पिंकच्या निमित्ताने …

1,217

सध्या सुरु असलेल्या छेडछाड प्रतिबंध, बलात्कारांच्या घटना, मॉरल पोलिसिंग आणि  महिला सक्षमीकरण यावरील चर्चांच्या पार्श्वभूमीवर शुजित सरकार निर्मित ‘पिंक’ हा चित्रपट आला. याआधीही ‘फुल बने अंगारे (१९९१)’ ‘दामिनी (१९९३)’ या चित्रपटांमध्ये देखील बालात्काराविषयी चर्चा झाली. मात्र पिंक चित्रपटामध्ये स्त्रीचा निवडीचा अधिकार, संमतीचा अर्थ, पितृसत्ताक व्यवस्थेतून आलेली पुरुषांची मुलींविषयीची हीन दर्जाची मानसिकता यावर विचार विमर्श केला आहे.

पिंक म्हणजे दिल्लीमध्ये राहणाऱ्या मिनल अरोरा, फलक अली, अँड्रीया या तीन सर्वसामान्य मुलींची कथा. मिनलसोबत जबरदस्ती करणाऱ्या मुलाला ती बॉटल मारते आणि तो जखमी होतो. त्या तिघीही या घटनेमुळे घाबरून जातात. त्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करत नाहीत कारण त्यांना पोलीस, कोर्ट या भानगडीत पडायचे नसते. पण त्या मुलांचे काय? त्यांना एखाद्या मुलीने आपल्याला जखमी करणे हे  अपमानास्पद वाटते. त्यांचा ‘इगो’ दुखावला जातो. मिनल, फलक आणि अँड्रीया या तिघी जेव्हा समेट घडवण्यासाठी फोन करतात तेव्हा ‘या मुली हतबल, आगतिक आणि घाबरलेल्या आहेत आणि त्यामुळे आपली माफी मागत आहेत’ असा समज मुलांच्या मनात पक्का असतो. ‘मिनलने माफी मागितली तरच त्यांचा राग शांत होईल आणि जर ती माफी मागत नसेल तर ते बदला घेतील’ असं ते सांगतात. या मुलांच्या विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर ते या तिन्ही मुलींना वेगवेगळ्या प्रकार त्रास देतात. सत्तेचा वापर करून मिनलवर ‘खुनाचा प्रयत्न’ हा गुन्हा दाखल करतात. यांसारख्या घटनांमधून समाजात आढळणारे ‘मर्दानगी’चे प्रतिनिधित्व या चित्रपटामध्येदेखील अनेकदा दिसून येते.

पिंक चित्रपट हा मर्दानगीच्या खोट्या कल्पना आणि पुरुषी मानसिकता याविषयी बोलतो. स्त्रीवर अत्याचार करणारा पुरुष जर श्रीमंत, सत्ताधारी कुटुंबातील असेल तर त्या स्त्रीची लढाई आणखीनच कठीण होऊन बसते, हे वास्तव आपल्याला या चित्रपटातदेखील पहायला मिळते. “आपण आपल्या मुलग्यांना वाचवले पाहिजे” (we should save our boys) हे पिंक सिनेमातील दीपक सहगल (अमिताभ बच्चन) चे वाक्य ‘प्रत्येकवेळी बलात्कार किंवा स्त्रियांवरील अत्याचारासाठी स्त्रीला जबाबदार धरून चालणार नाही’ याची जाणीव करून देते.

चित्रपटात पुरुषांमध्ये निर्माण होणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी चर्चिली आहे. लिंगभाव (जेंडर) हा सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीतून तयार होतो. सिमॉन दे बुव्हा ही तिच्या ‘सेकण्ड सेक्स’ या पुस्तकात म्हणते, ‘स्त्री जन्माला येत नाही तर ती घडवली जाते’. आपल्या समाजात मुला-मुलींची जडणघडण ही वेगवेगळ्याप्रकारे होत असते आणि यामागे पितृसत्ताक व्यवस्थेतून तयार झालेली मानसिकता कारणीभूत असते. मुलगा म्हणजे बलवान, कधीही न रडणारा, संरक्षकाची भुमिका घेणारा, प्रजोत्पादनाला सक्षम असणारा, घरातील कर्ता पुरुष तर मुलगी म्हणजे भावनिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर, तर्क आणि विवेक नसणारी या चौकटीमध्येच मुला-मुलींची जडणघडण केली जाते. यातूनच पुरुषांमध्ये आपण कोणीतरी श्रेष्ठ अशी भावना तयार होते.

चित्रपटात दिलेली झिरो एफ. आय. आर.  विषयीची माहितीदेखील महत्वाची आहे. कायद्यानुसार  झिरो एफ. आय. आर. म्हणजे पीडित व्यक्ती कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू शकते. निवासस्थान किंवा ज्या ठिकाणी गुन्हा घडला आहे तिथेच तक्रार करावी असे काही नाही. पोलीस स्टेशन घटनास्थळापासून दूर असेल किंवा घटनास्थळाच्या कार्यकक्षेत येत नसेल तरीही त्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवता येते, याला झिरो एफ. आय. आर असे म्हणतात. मात्र या चित्रपटात घटनास्थळ कार्यकक्षेत येत नसल्याने तक्रार नोंदवून घेतली जात नाही.

या चित्रपटामध्ये दिपक सहगल (अमिताभ बच्चन) समाजाने मुलींसाठी ठरवून दिलेली ‘मुलींची सुरक्षा नियमावली’ (Girls Safty Manual/Rulebook) याविषयी उपहासाने बोलतो. मुलींनी मुलांसोबत एकटीने फिरू नये, हसून बोलू नये, स्पर्श तर अजिबातच करू नये नाहीतर ती हिंट समजली जाईल, मुलींनी रात्री उशिरा घराबाहेर पडू नये,  मुलींनी तोकडे कपडे घातले किंवा जर ती पुरुषासोबत ड्रिंक करत असेल तर त्या स्त्रीला समाजात चारित्र्यहीन ठरवले जाते. यांसारखे चित्रपटात उल्लेख केलेले स्त्रियांसाठीचे नियम हे समाजातील पुरुषप्रधान व्यवस्था, लिंगभावावर आधारित जडणघडण आणि विषमता आपल्या समोर आणतात. छेडछाडीचा संबंध नेहमीच तोकड्या कपड्यांशी लावला जातो. याविषयी कमला भसीन एके ठिकाणी म्हणतात, ‘मुद्दा कपड्यांचा नाही तर समाजामध्ये मुलींना कमजोर, आगतिक आणि उपभोगाचे साधन मानले जाते आणि म्हणून मुलींची छेडछाड केली जाते.

स्त्रीचे एकापेक्षा जास्त जोडीदार असणं, तिचा पुरुषांसोबत मैत्रीचा व्यवहार,  दारू पिणं, सिगारेट ओढणं, एकटं राहणं, यांसारख्या गोष्टींचा तिच्या चारित्र्याशी संबंध लावला जातो. नेहमी तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. यातूनच ‘चांगली स्त्री’ आणि ‘वाईट स्त्री’  अशी लेबलं तिला लावली जातात. एखाद्या मुलीसोबत बलात्कार किंवा छेडछाड होते तेव्हा लोकांकडून ‘असल्या मुलींसोबत हे असंच होतं’ असं समाजाकडून ऐकावं लागतं. स्त्रीचे एकापेक्षा अधिक जोडीदारांसोबत लैंगिक संबंध आले याचा अर्थ ती सेक्ससाठी सहज उपलब्ध आहे, असा होत नाही. त्यामुळे मुलगी जर ‘नाही’ म्हणत असेल तर थांबले पाहिजे. मग ती सेक्स वर्कर असो, स्वतःची पत्नी असो किंवा आणखी कोणी. मथुरा या आदिवासी मुलीवर पोलिसांनी केलेल्या बालात्काराच्या घटनेनंतरही १९७५ नंतरही संमतीपेक्षा ‘शरणागती आणि अगतिकता’ (Passive submission and vulnerability) याविषयी चर्चा झाली होती. अनेक स्त्रीवाद्यांनीदेखील संमती, निवडीचा अधिकार, नकाराचा अधिकार या विषयावर काम आणि लिखाण केले आहे. जर स्त्री ‘नाही’ म्हणत असेल तर तिच्या इच्छेविरुद्ध तिला स्पर्श करण्याचा कोणत्याही पुरुषाला अधिकार नाही. मात्र ‘नाही म्हणजे नाही’  हे समजण्याइतका समजूतदारपणा पुरुषांमध्ये दिसत नाही.

या चित्रपटामधील अँड्रीया सांगते, ‘नॉर्थ इस्ट मधील मुलगी म्हणून मला तुलनेनं जास्त प्रमाणात छेडछाडीला सामोरे जावे लागते.’ काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये नॉर्थ इस्ट मधील विद्यार्थ्यावर हल्ले झाल्याची घटना घडली होती तसेच नॉर्थ इस्ट मधील मुलींना त्यांच्या वेगळ्या दिसण्यामुळे ‘चिंकी’ असे चिडवले जाते. नॉर्थ इस्ट मधील मुलींना समोरं जावं लागणाऱ्या भेदभावाचा आणि छेडछाडीचा उल्लेख या चित्रपटामध्ये झाला आहे.

‘पिंक’मध्ये अनेक स्त्रीवादी मुद्दे आले आहेत मात्र यात काही मर्यादा आढळतात. यामध्ये स्त्रीप्रश्न हा एका विशिष्ट जातीतील आणि वर्गातील स्त्रीप्रश्न म्हणून दाखवला आहे. मात्र विविध वर्ग, जाती आणि ओळखी (identity) मधील गुंतागुंत याविषयीचे भाष्य दिसत नाही. ‘पिंक’ मध्ये संमतीचा मुद्दा पुरुषाच्या तोंडून मांडला आहे, स्त्रीला मात्र अत्याचारांना बळी पडलेलीच दाखवले आहे.  जर पुरुषांकडे स्त्रीवादी जाणीवा असतील, तर पुरुषही स्त्रीवादी असू शकतात. मात्र तशी फार कमी उदाहरणे असलेली आढळून येतात. कमला भसीन त्यांच्या ‘लाफिंग मॅटर्स’ या पुस्तकामध्ये लिहितात, “स्त्रीवादी पुरुष हे एखाद्या  हवेत उडणाऱ्या अज्ञात वस्तूसारखे असतात. ते अस्तित्वात असतात पण त्यांना कोणीही पाहू शकत नाही.” (feminist men are like a UFO, people say they exist but no one can see them).

स्त्रिया हा ‘एकजिनसी, एकसंध गट’ नाही किंवा स्त्री म्हणजे ‘वैश्विक गट’ असंही नाही. प्रत्येक स्त्री ही सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि भौगोलिकदृष्ट्या भिन्न असते हे समजून घेणे महत्वाचे आहे. हा विचार ‘पिंक’मध्ये केल्याचे दिसत नाही. त्यामुळे ‘पिंक’ हा नवउदारमतवादी पुरुषसत्ताक चित्रपट आहे. नवउदारमतवादी अर्थव्यवस्थेमध्ये ‘भांडवलशाही निवड’ ही आधीच सामाजिकदृष्ट्या ठरवली जाते, हा मुद्दा दुर्लक्षित असतो. समाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विशेषाधिकार असणाऱ्या लोकांनाच आपल्याला काय पाहिजे किंवा आपला च्वाईस ठरवण्याची संधी मिळते. डॉ. शर्मिला रेगे म्हणतात, ‘स्त्रीवादी बनण्यासाठी जातीविषयीचा अभ्यास महत्वाचा असतो.’ हा विचार या चित्रपटामध्ये केलेला दिसत नाही. म्हणूनच ‘पिंक’ला स्त्रीवादी चित्रपट म्हणता येणार नाही.

लेखन- दिपाली क्षीरसागर, मधुरा राऊत

(MA 2nd year students)

(KSP women studies centre, SPPU)

2 Comments
  1. तुषार वाजे says

    खूप छान मांडलंय दिपाली अन मधुरा तुम्ही. ‘पिंक’ चित्रपटाचा आतापर्यंत वाचलेल्या समीक्षांपैकी चांगली अशी समीक्षा वाचनात आली. शुभेच्छा !

  2. I सोच says

    धन्यवाद तुषार… वेबसाईट नियमित वाचा. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना आमच्यासाठी महत्वाच्या आहेत…

Comments are closed.