कॉपर टी नगं प्रॉपर्टी पाह्यजेल…

20,261

पारगावाच्या कमळा आणि मंजुळा अगदी पक्क्या मैतरणी. आज काय गप्पा मारायल्यात ते पाहू.
(कमळी – क., मंजुळी – मं. )

क. मंजुळा, ए मंजुळा, चलायचं का गं? माझी तर तयारी झाली.

मं. मी बी तयारच हाय की. चल जाऊ.

क. बरं झालं माय तु टायम काढला ती. आज मी ठरवलंच हुतं. कसं बी करून जायचंच शेताला.

मं. पर एवडं काय ठरवायचं बिरवायचं. मला न्हाय कळलं.

क. सांगते दमा दमानं. आदुगर हो म्होरं. चलत चलत बोलू. बरं भाकरी बांधून घेतल्यास न्हवं? बारल्यात आन मळ्यात, दुनीकडं जायचं हाय. टायम लागंल म्हनून म्हनतेव. शेतातच जेवन करू.

मं. भाकर घेतलीया, कोरड्यास बी घेतलंय. आन बाटली बी टाकलीया.

क. बाटली?

मं. पान्याची. तुज्या दाजीची सवय आजून मला लागली न्हाय. आन आज कुनीकडं दिस उगवला म्हनायचा. डायरेक्ट शेतलाच निगाल्यात वैनीसाएब.

क. आगं आज घरात कुनीच न्हाई. आमचे हे गेलेत तालुक्याला. आन आत्या-आबा गेलेत नंदंकडं. तवा म्हनलं चला आज शेतात चक्कर मारून यावी.

मं. म्हंजी आज ह्या घरगड्याला सुट्टी हाय म्हन की.

क. घरगड्याला न्हाई, घरबाईला म्हन. बरं ऐक, एक गोष्ट सांगायची हुती तुला.

मं. काय गं?

क. आगं आमचे हे मागंच लागलेत. ती कापर टी का काय ते बसवून घे म्हनून.

मं. मग? तू काय म्हनलीस?

क. मी म्हनले मी बोलते आदुगर नर्सबाईबरुबर. मग बगू.

मं. बरं झालं माय आसं बोललीस ते. मला किती तरास झाला त्या कापर टीचा तुला तर ठाऊकच हाय. आता गुमान कंपाऊडरकडं जातेत आमचे हे.

क. पर तु कसं काय दाजींचं मन वळवलं गं. आमच्या ह्यंला जरा सांगून बगितलं तर आशे कावले बगं.

मं. आदुगर आदुगर आसंच कवले आमचे हे बी. पर एके दिवशी कंपाऊंडर दादा आलते घरी. मी सरळ त्यंला बोलले की आमच्या ह्यंला बी द्या कंडोम म्हनून. हे समोरच हुते. आशे वरमले, त्या दिसापासून आले लायनीवर. बरं पाटील कसं काय आज तालुक्याला? आज तर बाजार बी न्हाई, आन कोना फुडार्‍याची सभा बी न्हाई. अान् आत्या-आबांना कसलं आवतन आज नंदंकडं?

क. आवतन कसलं? नंदंच्या दिराची बहिण म्हंजी माज्या नंदंची ननंद ईवून बसलीया घरात. तिच्या नवऱ्यानं तिला लाऊन दिलीया भावा-बापाकडून पैकं आन म्हनून.

मं. आगं माय माय माय माय. आता तिच्या नवऱ्याला कसेले पैसे पायजेलैत?

क. आगं ती जिमिन इकली ना. जो काय पैका आला तो दिसतोय जावाय बापूंला. म्हनून लाऊन दिलं बायकोला आणि दोन पोरींला. पोराला तेवडा ठिऊन घेतला. पैकं आन न्हाई तर वापस ईऊ नगं आशी धमकी दिलीय.

मं. आरे आरे. काय कडू हाय माय जावाई. आन पोराला ठिऊन पोरींला लाऊन द्यायची काय तऱ्हा हाय. पोरी काय आभाळातून पडल्यात का काय?

क. आगं त्याचं सोड. तो तर जावायच पडला. दहावा ग्रह. हिचे बाप भाऊ सुदिक त्या पोरीला थारा द्यायला तयार न्हाईत. म्हनतेत तुजं लगिन लावून दिलं, तू आता आमाला मेलीस. तुज्या लग्नावर एवडा खर्च केला, हुंडा दिला. आता तुजा आमचा काय संबंद न्हाई.

मं. म्हंजे मदल्या मदी त्या पोरीचा जीव जानार म्हन की.

क. न्हाई तर काय. इकडं नवरा धमकी देतंय तिकडं भाऊ माहेरात पाय ठिऊ देनात बग. काय करावं माय पोरीवांनी. सासर बी तुटतंय आन माहेर बी तुटतंय.

मं. म्हनून आत्या आबा गेल्यात व्हय त्यंला समजावायला?

क. त्यंला न्हाई, पोरीला आन जावायाला.

मं. का? आता त्या पोरीचा काय दोष? तिलाच काय समजावायचं?

क. आगं येडी का खुळी तू. तुला काय बी समजत न्हाई बग. आगं आज त्यंनी त्यंच्या पोरीला हिस्सा द्यायचा म्हंजी उद्या आमी आमच्या पोरीला म्हंजे माज्या नंदंला हिस्सा द्यायचा.

मं. आगं हो की. हे माज्या ध्यानातच आलं न्हाई. आसं हाय का?

क. दोन दिस झाले हीच खलबतं चालली हुती घरात. आणि आसं हु नए म्हनून गेलेत त्या पोरीला आन जावयाला समजावायला की कायदा काय बी म्हनंल आपन आपली रितभात सोडायला न्हाय पायजे, जावायाचा मान काय ऱ्हानार मग, आमी बहिनीला माहेरची साडी चोळी कायम देत राहूच की आसं म्हनून.

मं. आन जावई लोक हे ऐकनारेत आसं वाटतंय का काय त्यंला. जिमिनीचे भाव गगनाला ठेपलेत. पैक्यापुढं रितीभातीचा काय टिकाव लागनार गं?

क. पन मंजुळे माजं काय म्हननं हाय. आसली रितभात तरी का टिकावी गं. कायदा जर म्हनंत आसंल की बापजाद्यांच्या इस्टेटीत पोरासारकाच पोरीचा बी समान हिस्सा हाय तर तिला तो मिळायलाच पायजेल. कायदा बनवनाऱ्यांनी काय तरी इचार केलाच आसंल की.

मं. खरं हाय. पर हे बी खरंच हाय की गं कमळे, इस्टेट पोरीला दिली तरी ती जाती जावायालाच. जावाई काय म्हननार हाय का मी काय खात न्हाई ती इस्टेट. आपल्या समाजात समदा कारभार गड्यांच्याच हातात. बाईला कोन इचारतंय गं?

क. हे बी खरंच हाय म्हना. पर माजं काय म्हननं हाय मंजूळे, जे काय कायद्यानं वारस म्हनून मिळंल ते त्या पोरीच्याच नावावर हुनार. मग मिळू दे की. समद्याच बायांला त्यचा तरास हुईल आसं काय न्हाय. उलट सासरी बी किमत वाढंल बायांची. आन त्यंचं त्या ठरवतील काय करायचं आपल्या इस्टेटीचं, पैक्याचं.

मं. खरं हाय तुजं म्हननं कमळे.

क. म्हनून मी शाप सांगितलं आमच्या ह्यंना. उद्या ननंदबाईला तिचा हिस्सा द्यायची येळ आली तर माग हटू नगासा. आन मी बी माझा हिस्सा माझ्या बापभावाकडं मागणारच. कुनाला राग आला तर आला पर बाईला तिचा हिस्सा मिळालाच पायजेल. मग ती बापाच्या इस्टेटीतला आसंल न्हाई तर नवऱ्याच्या. कायदाच सांगतोय तसं.

मं. खरं हाय. आज बी गड्यावांला बाई मालक झालेली खपंत न्हाई हेच खरं हाय. निदान ह्यच्यामुळं तरी ती सोताच्या इस्टेटीची मालक हुईल.

क. म्हनूनच मी आमच्या ह्यंना म्हननार हाय. कापरटीचं बगु फुड आदुगर प्रॉपर्टीचं बोला.

Comments are closed.