प्रिय मुलींनो_ केटलिन मोरान

1,000

मित्र-मैत्रिणींनो,

नुकतंच अमिताभ बच्चनने आपल्या नातींसाठी स्व-हस्ताक्षरात लिहिलेलं एक पत्र सर्व माध्यमांत प्रसिद्ध झालं आणि प्रचंड चर्चिलं गेलं. या पत्राला अनेक सकारात्मक आणि काही टीका करणाऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या. या चर्चेचा आढावा घेताना आणखी एक पत्र आमच्या हाती लागलं जे स्वतःच्या मुलींसाठी अथवा नातींसाठी नव्हतं तर एकूणच तरुण मुलींसाठी होतं. सर्व मुलींनी (आणि इतरांनीही) आवर्जून वाचलंच पाहिजे अशा या पत्राचा स्वैर अनुवाद आमच्या प्रिय वाचकांसाठी देत आहोत.

तुम्ही माझी स्वाक्षरी घेण्यासाठी माझ्याकडे येऊ लागता तत्क्षणी मी सांगू शकते. मी जाणते. तुमचं ते अवघडलेपण, शर्टच्या चुरगळलेल्या बाह्या, तुमच्या डोळ्यातील ते भाव – पदोपदी संघर्षाचा सामना करणाऱ्या तुम्ही मुली.

वाढत्या वजनाच्या काळजीने तुमच्यातील काहीजणी तणावाखाली दिसतात. बाकीच्या, भूक मेलेल्या. असं वाटतं की, मी पक्षाच्या एखाद्या उपाशी पिल्लाला जवळ घेत आहे – बांबूच्या काठ्यांचा जुडगाच जणू ! रेझरच्या पात्याने दुखावलेले तुमचे दंड किंवा टोचलेलं तुमचं नाक, कान किंवा जीभ मला सांगत असतं ‘माझ्या शरीरावर माझा हक्क’ असं तुम्ही कुणाला तरी ठणकावून सांगण्याचा प्रयत्न करताय.

कधी कधी तुमचे आईवडील तिथे असतात – पाठीमागे उभे, नाराज. त्यांचे चेहरे मला सांगत असतात, ‘तुम्ही तिला आवडता. तुम्ही तिच्याशी बोललात तर तिला चांगलं वाटेल. प्लीज, तिला निराश करू नका…’

कधी कधी ते नसतात तुमच्या सोबत. पण तरीही तुमच्या जवळ, वितभर अंतरावर उभे असलेले ते मला दिसतात. त्यांची तुमच्याविषयीची  उदासिनता, त्यांचं दुर्लक्ष आणि त्यांच्या नकारघंटांच्या फर्लांग भर सावलीने तुम्हाला ग्रासलेलं आहे असं वाटतं.

मुलींनो, माझ्या सुंदर मुलींनो, मी तुम्हाला काय सांगू? तुम्ही मुली ज्यांचं कदाचित हे वर्षच वाईट गेलं असेल – तुम्ही तुमच्या किशोरवयात, अकराव्या-बाराव्या वर्षात का आनंदी होता आणि तो आनंद आता या वीस-एकविसाव्या वर्षात कुठे हरवला? हे सांगणं तुमचं तुम्हालाच अवघड होऊन बसलं असेल. या एखाद दुसऱ्या मिनिटांच्या आपल्या भेटीत मी तुम्हाला काय बरं सांगू?

तसं पाहिलं तर सांगण्यासारख्या किती तरी गोष्टी आहेत. जसं की तुमची भीती आणि तुम्हाला सतावणारी चिंता तुमच्याशी खोटं बोलतात. न्यूज रूम मध्ये बसून, आतताई आणि अर्वाच्यपणे ओरडणाऱ्या टीकाकाराप्रमाणे त्या तुमच्या आयुष्यावर टीका करतात. त्या तुम्हाला चुकीचा सल्ला देतात. लक्षात घ्या कोकेनसारख्या अंमली पदार्थाच्या इतकंच तुमचं अड्रेनेलिनही तुम्हाला वाईट सल्ला देऊ शकतं, तुम्हाला वास्तवापासून दूर नेऊ शकतं.

तुमची भीती आणि तुमच्या मनातील चिंता या तुम्हाला संपवतील. त्या तुमच्या कानात ओरडतील, दातओठ खात बसतील पण त्यांच्या बरळण्याकडे लक्ष देऊ नका.

एक वचन मी तुम्हाला नक्की देईन. आणि खरंतर ती वस्तूस्थिती आहे. तुमच्या समोरचा आत्ताचा क्षण सोडला तर तुमच्या आयुष्यात कधीही, कुठल्याही इतर गोष्टीला प्राधान्य देऊ नका. तुम्ही कधी एखाद्या महत्वाच्या गोष्टीला सामोरं जाताय उदा. एखादी परिक्षा, एखादी मुलाखत, एखादा निर्णय किंवा एखादे चुंबन आणि तुम्ही त्यात सपशेल अपयशी झालात तर त्याने तुमचं आख्खं भविष्य नासेल आणि तुम्ही संपाल असं तुम्हाला कितीही वाटलं, तरी तुम्ही नाही संपणार…

असं कधीच होणार नाही, असं होत नसतं..

एका क्षणाच्या नंतरच दुसरा क्षण येतो, एका तासाच्या पाठोपाठ दुसरा तास आणि एका दिवसामागूनच दुसरा दिवस. सर्व क्रमात बांधलेले, जणू काही एखाद्या गंठणात, ओळीने आणि दिमाखात माळलेले मोती. तुमच्या समोरचे आत्ताचे साठ सेकंद यांच्याशीच तुमचं देणंघेणं असणार आहे.

त्या क्षणी करावयाची योग्य तीच गोष्ट, शांतपणे करा. मग ते काम असो, श्वास घेणं असो अथवा तुमचं मोलाचं हास्य. तुम्ही ते करू शकता, त्या एका मिनिटात. आणि तुम्ही जर त्या मिनिटात ते करू शकता तर पुढच्या क्षणीही करू शकता.

असं समजा तुम्ही तुमचं स्वतःचं बाळ आहात. तुम्ही कधीही त्या बाळाला इजा करणार नाही, किंवा उपाशी ठेवणार नाही, अथवा ते रडेपर्यंत त्याच्या तोंडात अन्न कोंबणार नाही किंवा त्याला तू नालायक आहेस असं सांगणार नाही. कधी कधी मुलींना स्वतःच स्वतःची आई होण्याची गरज असते. तुमच्या शरीराला जगण्याची आस आहे – या आणि याचसाठी तर शरीर जन्माला येतं. तुम्ही दिलेल्या सुरक्षित अवकाशात त्याला जगू द्या. त्याला जपा. तेच तुमचं सर्वात महत्वाचं काम आहे. हाडा मांसाचं हे शरीर जपणं आणि मन.

फुलं विकत घ्या. तुमच्याकडे पैसे नसतील तर कुणाच्यातरी बागेतून एखादं फूल लंपास करा, ही दुनिया इतकं देणं तर लागतेच तुमचं ! फुलोरा – तुमच्या उशाला तो ठेवा. पहाटे जेव्हा तुम्हाला जाग येईल त्याकडे पहा आणि स्वतःलाच सांगा तुम्ही अशी व्यक्ती आहात जी पहाटे फुलं पाहते. यामुळे तुम्हाला रोज छळणारा विचार येणंच थांबेल, ‘मला आज घाबरल्यासारखं होतंय. आज माझा काही निभाव लागेल असं वाटत नाही.’ आणि मला माहित आहे तुमच्या पैकी अनेकजणींना हेच विचार रोज छळतात. प्रतिकूल दिवसात, दहशत मनाचा कब्जा घेण्या अगोदरच हा फुलोरा मन आणि सर्वांगात फुलू देण्याचं काम मुलींनी पहिल्यांदा करावंच करावं.

आणि सर्वात महत्वाची आणखी एक गोष्ट कोणती माहितीये? तुम्ही ‘जन्मतः अशा नक्कीच नव्हता’ ही जाणीव. अशा घाबरलेल्या आणि स्वतःचा तिरस्कार करणाऱ्या आणि दबलेल्या. या  गोष्टी नंतर झाल्या पण याचाच अर्थ आहे त्या दुरुस्त करता येतात, बदलता येतात. हे एक कठीण काम आहे. पण तुम्ही आजपर्यंत जे काही सोसलं आहे ते पाहता तुम्ही याला नक्कीच घाबरणार नाही. कारण आज आणि आत्ता आणि उर्वरित आयुष्यात आपल्याला ही एक गोष्ट शिकावीच लागणार आहे – मुलगी आणि पर्यायाने स्वतः एक व्यक्ती म्हणून उभं राहणं..

तुमचीच

केटलिन

(हे जाहीर पत्र Stylist.co.uk  या सांकेतस्थळावर सर्वप्रथम प्रकाशित झालं आणि पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मला भेटलेल्या मुलींना हे पत्र समर्पित केलं आहे. लेखिका आणि एक स्त्रीवादी कार्यकर्ती म्हणून केटलिन मोरान, इंग्लंड हीने या पत्राचं एका कार्यक्रमात जाहीर वाचन ही केलं होतं.)      

अनुवादक – अच्युत बोरगावकर

Comments are closed.