फक्त संभोग करतानाच योनीमध्ये आग होते की इतरवेळीही होत असते? यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे योनीमार्गाला जंतूंमुळे संसर्ग झाला आहे किंवा शरीरसंबंधांच्या वेळी योनीमध्ये पुरेसा ओलसरपणा तयार न झाल्याने आग होत आहे. या दोन्हीविषयी थोडक्यात समजून घेऊयात.
१. योनीमार्गाला होणारा जंतूसंसर्ग-
योनीमार्गाला वेगवेगळ्या जंतूंमुळे संसर्ग होऊ शकतो. योनमार्गात खाज येणे, आग होणे, अंगावरून जास्त जाणे, अंगावरून जाणाऱ्या म्हणजेच योनीमार्गातून येणाऱ्या स्रावाचा रंग, वास बदलणं, त्या स्रावाचं प्रमाण वाढणे, कंबर दुखणे, ओटीपोटात दुखणे अशा अनेक प्रकारे आपल्याला योनीमार्गात जंतुसंसर्ग झाल्याची जाणीव होते. योनीमार्गातील जंतुसंसर्ग केवळ लैंगिक संबंधांमधून होत नाहीत. अंगावरून जाणं, पांढरं जाणं, पांढरा प्रदर, श्वेत प्रदर किंवा व्हाइट डिस्चार्ज अशी अनेक नावं या संसर्गांना किंवा इन्फेक्शन्सना आहेत.
योनीमार्गाला होणाऱ्या काही संसर्गांची माहिती पुढे दिली आहे.
https://letstalksexuality.com/reproductive-tract-infections/
२. योनीमध्ये तयार होणारा ओलावा/ योनिस्राव
लैंगिक संबंधाच्या वेळेस योनीमध्ये ओलसरपणा वाढतो म्हणजे नक्की काय होते, हे समजून घेऊयात. स्त्रिला लैंगिक इच्छा झाली आणि लैंगिक उत्तेजना मिळाली की, योनीमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि योनीच्या आतील स्राव वाढून योनीतील ओलावा वाढतो. स्त्रीच्या मनात सेक्स करण्याची इच्छा नसेल किंवा उत्तेजना मिळाली नसेल तर योनीमध्ये ओलसरपणा तयार होणार नाही. म्हणूनच लैंगिक संबध करत असताना संमती आणि इच्छा खूप महत्वाची आहे.
योनीमध्ये तयार होणारा ओलावा/ योनिस्राव संबंधांच्या वेळी वंगण(लुब्रींकंट) म्हणून काम करत असतो. तो कमी झाल्याने शरीरसंबंध करताना योनीमध्ये आग होऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो. प्रत्यक्ष संभोगापूर्वी कामक्रीडा (फोरप्ले) करणं योनीमध्ये ओलावा तयार होण्यामध्ये फायदेशीर ठरतं. योनीतील ओलसरपणा वाढविण्यासाठी काहीजण कृत्रिम वंगण(लुब्रींकंट)/जेली चा वापर करतात. तुमच्या जोडीदाराशी याविषयी बोला.
योनिमधील ओलावा कमी होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे मेनोपॉज. वयाच्या 45-50 च्या आसपास कधी कधी त्याहीनंतर स्त्रीचं पाळीचक्र थांबतं याला मेनोपॉज असं म्हणतात. ही बाईच्या शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मेनोपॉजच्या काळात आणि त्यानंतर स्त्रीमध्ये काही शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात. लैंगिक इच्छा आणि भावभावनाही बदलू शकतात. योनीतील ओलसरपणा आणि लवचिकपणा कमी होणं हा एक होणाऱ्या बदलांपैकी एक बदल आहे. मेनोपॉजविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/menopause/
लिंगातून गरम वीर्य येण्याची कारण
शरीराचे सरासरी तापमान हे बाहेरील तापमानापेक्षा जास्त असते. त्यामुळे शरीरामधून स्त्रवणार्या किंवा बाहेर पडणार्या घटकांचे तापमानसुद्धा बाहेरील तापमानापेक्षा जास्त असते. जसे कि सोडलेला उश्वास, घाम, मुत्र किवा मल याचे तापमान जास्त असल्यामुळे ते गरम असल्याचे जाणवतात, तसेच वीर्य बाहेर पडल्यावर ते गरम असल्याचे जाणवते अन ही फार सामान्य बाब आहे.