प्रेम करावे खुल्लम खुल्ला

- मिलिंद चव्हाण

1,666

प्रेम करावे खुल्लम खुल्ला,

मोडण्या धर्म-जातीचा किल्ला…

मुला-मुलींनी एकत्र येण्याच्या वाढलेल्या संधी आणि आधुनिक संपर्क साधने, यामुळे तरुण मुलामुलींनी संपर्कात येण्याचे, प्रेमात पडायचे आणि नंतर लग्न करण्याचे प्रमाण वाढत आहे आणि ते वाढत जाणार हे उघड आहे. जाति-धर्माच्या सीमा ओलांडून प्रेमात पडलेल्यांमध्ये अनेकदा अपराधीपणाची भावना असते. आपण काहीतरी चुकीची गोष्ट (किंवा योग्य शब्द वापरायचा झाल्यास पाप) करतो आहोत या भावनेने मुले-मुली बऱ्याचदा गांगरून गेलेली असतात. कायद्याच्या दृष्टीने ती सज्ञान असली तरी अनेकदा त्यांची किशोरावस्था संपलेली नसते. मानसतज्ज्ञांच्या मते ही अवस्था पंचविशीपर्यंतही सुरू राहू शकते. समाजाच्या दृष्टीने अशा प्रेमाला, लफडे, भानगड, झेंगट असे अनेक शब्द रूढ असल्यानेच मुला-मुलींना अपराधी वाटत असते. प्रेमीजनांना खरे तर अपराधी वाटण्याचे काहीच कारण नाही.

जगाच्या दृष्टीने प्रेम करणे हा गुन्हा किंवा काहीतरी गंभीर कृत्य आहे, कारण जाति-धर्मापलीकडे जाऊन प्रेम करणारे समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जात असतात. समाजात जातीधर्माअंतर्गत विवाह होतात आणि ते ठरवताना मुलीकडून किती हुंडा मिळणार आहे, मुलाकडच्यांची किती संपत्ती आहे, हेच मुद्दे महत्त्वाचे असतात. थोडक्यात, आयुष्याचे जोडीदार ठरवत असताना प्रेम हा निकष असण्याऐवजी प्रॉपर्टी हा महत्त्वाचा निकष ठरतो. त्यामुळे उलट शिकलेल्या मुलांवर ठरवून लग्न करण्याची वेळ का यावी? असा प्रश्न विचारणे आवश्यक आहे. तसे ते विचारल्यानेच जातीतल्या जातीत लग्न ठरवणे, थाटामाटात आणि हुंड्याची देवाणघेवाण करून लग्न करणे किती कृत्रिम आणि दिखाऊ आहे, हे लक्षात येते. हुंडा द्यावा लागतो म्हणून मुली नकोशा होतात आणि लिंगनिदान करून मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात केले जातात!

अनेक पालक मुलगी पळून गेल्यावर ती हरवल्याची तक्रार पोलिसांकडे करतात. त्या वेळी पोलीस ठाण्यात जावे लागते. (अशी तक्रार केली नसेल तरी पोलिसांकडे जाऊन लग्नाची माहिती दिली पाहिजे) पोलिसांसमोर जर मुलगी खूप रडली तर मुलाच्या दबावामुळे तिने विवाह केल्याचा चुकीचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. रडू येणे साहजिकच असले तरी पालकांच्या भावनिक दबावामुळे काही वेळा मुली पुन्हा पालकांच्या बरोबर जातात आणि मुलाविरुद्ध त्याने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल होऊ शकते. खरोखरच तशी परिस्थिती असेल तर गोष्ट वेगळी, मात्र जातीसाठी माती खाणारा समाज स्वत:ची तथाकथित इभ्रत वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाताना दिसून येतो. त्यातून कधी कधी प्रेमिकांची ताटातूट होते.त्यामुळेच लग्न झाल्यानंतर दोघांनीही – विशेषत: मुलीने – स्वत:च्या निर्णयावर ठाम राहणे आणि कोणत्याही परिस्थितीत पालकांकडे परत जाणार नाही, हे सांगणे अतिशय आवश्यक असते. त्यासाठी मुलीची तयारी करून घ्यावी लागते. परिस्थिती निवळल्यावर योग्य ती खबरदारी घेऊन पालकांकडे जाण्यास हरकत नाही.

एखादे जोडपे जेव्हा आमच्याकडे (मासूम या स्त्रीवादी संस्थेकडे) मदतीसाठी येते तेव्हा त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाते. दोघेही सज्ञान आहेत ना याची खात्री करणे हा महत्त्वाचा मुद्दा असतो. येणारी जोडपी ही बहुतेक वेळा पंचविशीची किंवा त्याच्याही आतल्या वयोगटाची असतात. मुलगा आणि बहुतेक वेळा मुलगीही कमावते असतात. मुलींना स्थळे येणे सुरू झालेले असते. शिक्षण संपून स्वत:च्या पायावर मुले उभी असली तरी ती आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे स्वावलंबी नसतात. जमीन, घर इ. मोठ्या मालमत्ता अजूनही त्यांच्या पालकांच्याच नियंत्रणात असतात आणि बहुतेक वेळा ही मुलेही त्यांच्याच नियंत्रणात असतात. हे वर्चस्व झुगारून देऊन स्वत:चा जोडीदार स्वत:निवडण्याची मानसिक तयारी होणे, हा एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि हा टप्पा पार केल्याबद्दल प्रेमिकांचे कौतुक करणेही महत्त्वाचे असते. त्यातून त्यांचा हुरूप वाढतो. लग्नानंतर कुठे राहायचे, सुरू असलेली नोकरी-व्यवसाय चालू ठेवायचा की नाही, नसल्यास पर्याय काय इ. बाबत बराचसा विचार त्यांनी केलेला असतो. तसा तो त्यांनी केलेला आहे ना, याची खात्री करणे गरजेचे असते. दोघांचे एकमेकांवर प्रेम का आहे? मुळात प्रेम आहे म्हणजे नेमके काय आहे? किती काळापासून एकमेकांना ओळखत आहेत? ओळखीचे रूपांतर प्रेमात केव्हा झाले? या प्रश्र्नांवर सविस्तर चर्चा केली जाते. लग्नाला नेमका कोणा-कोणाचा विरोध आहे, तो कशा स्वरूपात प्रकट होऊ शकतो याचा बारकाईने विचार करून त्याप्रमाणे नियोजन करावे लागते. मुलीला तिच्या पालकांनी डांबून ठेवले असेल तर तिला तिथून बाहेर काढण्यासाठी कोणती युक्ती करायची की त्यासाठी पोलिसांची मदत घ्यायची हे परिस्थितीनुरूप ठरवायचे असते. लग्नासाठी घर सोडताना स्वत: खरेदी केलेल्या वा पालकांनी भेट दिलेल्या वस्तूच घेऊन बाहेर पडावे, इतर मौल्यवान वस्तूंना मात्र हातही लावू नये, हे मुलांना मुद्दाम सांगणे आवश्यक असते. कारण आपल्या मनाविरुद्ध लग्न केल्याच्या रागाचा बदला घेण्यासाठी पालक मुलांवर (पोटच्या गोळ्यांवर!) चोरीचा आरोपही लावू शकतात! लग्न करण्याआधी वा केल्यानंतर लगेचच वकिलाकडे जावे, आम्ही स्वखुशीने लग्न करत आहोत आणि घरातून निघताना कोणत्याही मौल्यवान वस्तू बरोबर घेतलेल्या नाहीत अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र करावे व ते रितसर नोंदवून घ्यावे, असा सल्ला अॅड. प्रतिभा गवळी यांनी दिला होता. काही दिवसांपूर्वी आळंदीत आणखी एक आंतरजातीय विवाह लावण्यास गेलो असताना ब्राह्मणाने लग्न लावायला येतानाच हे प्रतिज्ञापत्र घेऊन येण्यास सांगितले होते. या साऱ्या प्रक्रियेत अंतिम निर्णय मुला-मुलीने एकत्रितपणे घ्यावेत, यासाठी त्यांना सतत प्रोत्साहन द्यावे लागते.

या साऱ्या प्रक्रियेत जातिव्यवस्थेबरोबरच पुरुषप्रधानतेला आणि वर्गीय विषमतेलाही जितके धक्के देता येतील तितके देण्यासाठी जाणीवपूर्वक पावले उचलणे महत्त्वाचे असते. काही वेळा विचाराची दिशा काय असावी याबाबत चर्चा केल्यावर विचारांच्या बाबतीत प्रेमीजन आपण विचार करू शकतो त्याच्याही पुढे गेल्याचे उदाहरण आहे. हिंदू-मुस्लिम जोडप्याच्या बाबतीत, मुलीने धर्मांतर करू नये हा विचार त्या दोघांनीही मान्य केला आणि त्यांच्या मुलांची नावे समीर आणि सारा असतील असेही ठरवले, कारण दोन्हीही धर्मांत ही नावे आहेत. या जोडप्याने असा विचार करणे ही आनंदाची बाब होती.

आंतरजातीय लग्नांबाबत बोलताना, ही लग्न टिकतीलच कशावरून? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातो. मात्र जिथे जुळवलेली अर्थातच जातीतल्या जातीत लग्न असतात तिथे हा प्रश्न आपल्याला पडत नाही. पुरुषाचा आपल्या बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन पारंपरिक असेल तर किंवा इतर कारणांवरूनही दोघांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतात. लग्न टिकवण्याची मुख्य जबाबादारी बाईचीच आहे, असे मानले जाते. मात्र ही जबाबदारी दोघांचीही असली पाहिजे. लग्न मोडण्याची कारणे जातिव्यवस्थेत नसून पुरुषप्रधानतेमध्ये आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्याही पुढे जाऊन एखादे नाते टिकवणे अगदीच अशक्य झाले असेल, तर त्यातून बाहेर पडण्यातही काही गैर नाही.

प्रेमात पडलेल्यांनी लग्नाचा टप्पा गाठायचा असेल तर खडतर वात पार करण्याची तयारी ठेवावी लागणारच आहे. इतरांनीही अशा जोडप्यांना शक्य ती सर्व मदत केली पाहिजे.

मिलिंद चव्हाण

milindc70@gmail.com

साभार:- ‘मिळून साऱ्याजणी’ (ऑक्टोबर- नोव्हेंबर २०१५) दिवाळी विशेषांकातील मिलिंद चव्हाण ‘प्रेम करावे खुल्लम खुल्ला, मोडण्या धर्म-जातीचा किल्ला’ (पान नं.  १२६ -१२९) या लेखातील काही भाग.

चित्र : http://feelgrafix.com/group/images-of-love.html

Comments are closed.