तुमच्या प्रश्नाबद्दल बोलण्यापूर्वी काही गोष्टीं नमूद करणं आवश्यक आहे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा एक अर्थ असा दिसत आहे की तुम्ही अल्पवयीन आहात. तुम्ही जर वयवर्षे १८ च्या खाली असाल तर कायद्यानुसार तुम्ही संभोग करण्यासाठी आवश्यक असलेल्या संमतीसाठी पात्र नाही आहात. संमती वयाबद्दल अनेक विचारप्रवाह समाजामध्ये आहेत. याबद्दल तुमच्या जोडीदाराला कल्पना द्या. तुमच्या इच्छेविरुद्ध केला जाणारा संभोग हा बाललैंगिक अत्याचार कायदा, २०१२ नुसार गुन्हा आहे. तुम्ही अल्पवयीन(१८च्या आत) नसाल तर वरचा भाग तुमच्या प्रश्नांशी संबंधीत नाही.
आता तुमच्या प्रश्नाबद्दल बोलू या.
सुरुवातीच्या काळामध्ये मासिक पाळी अनियमित स्वरुपात असू शकते. यासाठी मासिक पाळी कशी सुरु होते याबद्दल माहित असणं आवश्यक आहे. वयाच्या ठराविक टप्प्यानंतर अंदाजे १२ ते १४व्या वर्ष्यापासून मासिक पाळी येणं चालू होतं. मासिक पाळीसाठी आवश्यक असणारी संप्रेरकं (इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन) अक्टीव्ह व्हायला लागतात. मात्र वर्षाभरानंतरही पाळी नियमित येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अनेकवेळा नियमित चालू असणारं पाळी चक्र मानसिक ताणतणावामुळं काहीवेळा लांबू शकतं. तुम्ही pregnancy टेस्ट करुन ती negative आली असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही. काही दिवस वाट पाहून पाळी नाहीच आली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अजून एक महत्वाचं, नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ती गर्भनिरोधके वापरा. तुमच्या जोडीदाराशी याविषयी बोला.