प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमासिक पाळी सुरू झाल्या पासून कितव्या दिवसांनी गर्भधारणा होऊ शकते

1 उत्तर

प्रत्येक स्त्रीचं पाळी चक्र वेगवेगळं असतं. काही जणींची पाळी महिन्याने येते तर काहींची दीड महिन्यांनी. काही जणींची पाळी तीन आठवड्यांनीच येते. याचं कारण म्हणजे त्यांच्या पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन होण्याची वेळ वेगवेगळी आहे. अंडोत्सर्जन ही पाळी चक्रातली मुख्य घटना आहे आणि पाळी येणे ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन झाल्यावर साधारणपणे 12 ते 16 दिवसांनी पाळी येते. म्हणजेच पाळी येते त्याच्या आधी दोन आठवडे अंडोत्सर्जन झालेलं असतं.

अंडोत्सर्जनाच्या आधीचे दोन दिवस आणि नंतरचे दोन दिवस असा साधारण 4 ते 5 दिवसांचा काळ गर्भधारणेस योग्य समजला जातो. स्त्री बीज जेव्हा बीज कोषातून बीजवाहिनीमध्ये येतं त्यानंतर ते फक्त 24 तास जिवंत असतं. त्या 24 तासामध्ये पुरुष बीजाचा त्याच्याशी संयोग झाला तर गर्भ धारणा होते. अंडोत्सर्जनाच्या आधी स्त्रीचा योनीमार्ग ओसलर झालेला असतो तसंच ग्रीवेमधून म्हणजेच गर्भाशयाच्या मुखातून एक प्रकारचा लवचिक, ताणला जाणारा स्राव वाहत असतो. असा स्राव पुरुष बीजांसाठी पोषक असतो आणि त्यामध्ये पुरुष बीजं जिवंत राहू शकतात. गर्भ धारणा हवी असेल तर आपल्या पाळी चक्राचा अभ्यास करून ते साधारणपणे किती दिवसांचं आहे ते शोधा.

पाळी येण्याच्या आधी दोन आठवडे अंडोत्सर्जन होते. तुमचं पाळी चक्र जर 30 दिवसांचं असेल तर पाळी सुरू झाल्यावर साधारणपणे 14-15 व्या दिवशी अंडोत्सर्जन होईल. पाळी लवकर येत असेल तर म्हणजे 22-23 दिवसांत येत असेल तर अंडोत्सर्जन पाळी सुरू झाल्यावर अगदी 7-8 व्या दिवशी होई. पण जर पाळी उशीराने म्हणजे 40 हून जास्त दिवसांनी येत असेल तर अंडोत्सर्जन 30 व्या दिवशी किंवा त्यानंतर होईल. हे शोधता आलं तर गर्भ धारणेसाठी योग्य काळ कोणता ते समजू शकेल.

अंडोत्सर्जन होण्याआधी योनीमार्गात आणि ग्रीवेमध्ये काही बदल होतात.

• योनीमार्ग जास्त ओलसर होतो, ताणला जाणारा, न तुटणारा स्राव तयार होतो. हा स्राव पारदर्शक असतो. अंड्यातल्या पांढऱ्या भागासारखा.

• योनीमार्गातून बोट आत घातलं तर ग्रीवेला स्पर्श करता येतो. एरवी ग्रीवा बंद आणि हाताला कडक लागते. मात्र अंडोत्सर्जनाच्या आधी आणि त्या वेळेस ग्रीवा वर गेलेली असते, हाताला लागली तरी मऊ आणि उघडल्यासारखी वाटते.

• लैंगिक आकर्षण वाढतं असंही अनुभवाला येऊ शकतं.

• अंडोत्सर्जन होताना ओटीपोटात मध्यभागी सुई टोचल्यासारखी वेदना होऊ शकते.

आपल्या पाळी चक्राचा अभ्यास नीट केल्यास हे सर्व बदल लक्षात येऊ शकतील.

अधिक माहितीसाठी तथापिशी संपर्क साधा आणि वाचा https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 18 =