पोर्नोग्राफीची काळी बाजू

8,415

गेल डाइन्स ही पोर्नोग्राफीला विरोध करणारी एक स्त्रीवादी कार्यकर्ती आहे. ती बोस्टन येथील व्हीलॉक कॉलेजमध्ये स्त्री अभ्यास आणि समाजशास्त्र शिकवते. पोर्नलॅण्ड – हाउ पोर्न हॅज हायजॅक्ड अवर सेक्शुअॅलिटी या तिच्या पुस्तकामध्ये तिने पोर्न संस्कृतीमुळे स्त्री पुरुषांची आयुष्यं, नाती आणि लैंगिकतेच्या कल्पना कशा बदलत चालल्या आहेत याचा मागोवा घेतला आहे. विन्सेंट इमॅन्युएल यांनी घेतलेल्या तिच्या एका मुलाखतीतील काही अंश…

प्र. पोर्न व्यवसायाची व्याप्ती नक्की किती आहे?
उ. आजघडीला दर वर्षी साधारणपणे 97 अब्ज डॉलर इतकी उलाढाल असणारा हा व्यवसाय आहे. नक्की आकडा सांगणं अवघड आहे. इंटरनेटने या व्यवसायामध्ये प्रचंड उलथापालथ केली आहे. इंटरनेटमुळे पोर्नोग्राफी सगळ्यांच्या आवाक्यात आली, स्वस्त झाली आणि पडद्याआड झाली. या तीन गोष्टी मागणी वाढण्यासाठी जबाबदार ठरल्या आहेत. त्यामुळे पूर्वी जी सॉफ्ट पोर्न इंडस्ट्री होती ती आता हार्ड कोअर पोर्नकडे वळली आहे. इतक्या कमी वयात मुलं पोर्नकडे वळली आहेत की कधी ना कधी त्यांना आता या गोष्टींचाही कंटाळा येईल.

प्र. अमेरिकेत आणि इतर देशांमध्ये ही समस्या कशी हाताळली जात आहे?
उ. जगभरात विविध देशात मी जाते, भाषणं देते. तिथल्या तरुण मुलांचे नातेसंबंध, स्वतःबद्दलच्या प्रतिमा काही प्रमाणात बदलायला सुरुवात झाली आहे. आणि त्याला पूर्ण नाही तरी काही प्रमाणात पोर्न इंडस्ट्री जबाबदार आहे. जगभरातली ७०-८०% पोर्नोग्राफी लॉस एन्जेलिस, कॅलिफोर्नियामध्ये तयार होते. इथल्या काही भांडवलदारांनी हा व्यवसाय तयार करून आपल्या सेक्ससंबंधीच्या कल्पना जगभर पसरवल्या आहेत. एक लक्षात ठेवा, पोर्नोग्राफी म्हणजे सेक्स नाही तर सेक्सचा व्यापार आहे. आणि इतर व्यापारांप्रमाणेच या व्यापारावरही अमेरिकेचाच ताबा आहे.

प्र. आपल्या आयुष्याचंच बाजारीकरण झालं आहे. या पार्श्वभूमीवर सेक्सचाही बाजार, व्यापार झाला आहे असं तुम्हाला वाटतं का?
उ. कसंय, फॅशन उद्योग जगभरातल्या लोकांच्या फॅशनबद्दलच्या कल्पना घडवत असतो तर अन्न, पाककला उद्योग लोकांच्या चवी, आवडी निवडी ठरवतो. त्याचप्रमाणे पोर्न इंडस्ट्री जगभरातल्या लोकांच्या सेक्ससंबंधीच्या कल्पना तयार करत असते. पोर्न उद्योगाने लैंगिकतेचं वस्तूकरण केलं आणि ते आपल्यालाच विकायला सुरुवात केली. आणि यात फक्त पोर्न इंडस्ट्री नाही तर फॅशन, प्रसारमाध्यमं आणि म्युझिक इंडस्ट्री हातात हात घालून काम करतात. या सगळ्यांनी स्त्री, पुरुष, मर्दानगी आणि लैंगिकतेच्या काही साचेबद्ध प्रतिमा आपल्या माथी मारल्या आहेत. पुरुष हा वासनेचा शिकारी आहे हाच संदेश या सगळ्यांनी तयार केला आहे आणि स्त्रियाही आता त्या पद्धतीनेच विचार करायला लागल्या आहेत. शरीराबद्दलच्या, लैंगिकतेबद्दलच्या कल्पना या इंडस्ट्रीने बदलून टाकल्या आहेत.

प्र. याचा लोकांच्या विचारांवर, मेंदूवर काय परिणाम होत आहे? खासकरून मुलगे मुलींपेक्षा कमी वयात या गोष्टी पाहतात, त्यांच्यावर याचा काय परिणाम होतोय?
उ. साधारणपणे वयाच्या 11व्या वर्षी मुलगे पोर्नोग्राफी पहायला सुरुवात करतात असं आकडेवारी सांगते. आणि इंटरनेटवर जेव्हा एखादा 11-12 वर्षाचा मुलगा पोर्न असं टाइप करतो तेव्हा केवळ नग्न स्त्रियांचे फोटो येत नाहीत तर अत्यंत प्रक्षोभक चित्रं त्याच्यासमोर येतात. आणि त्यातून या मुलांना पोर्नोग्राफीचं व्यसन लागताना दिसतं. ते ज्या प्रकारचं सेक्स पाहतात किंवा ज्या प्रकारचे संबंध पाहतात त्या मानाने प्रत्यक्षात तसं काहीच होत नाही. त्यामुळे खऱ्याखुऱ्या संबंधांपेक्षा पोर्न पाहण्याकडेच या मुलांचा कल असल्याचं दिसून येत आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये आणि खास करून अमेरिकेतल्या वेगवेगळ्या भागात हेच चित्र पुढे येतंय.

प्र. हे सगळीकडे होतंय का?
उ. हो. जिथे जिथे नवउदारमतवाद आहे तिथे तिथे हे सगळं होतंय. जिथे व्यक्तीवाद बोकाळला आहे तिथे ‘स्त्रिया पोर्न फिल्म करतात, तो त्यांचा चॉइस आहे’ किंवा ‘तुम्हाला पहायचं नाही तर तुम्ही पाहू नका’ अशा पद्धतीची विधानं सर्रास केली जात आहेत. पण या व्यक्तीवादापेक्षा एक सामायिक समज तयार होणं गरजेचं आहे. लहानपणापासून पोर्नोग्राफीवर वाढलेली मुलं मोठी झाल्यावर स्त्रीकडे कोणत्या नजरेने पाहतील? हीच मुलं पुढे डॉक्टर, वकील, शिक्षक होतील तेव्हा स्त्रियांवरच्या हिंसेचा, बलात्काराचा, स्वातंत्र्याचा ही मुलं कसा विचार करतील? अनेक तरुण मुली पहिल्या डेटवर जाताना आपला बॉयफ्रेंड पोर्न फिल्म बघत असेल का या टेन्शनमध्ये असतात हा माझा अनुभव आहे.

प्र. पोर्नोग्राफीचं समर्थन करणारे असंही म्हणतात की त्यामुळे लैंगिकतेचा विषय मोकळेपणाने समोर येतो. त्यात काम करणाऱ्या स्त्रिया एका अर्थाने मुक्त आहेत. तुमचं यावर काय म्हणणं आहे?
उ. माझ्यावर नेहमी असा आरोप होतो की मी सेक्सच्या विरोधात आहे. एक लक्षात घ्या. दोन व्यक्ती त्यांच्या बिछान्यात काय करतात याच्याशी माझं काही देणं-घेणं नाही. पण पोर्न इंडस्ट्री सेक्सचं प्रोडक्ट बनवतीये आणि जगभरात लैंगिकतेचा एक साचा तयार करतीये त्याला माझा एक स्त्रीवादी म्हणून नक्कीच विरोध आहे. जसा माझा खाण्याला विरोध नाही पण फास्ट फूड उद्योगाला आहे तसाच.

आणि पोर्न इंडस्ट्रीतल्या स्त्रिया मुक्त आहेत का? लॉस एन्जेलिसमधल्या पोर्न इंडस्ट्रीत काम करणाऱ्या स्त्रिया जास्तीत जास्त तीन महिने काम करू शकतात. कारण त्यापलिकडे त्यांची शरीरं हे सगळं सहन करू शकत नाहीत. अनेक प्रकारचे लैंगिक आजार, गुदाशय बाहेर येण्यासारखे गंभीर आजार घेऊन या स्त्रिया इथनं बाहेर पडतात. त्यांना आपण मुक्त कसं म्हणणार?

प्र. तुमच्या कामाला पाठिंबा द्यायचा असेल तर काय करता येईल?
उ. आमची वेबसाइट आहे – www.stoppornculture.com तिथे आमच्या कामाची माहिती तुम्हाला मिळू शकेल. हे एकट्याने करण्याचं काम नाही. आपल्याला एक मोठी चळवळ उभारायाला लागेल. जगातल्या एका मोठ्या भांडवली उद्योगाशी लढणं हे एकट्याचं काम नाही. पण मी एक आवाहन करीन. खास करून पुरुषांना – पोर्नोग्राफी पाहणं बंद करा. तुमची लैंगिकता तुम्ही ठरवा. तुमचं नातं समानतेवर आणि एकमेकांसाठी असणाऱ्या आदरावर विश्वास असणारं असू द्या. आणि मुलींना किंवा स्त्रियांना मी हेच सांगीन की पितृसत्तेला बळी जाऊ नका. तुम्हाला ज्या प्रकारचं सेक्स हवंय, ज्या प्रकारचं नातं हवंय ते मोकळेपणाने सांगा. पोर्न इंडस्ट्री काय सांगतीये यापेक्षा तुम्हाला काय हवंय ते ऐका.

मूळ लेखासाठी वाचा – http://www.counterpunch.org/2012/12/07/pornography-and-gender-politics-within-neoliberalism/

P.C. : https://www.womensviewsonnews.org/2018/06/dr-gail-dines-to-talk-in-london/

 

पोर्न साईटसवरील बंदी, हा खरंच उपाय आहे का?

रिव्हेंज पोर्न – वेळीच सावध होऊ या

‘फिक्शन अ‍ॅन्ड रिअ‍ॅलिटी’- निहार सप्रे

‘डोन्ट शूट’_अच्युत बोरगावकर

FAQ – प्रश्न मनातले

2 Comments
  1. शिवानंद साठे says

    पोर्नोग्राफीची काळी बाजू ह्या लेखातील सर्व मुध्येसुध मांडणी मला पटत आहे . सदर व्यक्ती ज्याप्रमाणे मुलांवर होणारा परिणाम सांगती आहे ते सर्व मी सध्या काम करताना अनुभवतो आहे.

    1. I सोच says

      आपले मत नोंदवल्याबद्दल धन्यवाद !!!

Comments are closed.