आमच्या दोघांचे ५ वर्षापासून प्रेम आहे. दोघांची जात वेगळी आहे, त्याच्या घरच्यांना मी पसंद आहे पण त्याच्या घरचे म्हणतात कि तुमच्या लग्नाला आमचा नकार नाही, पण लग्नानंतर तुम्हाला घरी घेणार नाही. काय करावे ?
पसंद आहे पण लग्नानंतर घरी यायचं नाही या दोन्ही परस्पर विरोधाभासी गोष्टी आहेत. जर त्यांना खरोखर तुम्ही पसंद असाल तर मग लग्नानंतर तुमचा स्विकार करण्यास त्यांना कसली अडचण आहे? कदाचित याचा अर्थ लग्नाला विरोध किंवा त्याच्यावर दबाव आहे. दोघांची लग्न करुन जबाबदारी घेण्याची तयारी आहे का? परिस्थिती बिकट झाली तर काय कराल? घरच्यांच्या आर्थिक मदतीशिवाय तुम्ही स्वतःला साभांळू शकता का? तुम्ही एकमेकांशी लैंगिक गोष्टींवर मोकळेपणाने बोलला आहात का? अशा विविध बाजूने तुम्हाला विचार करता येईल. जर तुम्ही दोघेही स्वतंत्ररित्या कमावते असाल तर तुम्हाला निर्णय घेणं जास्त सोप्प जाईल. जर तुम्ही घरच्यांचा विरोध पत्कारुन लग्न करणार असाल तर सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाय योजना करणं नेहमीच फायदेशीर राहतं. जसं लग्नापूर्वी पोलिसांना लेखी अर्ज देऊन सुरक्षेची मागणी करणं, आंतरजातीय विवाह समुपदेशन केंद्राची मदत घेणं. निर्णय तुम्हा दोघांना मिळून घ्यायचा आहे आणि जो निर्णय घ्याल त्याला निभावण्याची तुमच्या मनाची तयारी असली म्हणजे झालं.