तनांबद्दल बोलतात तेव्हा त्यांचे जोक्स टोचतात. गुलाब आणि जानकी यांच्या पहिल्या रात्रीच्या आवाजाने अस्वस्थ झालेली रानी धावत पळत बिजलीच्या तंबूत जाते. नुकतंच गिऱ्हाईक उरकलेली बिजली रानीच्या तापलेल्या शरीराला स्वतःच्या शरीराचा स्पर्श देऊन शांत करते. गुलाब ‘पती’च्या धर्माला जागून जानकीवर जबरदस्ती करतो तेव्हा सुनेच्या नकाराचा अधिकार लक्षात घेऊन रानी गुलाबला एकाच वाक्यात गप्प  करते…

मर्द बनने से पहले इन्सान बनना सिख‘. 

लाज्जोची कहाणी प्रत्येक बांज बाईची आहे. लग्नानंतर कित्येक वर्ष कूस उजत नाही म्हणून टोमणे मारणारा समाज आणि वंशाला दिवा नाही याचं खापर तिच्या एकटीच्या माथी मारून सतत मारझोड करणारा नवरा. मर्द भी तो बांज हो सकते है, तू बोल मनोज को टेस्ट कराने. बिजलीने टाकलेल्या या ठिणकीची धग लाज्जोच्या बाबतीत वाढत जाते. नवऱ्याला विचारल्यावर चुलीशेजारी बेदम मार खाल्ल्यानंतर लाज्जो जेव्हा रानीकडे येते तेव्हा चेहऱ्यापासून स्तनांपर्यंत त्याने केलेल्या जखमांवर औषध लावताना रानीचा अधाशी हात कोमल होत जातो. लाज्जो आणि रानीच्या शरीरांची जवळीक इथेही होते. समाजात मानाने राहण्यासाठी समाजाने नाकारलेल्या संबंधाचा निर्णय लाज्जो घेते, ती केवळ मुल होण्याच्या इच्छेपोटीच. समाजापासून दूर एका शेकोटीच्या उबेला बसलेला तो साधू लाज्जोला तिचं शरीर किती सुंदर आहे याची जाणीव करून देतो. शेकोटीच्या आगीबरोबर दोघांचं शरीर एकमेकांत विरघळतं. तो साधू तिला सेक्सचा परमोच्च क्षण गाठण्याची अनुभूती देतो. तिला हे जाणवून देतो की तुझं शरीर फक्त पुरूषाच्या समोर तंडग्या पसरण्यासाठी नाही, की त्याच्या वीर्याच्या थेंबाला पोटात वाढवण्यासाठी नाही…तुझ्या शरीरालाही प्रेम, माया, स्पर्श, सेक्स यांचा अनुभव घेता येऊ शकतो.

बिजली नावाप्रमाणेच वीज आहे. बोलण्यात, वागण्यात, विचारांत ती स्वतःला पुरूषापेक्षा श्रेष्ठच समजते. ती एकमेव अशी स्त्री आहे जिला पुरूषांना नाचवता येतं. आज तक किसी मर्द ने बिजली को गर्दन के उपर नही देखा… हे एकमेव सत्य ती कळत्या वयापासून अनुभवत होती. पण बिजलीही शेवटी स्त्री होती. सेक्सपलिकडे तिच्यावर प्रेम करणाऱ्या पुरूषाची आस होती.

बिजलीशी असलेली मैत्री हीच रानी आणि लाज्जो यांच्या आयुष्यातली पर्सनल, स्वतःची स्पेस होती. डोक्यावरचा पदर काढून बिजलीच्या गाडीवर बसून वाऱ्याला केसांमध्ये खेळवणं, गावाबाहेच्या किल्ल्यावर मुक्त धावत फिरणं हा या तिघींच्या आयुष्यातला ठेवा आहे. तीन मैत्रिणींमधल्या संवादाचा हा चित्रपट आहे. चित्रपटातल्या गावातल्या महिलांची स्थिती ही कोणत्याही सर्वसामान्य महिलेपेक्षा वेगळी नाहीच. गावातली महिला सरपंच गावात टिव्ही यावा म्हणून पुरूष पंचायतीची परवानगी घेते त्याच गावात स्वतःच्या सुनेला  तिच्या प्रियकराबरोबर पाठवणारी रानीही आहे.

‘विधवा’, ‘बांज’, ‘रांड’… समाजाने ठेवलेल्या या नावांना मागे टाकून ‘स्त्री’ म्हणून शेवटी एका ‘चौराहे पर’ थांबतात आणि ठरवतात…

”इसके आगे ना लेफ्ट जाऐंगे ना राईट जाऐंगे वही जाऐंगे जहा मारा दिल करे…”

कोणतीही लेक्चरबाजी न करता व्हिज्युअल माध्यमातल्या ताकदीचा पुरेपूर वापर करत बोलणारा हा सिनेमा विचार करायला भाग पाडतो. स्त्रीच्या लैंगिकतेवर इतक्या वेगवेगळ्या पातळीवर भाष्य करणारा सिनेमा क्वचितच तयार होतो. तनिष्ठा चॅटर्जी (रानी), राधिका आपटे (लाज्जो) आणि सुरवीन चावला (बिजली) यांनी त्या भाष्याला तितक्याच ताकदीनं मुर्त स्वरुप दिलंय. गुंतागुंतीच्या ‘स्त्री’मनाचा एकेक धागा अलगद खेचत दिग्दर्शिका लीना यादव यांनी तिला नग्न केलंय… पुन्हा एकदा तिला शरीरापलिकडे पाहण्यासाठीच !!!

लेख साभार : ‘सुंबरान, जागर तरुणाईचा’ या ऑंनलाईन मासिकातीमधील नम्रता भिंगार्डे लिखित लेख. मुळ लेखासाठी खालील लिंकवरक्लिक करा.

http://sumbaran.com/article

चित्र साभार: पार्च्ड

 

Comments are closed.