अरे दोस्ता, पहिलं तर ते लॉजबद्दल परत एकदा विचार कर. तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सांगत आहे. लॉज, बाग बगीचा, डोंगर ह्या जागा लैंगिक संबंधांसाठी धोकादायक ठरू शकतात. तुमचा गैरफायदा घेतला जावू शकतो किंवा लुबाडण्याच्या घटना घडतात. दुसरं म्हणजे ह्या जागा अशा नाहीत जिथे कुणालाही ‘सहज’ वाटेल. अवघडलेपण येणारच. तेंव्हा खूप खात्री असेल आणि तिला योग्य वाटत असेल तरच अशा जागी जाण्याचा निर्णय घ्या. आपल्या जगात मुलामुलींना एकांत मिळू शकेल अशा जागा नसणं ही एक मोठी शोकांतिका आहे. त्यात आजकाल संस्कृतीच्या नावाखाली गोंधळ घालणारे मोकाट सुटलेले असल्यामुळे सावध असा.
तिसरी आणि अधिक महत्वाची गोष्ट. जर तुझी मैत्रीण तयार नाही तर त्याचा अर्थ नाही असाच आहे. हा ‘नाही’ समजून घे. आपल्या समाजात विशेषतः मुलग्यांना ह्या ‘नाही’ चा अर्थ ‘नाही’ असतो हे लवकर समजत नाही. मुळात मुलग्यांना ज्या पद्धतीने मुलगा म्हणून आपल्याकडे वाढवले जाते त्यातील दोष आहे हा. त्यामुळे तू आत्ताच जागा हो. तिला समजून घे. तिची भीती रास्त आहे. ती भीती दूर करण्यासाठी तू काय करणार आहेस ते तिला सांग. शरीर संबंध, गर्भधारणा, गर्भनिरोधन या विषयी माहिती मिळवा, ती एकमेकांना सांगा, एकमेकांना खात्री द्या की तुम्ही एकत्र आहात आणि राहणार आहात. घाई करू नकोस. तिला तिचा वेळ घेऊ दे आणि तूही शांतपणे विचार कर. एक खूप चांगली गोष्ट तू केली आहेस, हा प्रश्न विचरून. आता हे उत्तर तिला वाचून दाखव. ऑल दि बेस्ट..