प्रेम कर, स्वत:वर !

0 1,123

इतरांवर आपण खूप प्रेम करतो,

पण स्वत:वर?

स्वत:च्या शरीरावर?

ते करतो का? नाही!

मग जरा स्वत:च्याही प्रेमात

पडून पाहिलं तर?

आज जागतिक प्रेमदिवस. गुलाबाची फुलं, चॉकलेट्स, वेगवेगळे गिफ्ट्स यांनी बाजार अगदी नटून गेलाय. हा प्रेमदिवस आता आपल्याकडेही बऱ्यापैकी रूळू लागलाय.

व्हॅलेण्टाइन्स डे ही मुळातली पाश्चिमात्य कल्पना. ती आता आपल्याही अंगवळणी पडते आहे. आणि तरुण जोडपीच कशाला नवराबायकोही आताशा या दिवशी सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करू लागली आहेत. मला वाटतं की, आपण बायका आपल्या मुला-माणसांवर, नवऱ्यावर, नातेवाइकांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवरसुद्धा किती सहज प्रेम करतो. त्यांना माया लावतो.

पण स्वत:?

स्वत:वर करतो प्रेम.

खरं सांगायचं तर स्वत:कडे मात्र दुर्लक्ष करतो. छोटी-मोठी दुखणी अंगावर काढणं, स्वत:च्या शरीराकडे, अजिबात लक्ष न देणं हे आपल्याकडे आम आहे. अपवाद असलीच तर अगदी एखाददुसरीच. त्यामुळे या आजच्या प्रेमदिवसाच्या निमित्तानं जरा विचार करू. आपण जरा स्वत:कडे, स्वत:च्या शरीराकडे बघू. स्वत:वर, स्वत:च्या शरीरावरही प्रेम करायला हवं आणि तेही एका दिवसापुरते नाही तर कायम हे जरा समजून घेऊ. समजलं तर करून पाहू.

होतं काय, स्वत:चा विचार करताना आपल्याला आपल्या शरीरातल्या त्रुटीच जास्त जाणवत असतात. मी जाडी, मी काळी, मी बुटकी आणि काय काय. पण त्यापलीकडे जरा बघू स्वत:कडे.

सांगू स्वत:ला की, माझ्या शरीरात मला आवडणारं, इतरांना आकर्षक वाटणारं काय काय आहे. ते किती छान आहे. मी ‘एकमेव’ आहे. माझ्यासारखी जगात दुसरी कोणी नाही. मी जशी दिसते तशीच सुंदर आहे ही जाणीवही खूप मस्त असते. ही जाणीव स्वत:मध्ये उमलायला हवी. रुजायलाही हवी. आणि तसंही स्वत:च्या शरीरावर प्रेम करणं म्हणजे काही पाप आणि अनैतिक नाही. ज्या शरीराच्या माध्यमातून आपण जगणं अनुभवतो त्या शरीराचे लाड करायला, त्याच्यावर प्रेम करायला, त्याचा अभिमान बाळगायला शिकायलाच हवं.

शरीरावरच्या प्रेमामध्ये आपलं शरीरसुख आणि शरीरसंबंधही आले. एक बाई म्हणून एक व्यक्ती म्हणून तो आपला अधिकारही आहे. आणि नैसर्गिक गरजसुद्धा. त्यामुळे आपल्या या नैसर्गिक उर्मीबद्दल, आनंदाच्या अनुभवाबद्दल आपण आपल्या जोडीदाराशी बोलायला हवं आणि तेही अगदी मनमोकळं. आपल्या आणि त्याच्या मागण्या, आवडी-निवडी समजावून घ्यायला हव्यात. थोडं स्वत: बदलायला हवं, थोडं आपल्या जोडीदाराला बदलायला सांगायला हवं. कारण शरीरसंबंध ही कोणी एकानं देण्याची आणि दुसऱ्यानं घेण्याची गोष्ट नाही. म्हणूनच तर त्याला ‘सम-भोग’ अर्थात ‘संभोग’ म्हणतात.

शरीरसंबंध ही गोष्ट आपण तारुण्यातल्या महत्त्वाच्या काळात तर अनुभवतोच. पण या सुदृढ पायावर, म्हणजे निकोप आणि आनंदी शरीरसंबंधाच्या पायावर आपले नातेसंबंधही आनंदाचे आणि समाधानाचे होतात. आपल्या भारतीय संस्कृतीनं याचं महत्त्व ओळखलं आणि म्हणूनच ‘काम’ हा एक पुरुषार्थ मानला.

जशा आपल्या पोटाच्या गरजा असतात, मनातल्या इच्छा असतात त्या भागवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी आपण झटतो तशीच काम सुख हीदेखील एक सहज आणि स्वाभाविक गरज आहे. या गरजेकडेही प्रत्येकीनं डोळसपणे बघायला हवं. किमान आजच्या प्रेमदिवसाच्या निमित्तानं स्वत:वर, स्वत:च्या शरीरावर अन् स्वत:च्या शरीरसुखावर प्रेम करायला हवं. हा जागतिक प्रेमदिवस असाही साजरा होऊ शकतो!

लेखन: मनीषा सबनीस

साभार: http://www.lokmat.com/storypage.php?catid=30&newsid=4690

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.