प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्स कसा करावा

1 उत्तर

 दोन व्यक्तींमध्ये होणारे लैंगिक संबंध म्हणजे सेक्स. यामध्ये विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. शारीरिक जवळीक, स्पर्श, प्रणय आणि संभोग अशा विविध प्रकारे लैंगिक संबंध ठेवले जातात. संभोग म्हणजे पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनिमध्ये प्रवेश करणे. यासोबतच मुखमैथुन, गुदामैथुन हेही संभोगाचे इतर काही प्रकार आहेत. याच्याबद्दलची माहिती उत्तराच्या शेवटी दिली आहे.

तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जास्त जवळ जावंसं वाटत असतं किंवा जेव्हा तुम्ही लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झालेले असता तेव्हा तुम्ही सेक्स करता किंवा तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा निर्माण होते. सेक्स करण्यामध्ये, प्रेम करण्यामध्ये आणि शरीर संबंध ठेवण्यामध्ये पाप किंवा घाण असं काही नाही. आपली जवळीक आपण या क्रियांमधून व्यक्त करत असतो. मात्र ही जवळीक दोन्ही जोडीदारांच्या संमतीने व्हायला हवी.

विविध संस्कृतींमध्ये सेक्सविषयी, शरीर संबंधांविषयी काही लिखित अलिखित नियम असतात. सेक्सविषयी आपण मोकळेपणाने बोलू शकतो का नाही, त्या क्रियेबद्दल आपल्या मनात कोणत्या प्रकारच्या भावना निर्माण होतात यावर आपल्या समाजातल्या नीतिनियमांचा परिणाम होत असतो. पण सेक्स करण्याची भावना ही अगदी नैसर्गिक भावना आहे आणि त्यात घाण असं काही नाही हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

सेक्स करणं किंवा शारीरिक जवळीक ही फक्त शरीराची क्रिया नाही. त्यात मानसिक आणि भावनिक गुंतवणूक होत असते. काही जणांसाठी सेक्स हे फक्त शारीरिक सुख मिळवण्याचा मार्ग असतो तर काहींसाठी प्रेम असल्याशिवाय सेक्सचा विचारही करणं गैर असू शकतं. तुम्हाला काय वाटतं ते तपासून पहा. ज्याच्यावर किंवा जिच्यावर तुमचा विश्वास आहे अशा व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवणं हा सुखद अनुभव ठरू शकतो. तुम्ही पहिल्यांदाच सेक्स करणार असाल तर हा विश्वास आणि मोकळेपणा फार महत्त्वाचा ठरतो. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला कशाने सुख किंवा आनंद मिळतो हे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आवर्जून बोला.

लैंगिक संबंध सुखकर असायला पाहिजेत. तसंच ते सुरक्षित असणंही आवश्यक आहे. सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे असे संबंध ज्यात जबरदस्ती नाही, ज्यामध्ये नको असलेल्या गर्भधारणेची भीती नाही, ज्यामध्ये एकमेकांना लिंगसांसर्गिक आजाराची लागण होण्याचा धोका नाही. ही काळजी घेतली तर आपले लैंगिक संबंध सुरक्षित मानता येतील. दोन्ही जोडीदारांना कशातून सुख मिळतं हे समजून घेतलं तर जबरदस्ती टाळता येईल. गर्भधारणा टाळायची असेल तर निरोध किंवा इतर गर्भनिरोधकांचा वापर एकमेकांच्या संमतीने केला तर तो धोका, भीती टळेल. एच आय व्ही, एच पी व्ही, ब प्रकारची कावीळ, गरमी, परमा आणि इतरही लिंगसांसर्गिक आजारांची लागण टाळण्यासाठी निरोधचा वापर करणं सर्वात उत्तम.

याव्यतिरिक्तही खालील गोष्टी माहित असणं आवश्यक आहे म्हणून लिहिल्या आहेत.

ऑरगॅझम (लैंगिक सुख किंवा लैंगिक पूर्ती)

लैंगिक संबंधांमध्ये, हस्तमैथुन करताना किंवा कुठल्याही प्रकारे लैंगिक उत्तेजना मिळाल्यावर एक क्षण असा येतो जेव्हा लैंगिक सुखाचा परमोच्च बिंदू गाठला जातो. हा सुखाचा बिंदू गाठल्यावर शरीराला, मनाला एकदम हलकं, शांत वाटू लागतं. यालाच इंग्रजीमध्ये ऑरगॅझम असं म्हणतात. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही ऑरगॅझमचा अनुभव येतो. स्त्री आणि पुरुष जर संबंध करताना एकतान झाले असतील, एकमेकांच्या कलाने संबंध करत असतील तर दोघांनाही एकाच वेळी ऑरगॅझमचा अनुभव येतो. मात्र दर वेळी असं होईलच असं नाही. मात्र लैंगिक संबंधांमध्ये दोघांनाही हे सुख अनुभवण्याचा अधिकार आहे.

पुरुषांमधील ऑरगॅझम

लैंगिक उत्तेजना मिळाल्यावर पुरुषाचं लिंग ताठर होऊ लागतं. हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक प्रकारचा ताण निर्माण होतो. पण हा ताण हवाहवासा वाटत असतो. लिंग ताठर झाल्यानंतर काही काळाने हा ताण अगदी टोकाला पोचतो आणि त्याच क्षणी लिंगातून वीर्य बाहेर येतं. याला वीर्यपात म्हणतात. किंवा इंग्रजीमध्ये याला इजॅक्युलेशन म्हणतात. ऑरगॅझमनंतर लिंग परत शिथिल होतं आणि शरीराला मोकळं, हलकं वाटू लागतं. पुरुषांचा ऑरगॅझम वीर्य बाहेर येण्याशी निगडित आहे.

स्त्रियांमधील ऑरगॅझम

स्त्रियांना अशा प्रकारची संवेदना किंवा जाणीव असते हेच अनेक स्त्री पुरुषांना माहित नसतं. त्यामुळे अनेक स्त्रियांना ऑरगॅझमचा अनुभवच आलेला नसतो. स्त्रियांच्या योनिमध्ये क्लिटोरिस नावाचा एक पूर्णपणे लैंगिक अवयव असतो. क्लिटोरिस अतिशय संवेदनशील अशा स्नायूंनी बनलेला असतो. त्याचं टोक मूत्रद्वाराच्या किंवा लघवीच्या जागेच्या वरच्या बाजूला असतं पण त्याची आतली रचना संपूर्ण योनिमध्ये असते. क्लिटोरिसला स्पर्श झाला, ते घासलं गेलं की ते उत्तेजित होऊन थोडं ताठर होतं. हळूहळू त्यातील संवेदना वाढतात. स्त्रीच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि लैंगिक सुखाचा बिंदू गाठला की योनि व योनिमार्गातील, गुदद्वाराचे स्नायू प्रसरण आकुंचन पावतात आणि स्त्रीला लैंगिक सुखाचा अनुभव येतो. अनेकदा स्तनाग्रं किंवा शरीरातील इतर अवयवांना कुरवाळल्याने किंवा स्पर्श केल्यानेही ऑरगॅझम यायला मदत होते.

[मुखमैथुन म्हणजे: स्त्री किंवा पुरुष जोडीदाराच्या लैंगिक अवयवांना मुखाने म्हणजेच तोंडाने स्पर्श करून सुख देतात. पुरुषाचे लिंग जोडीदार तोंडात धरते किंवा स्त्रीच्या योनिला, क्लिटोरिसला तोंडाने, जिभेने स्पर्श करून उत्तजना निर्माण केली जाते. मुखमैथुनामध्ये लैंगिक अवयव स्वच्छ असणं आवश्यक आहे. तसंच जर तोंडामध्ये जखमा असतील, हिरड्या किंवा दातातून रक्तस्राव होत असेल तर एच आय व्ही, एच पी व्ही किंवा एड्ससारख्या लिंगसांसर्गिक आजारांचा धोका असतो.

गुदामैथुन म्हणजे: गुदद्वारामार्गे लिंगप्रवेश करणे. पुरुष स्त्री किंवा पुरुष जोडीदाराच्या गुदद्वारामध्ये आपले लिंग सरकवतो. गुदामैथुनामध्ये कधी कधी गुदद्वाराला आतमध्ये जखमा होण्याची शक्यता असते. योनिमार्गासारखे गुदद्वाराचे स्नायू लवचिक नसल्याने तिथे इजा होऊ शकतात. यासाठी चांगल्या प्रकारचे वंगणयुक्त जेलसारखे पदार्थ वापरणं उपयोगी ठरतं.]

Madhura Mahesh Lad replied 1 year ago

Nice

Madhura Mahesh Lad replied 1 year ago

Nice

Damodhar Prabhakar Holkar replied 1 year ago

Khup chan

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 20 =